सभेला सुरूवात झाली. अनेकांची भाषणे झाली आणि आता गोप्याची पाळी आली. अध्यक्ष म्हणाले, 'आतापर्यंत शहरी व्याख्यात्यांची भाषणे ऐकलीत. आता खेडेगावी नमुना पाहा. आपल्या गोपाळपूरचे भाई गोपाळ किंवा गोपाळदादा हे आले आहेत. ते काँग्रेसचे भक्त आहेत. शेतक-यांचे प्राण आहेत. स्वत: श्रमणारे ते शेतमजूर आहेत; ते आता बोलतील ते ऐकून घ्या.'
टाळयांच्या कडकडाटात गोप्या उभा राहिला. शेतकरी जरा सरसावून ऐकू लागले. गोप्या प्रथम जरा बावरला. परंतु पुढे त्याची रसवंती सुरू झाली. ते अपूर्व भाषण झाले. ती प्रचंड सभा चित्रासारखी होती. अनुभवाच्या शब्दांना निराळेच तेज असते. गोप्या म्हणाला :
'जालियनवाला बागेतील शेकडो हुतात्म्यांचे आपण स्मरण करीत आहोत. ते योग्यच. सरकारच्या गोळीबाराला ते शेकडो बांधव बळी पडले. त्यांना प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. परंतु हुतात्मे रोज होत आहेत. सरकारी नि सावकारी जुलमाला सीमा नाही. लाखो खेडयापाडयांतून लाखो हुतात्मे; शहरांतील कारखान्यांतून हुतात्मे; खेडयातील झोपडयांतील हुतात्मे. माझी बायको मंजी, ती का हुतात्मा नव्हती? ती उपाशी राहून तुम्हा प्रतिष्ठितांना पोशीत होती. तुम्हांला धान्य देत होती. तिचे बलिदान कोणाला आहे का ठाऊक? आणि माझी तारा ! आकाशातील ता-याप्रमाणे तेजस्वी ! ती का हुतात्मा नव्हती? लहानपणी अपार काम तिला करावे लागे. तिचे खेळण्या-बागडण्याचे वय. परंतु या शिवापुरात तिला मोलकरीण म्हणून राहावे लागले. रासभर धुणे धुवावे लागे. या गावच्या तळयात ती बुडून मेली! बुडून मेली की तिने तुम्हाला जागे करायला स्वत:चे बलिदान केले? बंधूंनो, माझ्याच काय, लाखो शेतक-यांच्या घरात ही अशी मुकी बलिदाने दररोज होत आहेत. कोण जागा होतो? कोण उठतो? ही काँग्रेस काही करील अशी आशा आहे. तिने हुकूम करावा. आम्ही बंड करू. यापुढे किडयांप्रमाणे आम्ही राहणार नाही. आम्ही आपली मान उंच करणार, करणार!'
किती तरी वेळ गोप्या बोलत होता. शेवटी तो बसला. टाळयांचा कडकडाट थांबेना. अध्यक्षांनी कसा तरी समारोप केला. 'वंदे मातरम्' होऊन सभा संपली नि गोप्याला भेटायला ही गर्दी लोटली.
'फार छान बोललेत तुम्ही.' कोणी म्हणाले.
'तेथे अभ्यासमंडळे वगैरे कोणी घेतो का?'
'अहो, मीच तेथे डढाचार्य. तेथे कोठली अभ्यासमंडळे? अनुभवाच्या शाळेत आम्ही शिकतो.'
'परंतु तुम्ही महाराष्ट्राचे पुढारी व्हाल.'
'मला पुढारी होण्याची इच्छाच नाही.'
'इच्छा नसली तरी जनतेचे स्वराज्य यावे म्हणून पुढे व्हावे लागते.'
अशी बोलणी चालली. कार्यकर्त्यांना भेटून आपल्या गावच्या मंडळीबरोबर गोप्या पुन्हा गोपाळपूरला आला. तो आता शिवापूरला वरचेवर जाई. कार्यकर्त्यांशी त्याची मैत्री जमली. तो हुशार होऊ लागला. माहिती मिळवू लागला. त्याने शेतक-यांचे सेवादल सुरू केले. मुलांचीही सेवादले सुरू केली. शेतक-यांच्या बायकांतही तो प्रचार करी. त्यांनाही समजून देई. गोप्या आदर्श प्रचारक बनला. निरलस नि उत्साही !