आज मुलाला पाळण्यात घालायचे होते. बाळाने रंगीत पाळणा टांगला होता. त्याने थाटाने बारसे केले आणि खरोखरीच मुलाचे नाव गोपाळ ठेवण्यात आले. गोपाळ वाढू लागला. लहानाचा मोठा होऊ लागला. एका सावकाराकडून आणखी थोडे कर्ज बाळाने आणले. गोपाळाला त्याने बाळलेणे केले. सुंदर केले. तो लहान बाळसेदार गोपाळ मोठा सुंदर दिसे. त्याचे डोळे काळेभोर होते. बाळाला मुलाचे वेड लागले. गोपाळाला घेऊन तो सर्वत्र जाई. सर्वांना तो दाखवी.
दुपारी जेवण झाल्यावर बाळा त्याला जवळ घेऊन बसे. तो चिमुकला गोपाळ बापाच्या मिशा ओढी. बापाचा आनंद गगनात मावत नसे. गोपाळ रांगू लागला. घरातील सामान तो उडवी. पाटीतील दाणे फेकी. सावित्री त्याला खोटे रागे भरी. परंतु बाळाला ते सहन होत नसे.
'खबरदार त्याला रागे भरशील तर ! तो माझा मुलगा आहे. माझी इच्छा पुरी करायला तो जन्मला आहे. त्याला चापट मारशील तर तुझी चामडी लोळवीन, समजलीस?' अशी धमकी बाळा सावित्रीला देत असे.
गोपाळला आता पाय फुटले. तो रस्त्यात जाई. आई त्याला शोधीत फिरे. मग ती त्याला उचलून आणी. गोपाळ गायींच्या गोठयात जाई. गवताशी खेळे. गायीच्या शेणात हात भरी. सावित्री त्याला उचलून आणी. मोठा खोडसाळ होता गोपाळ.
बाळा कधी त्याला जवळ घेऊन बोलायला शिकवी. आई, बाबा, असे म्हणायला शिकवी. तो चिमणा गोपाळ हसे आणि बापाला अधिकच स्फूर्ती येई. बाळा आपल्या मुलाला म्हणे, 'गोपाळ, तू पुढे मोठा हो. होशील ना मोठा? तू शेतक-याचा मुलगा आहेस.
आजकाल शेतक-याची मान खाली झाली आहे. तू ती उंच कर. शेतक-यांचे राज्य स्थापन कर. शेतकरी म्हणजे पाताळात दडपलेला बळी राजा. या पाताळात दडपलेल्या शेतक-याला वर आण. या गोपाळपूरचा तू राजा हो. शेतक-यांचा राजा करशील हे सारे? पित्याची इच्छा पूर्ण करशील ना? काय रे?'
बापाचे बोलणे ऐकून बाळ हसे; बापाचे डोळे झाकी. त्याचे ते भले मोठे नाक तो ओढी. विशेषत: त्या मिशा बाळ गोपाळला फार आवडत. त्या दोन्ही हातांनी तो धरी आणि गोड गोड हसे. बाळा सावित्रीला हाक मारून म्हणे,
'हा बघ हसतो. याला सारे समजते. माझे बोलणे ऐकून लबाड हसतो. लहानसा आहे तरी त्याला सारे समजते. उद्या शाळेत जायला लागला म्हणजे किती समजू लागेल! शहाणा होईल, बाळ हुशार होईल. होशील ना रे?'
असे म्हणून बाळा मुलाचे मुके घेई.
गोपाळ दोन तीन वर्षांचा झाला. परंतु बाळा आता आजारी पडला. सावित्री नव-याची सेवा करीत होती. घरात पैसा नाही. सावित्री मोलमजुरी करून चार दिडक्या मिळवून आणी आणि गाडा ढकलीत होती. परंतु बाळा बरा होईल कोणाला वाटत नव्हते आणि शेवटची घटका आली.
'माझ्याजवळ गोपाळ दे.' तो क्षीण स्वरात म्हणाला.
'हा घ्या!' सावित्री म्हणाली
क्षीण हातांनी पित्याने मुलाला जवळ घेतले. गोपाळचा मुका घेऊन तो म्हणाला, 'मोठा हो राजा. शेतक-यांची मान उंच कर. देवाघरी जाणा-या तुझ्या पित्याची हीच इच्छा. ती पूर्ण कर.'
बाळ हसला.
'बघ त्याला समजते. 'मरणोन्मुख बाळा म्हणाला.