तुम्ही वास्तविक जगाचे राजे. तुम्ही जगाचे पोशिंदे. सारे जग तुमच्यामुळे जगते. सारा व्यापार तुमच्यामुळे चालतो. तुम्ही कापूस न पिकवाल तर या गिरण्या कशा चालतील? तुम्ही शेंगा न पिकवाल तर तेलाच्या गिरण्या कशा चालतील? तुम्ही उसाचे मळे तयार न कराल तर साखरेचे कारखाने कसे चालतील? तुम्ही धान्य न निर्माण केले तर धान्याचे व्यापारी व्यापार कसला करतील? मोठमोठे कारखानदार, मोठमोठे व्यापारी, तसेच सारे शेटसावकार, जमीनदार या सर्वांच्या चैनी तुमच्या जीवावर चालल्या आहेत. परंतु तुमची काय स्थिती आहे? तुम्हाला पोटभर खायला नाही. अंगभर कपडा नाही. तुम्हाला ज्ञान नाही. लिहिता वाचता येत नाही. ही सारी स्थिती आपण बदलली पाहिजे. आपण क्रांती केली पाहिजे. शेतकरी खरा मालक झाला पाहिजे. कामगार खरा मालक झाला पाहिजे. असे शेतकरी-कामगारांचे राज्य आपणास आणायचे आहे. त्यासाठी आपण एकी केली पाहिजे. शेतकरी संघ ठायी ठायी स्थापिले पाहिजेत. काँग्रेसच्या झेंडयाखालचे शेतकरी-संघ. परकी सरकारशी लढणारी फक्त काँग्रेसच आहे. तिच्या झेंडयाखाली जाऊन आपणही आपली स्थिती सुधारून घेतली पाहिजे, तिच्यामार्फत आपण आपली दु:खे दूर करून घेतली पाहिजेत. आणि तिचा लढा आला तर त्यात सर्वांनी उडया घेतल्या पाहिजेत. आपल्या पायावर आपण उभे राहिले पाहिजे. म्हणून संघटना करा. 'काँग्रेसकी जय' म्हणा; 'महात्मा गांधीकी जय' म्हणा. 'शेतकरी-कामकरी राज्याचा जय' म्हणा. वंदे मातरम्!'
'संपले का रे?'
'ते का पुराण आहे लंबेचौडे ! हँडबिल आहे ते सुटसुटीत.'
'गोप्या, तू आमचा म्होरक्या. तू सांगशील तसे आपण वागू.'
'आपण किती दिवस असे किडयासारखे जगायचे? वास्तवकि सर्वांच्या डोक्यांवर आपण बसायला हवे, तर उलटीच जगाची रीत, उलटाच न्याय. सारे आपल्या डोक्यांवर बसतात. जो तो आपल्याला दरडावतो. बस म्हटले, की आपण बसतो; ऊठ म्हटले, की उठतो. कधी मामलेदार कचेरीत आपल्याला खुर्ची मिळते का ! येसफेस कराणारा आला की त्याचा खुर्ची. आमची घरेदारे, शेतवाडी सारे गिळकृंत करणारा त्याला खुर्ची.'
'कोर्टकचेरीत वकील साक्षीदाराला विचारतो : तू शेतसारा किती भरतोस? इन्कमटॅक्स भरणारा तेवढा प्रामाणिक! त्याला जणू अब्रु. आणि आम्हा गरिबांना का जणू नाही? सारे इन्कमटॅक्स भरणारे नि ते सावकार हेच वास्तविक अप्रामाणिक म्हणून तर बकासुराप्रमाणे त्यांनी जमिनी गिळल्या. परंतु न्याय त्यांच्या बाजूला. सत्य जणू त्यांच्याजवळ! सारा चावटपणा आहे!'
'गोप्या, तू कोठे शिकलास असे बोलायला?'
'अरे, हल्ली मी वर्तमानपत्र वाचतो आणि हे विचार का आपल्या मनात नसतात? असे बोलायला कोणी शिकवायला नको.'
इतक्यात मालक तेथे आला. त्याची चर्या रागावलेली दिसत होती. ते सारे मजूर तसेच बसून होते. कोणी उठले नाही.
'वाच गोप्या, पुन्हा एकदा वाचून दाखव नीट.'
'काय रे, काय वाचून दाखवायचे आहे? गोप्या, काय आहे ते तुझ्या हातात? अरे, दोन वाजून गेले. आता तीन वाजतील. तरी तुम्ही झाडाखालीच? फुकाची मजुरी असते वाटते? उठा कामाला! अजून चिलीम प्यायचीच असेल? सुपारी खायचीच असेल?
होय ना? उठा. उठता की नाही.'
'अरे जा रे! मोठा आला उठा उठा करणारा. आम्ही का शेळयामेंढया आहोत? माणसे आहोत आम्ही. वाच, गोप्या.'
गोप्या वाचू लागला. मालकाने त्याच्या हातातील ते पत्रक ओढून घेतले. मालकाने ते वाचून पाहिले. तो चिडला.