'कोण आहे?' बाळाने विचारले.
'मी एक दुर्देवी स्त्री आहे.'
'या बाजूला कशाला?'
'डोहात आधार मिळतो का पाहायला.'
'तू का जीव देणार?' तुला का कोणी नाही?'
'मला कोणी नाही. मी या गावची नाही. मी दूरची आहे. काही महिन्यांपूर्वी माझा नवरा मरण पावला. दिरांनी मला घालवून दिले. मी भावाच्या घरी गेले. भावानेही मला थारा दिला नाही. मी या गावी आले. मोलमजुरी करते. एका झोपडीत राहते. परंतु तेथे मला कोण आहे? प्रेमाचे, मायेचे मला कोण आहे? कोणी गोड शब्द बोलायला नाही. कोणी विचारपूस करायला नाही. दिवसभर मी काम करते. संध्याकाळी कधी नदीकाठी येऊन बसते नि रडते. आज मला फारच एकटे वाटते, आणि डोहात जीव द्यावा असे ठरवून आले. तुम्ही माझी कशाला चौकशी करता? दुर्देवी माणसाची कोणी विचारपूस करू नये. माझे दुर्देव
तुम्हालाही बाधायचे. जा, माझ्यापासून दूर जा.'
'तुला जगात खरोखरच कोणी नाही?'
'खरोखरच कोणी नाही.'
'तर मग तू माझी हो. मीही एकटाच आहे. मला मूल ना बाळ. तीन बायका मेल्या. तू माझी चौथी बायको हो. तुला मी, मला तू. तुझ्याजवळ मी गोड बोलेन, माझ्याजवळ तू गोड बोल आणि मला मुलगा दे. तीन बायका केल्या. परंतु फुकट. मूलबाळ न देता त्या मेल्या. तू तसे करू नकोस. चल माझ्याबरोबर. मी तुझ्याशी लग्न लावतो.'
'असे कसे होईल? मी एक दुर्देवी दरिद्री बाई.'
'मी तरी कोठे मोठा कुबेर आहे? दुर्देवाची मला भीती नाही. चल, कदाचित् सारे चांगले व्हायचे असेल. मला नाही म्हणू नकोस. मला बायको मिळत नाही म्हणून मी दु:खी आहे. माझे दु:ख, माझे दुर्देव तू दूर कर.'
'तुम्ही थट्टा करता की मनापासून बोलता?'
'मी नेहमी मनापासून बोलत आलो आहे. लपंडाव वगैरे माझ्याजवळ नाही. शेतक-याजवळ का लपंडाव असतो? शेतकरी साधा सरळ माणूस. चल, रडू नको. माझी बायको हो नि सुखी हो. मलाही मुलगा देऊन सुखी कर.'
'छान. चल.'
ती दोघे गावात आली. ती दुर्देवी स्त्री आपल्या झोपडीत गेली. दुस-या दिवशीच त्या दोघांचे लग्न लागले. बाळाच्या घरी त्याची नवी बायको राहायला आली. सावित्री तिचे नाव. ती कष्टाळू होती. तिने घरची झाडहोट केली. सारे स्वच्छ केले. पुढचे अंगण सारवले. तुळशीवृंदावन रंगवले. बाळाच्या घराला कळा आली.
'मिळवली की नाही बायको?' तो लोकांना मिशीवर पीळ देऊन म्हणे.
'परंतु उद्या त्या बायकोचे काय होईल? घरदार सावकाराच्या ताब्यात जाईल. तु जाशील मरून. तुझ्या बायकोचे हाल मग कुत्राही खाणार नाही.' लोक म्हणत.