बरेच दिवसांत तिची माझी गाठ पडली नाही. परंतु काल अकस्मात ऐकले की तारा तळयात बुडून गेली. ताराचा पाय का घसरला? का तिने जीव दिला? तिचा त्या घरात छळ का होई? मारहाण का होई? तिचा कोंडमारा का होई? तिला काम तरी किती करावे लागे! तिला दळायलाही लावीत. तिच्या हाताला आलेले फोड मी एकदा पाहिले होते. आणि तशा हातांनी पुन्हा धुणी धुवावी लागत. आणि हे सारे दु:ख ती कोणाजवळ सांगणार? तुम्हाला तिने या गोष्टी कधी कळवल्या नसतील. ती तुम्हा सर्वांसाठी, लहान भावंडांसाठी स्वत:चे बलिदान करीत होती. गरीब बिचारी तारा! किती गुणाची! संधी मिळती तर ती मोठी पुढारी झाली असती. तिला वाटे, तिरंगी झेंडा हाती घ्यावा. प्रभातफेरी काढावी. ती शिकत होती. पटकन् तिचे पाठ होई. परंतु एक कळी कुस्करली गेली. माझे डोळे पुन्हा भरून येत आहे.
गोप्यादादा, तुमचे डोळेही भरून येतील. तुम्हाला मोठा धक्का बसेल. परंतु मी सांगतो की शोक आवरा, शांत व्हा. तुम्हीच स्वत:चे डोळे पुसा. ताराच्या लहान भावंडांची तुम्ही समजूत घाला. त्यांच्यावर अधिकच प्रेम करा. तारा तर गेली. आता रडून काय होणार? शोक करून काय होणार? आता तुम्ही विचार करायला लागा. तुमची मंजी तुम्हाला सोडून गेली. तुमची तारा गेली. या दु:खद घटनांचा तुम्ही मनात विचार करा. मंजी का मेली? एक दिवस सर्वांनाच मरायचे आहे ही गोष्ट निराळी. जगात कोणी अमरपट्टा घेऊन आलेला नाही. परंतु मंजी इतक्या लवकर खचित मेली नसती. ती उपासमारीने मेली. तारा मला घरची स्थिती सांगत असे. मंजी मुलांना पोटभर वाढी नि स्वत: तशीच निजे, आणि उपाशी पोटी शेतात काम करायला ती जाई. त्यातच पुन्हा पुन्हा येणारी बाळंतपणे, वेळेवर औषध नाही. मंजीला काही दिलेत का औषध? रानातून पाला आणलात नि रस पाजलात. त्या सावकाराने आपल्या बायकोला असाच रस पाजला असता का? जगात नाना प्रकारचे शोध लागत आहेत. नाना उपचार असतात. आरोग्यधामे असतात. परंतु गरिबाला ती कशी मिळणार?
वास्तविक जगात सारी संपत्ती आपण निर्माण करतो. शेतकरी धान्य पिकवितो; शेंगा, कापूस सारे तो पिकवितो; ऊस तो पिकवितो; मळे तो करतो; परंतु त्याची स्थिती कशी आहे? शेतकरी जगाचा पोशिंदा. परंतु जगाला पोसणारा घरी उपाशी असतो! हा अन्याय आहे. आधी तुम्हाला पोटभर मिळाले पाहिजे. उरले तर सरकार नि सावकार, जमीनदार नि इनामदार यांना. श्रमणा-यांचा पहिला हक्क. शेतक-यांनी या गोष्टीचा विचार करायला हवा. जगाला आपण आधार देतो. परंतु आपण निराधार असतो. आणि बाकी सारी प्रतिष्ठीत बांडगुळे - त्यांना बंगले आहेत; त्यांना औषधे आहेत. खाण्याची चंगळ आहे; हवेशीर ठिकाणी राहायला जागा आहेत. आपण ही स्थिती बदलायला पाहिजे.
मंजी, गरीब बिचारी मंजी! मला तिच्या किती आठवणी येतात. मला जगात कोणी नव्हते. मंजीचे आईबाप मेले; परंतु मंजी मोलमजुरी करून मला पोशी. तिचे माझ्यावर किती उपकार! मी तिच्या सोन्याचे प्राण घेतले तरी ती मला रागाने बोलली नाही. कारण माझ्या मनात दुष्टता नव्हती हे तिला माहित होते. मंजीच्या आठवणी मी किती सांगू? तुमचेही तिच्यावर किती प्रेम? अशा मंजीला उपासमारीने मरण यावे, औषधपाणी न मिळाल्यामुळे मरण यावे! हरहर! परंतु आपल्या देशात कोटयवधी श्रमणा-यांच्या घरांतून हीच दशा आहे.
आणि तारा? तिचे मरण अधिकच दु:खकारक आहे. मंजीने थोडा-अधिक संसार केला. तारा तर अल्लड बाला! खेळण्याचे हे वय! दो-यांवरून उडया मारण्याचे वय! मैत्रिणींबरोबर फिरायला जायचे, वनभोजनास जायचे हे वय! शाळेत शिकायचे हे वय! परंतु अशा वयात तिला रानात गवत कापायला जावे लागे, उन्हात करपावे लागे. अशा बालवयात घर सोडून, भावंडे सोडून परक्याकडे काम करण्यासाठी तिला राहावे लागले; आणि तिथे किती कष्ट, किती अपमान, किती यमयातना! ताराच्या या मरणाने आपले डोळे उघडले पाहिजेत. तिचे मरण जळजळीत निखा-याने आपल्या जीवनात लिहिले पाहिजे. हिंदुस्थानभर हा अन्याय चालला आहे. जगाला पोसणारा उपाशी मरत आहे. ही परिस्थिती बदलली पाहिजे.
कशी बदलायची ही परिस्थिती? तुम्ही काँग्रेसचे नाव ऐकले असेल. महात्मा गांधींचे नाव ऐकले असेल. पंडित जवाहरलाल नेहरूंचे नाव ऐकले असेल. काँग्रेस आपल्या देशात स्वराज्य आणण्यासाठी धडपडत आहे आणि ती गोरगरिबांचे स्वराज्य आणणार आहे.