बलिदान
देशातील व जगातील परिस्थिती झपाटयाने बदलत होती. जगात महायुध्द सुरू झाले. इंग्लंड त्या युध्दात पडले आणि हिंदुस्थानालाही त्या आगीत ओढण्यात आले. एका अक्षरानेही देशातील जनतेला किंवा जनतेच्या प्रतिनिधींना विचारण्यात आले नाही. काँग्रेस सात प्रांतांत अधिकारावर होती परंतु काँग्रेसच्या प्रधानांनी राजीनामे दिले. व्हाइसरॉयसाहेबांच्या वटहुकुमांची अंमलबजावणी स्वातंत्र्यसाठी लढणारी काँग्रेस थोडच करणार? काँग्रेसने सरकारजवळ राष्ट्रीय सरकारची मागणी केली. परंतु नकार मिळाला. महात्माजींनी काँग्रेसची सूत्रे हाती घेऊन सरकारी धोरणाला विरोध म्हणून वैयक्तीक सत्याग्रह सुरू केला. निवडक सत्याग्रही तुरूंगात गेले. गोप्याही तुरूंगात गेला. त्याच्या दोन मुलांचा सांभाळ जनतेने केला.
परंतु परिस्थिती अधिकच बिकट झाली. जपानने महायुध्दात उडी घेतली आणि भराभर विजय मिळवीत ब्रह्मदेश जिंकून हिंदुस्थानच्या पूर्व हद्दीवर जपान येऊन उभा राहिला. हिंदुस्थानचे काय होणार? स्वतंत्र हिंदुस्थान जपानचा प्रतिकार करायला उभे राहिले असते. चीन देश स्वतंत्र असल्यामुळे वर्षानुवर्षे जपानशी लढत होता. हिंदुस्थान तर अधिकच यशस्वीपणे जपानचा मुकाबला करण्याची शक्यता होती. परंतु जनतेला आपण स्वतंत्र आहोत असे कळताच दसपट, शतपट उत्साह येतो. वाटेल तो त्याग करायला आपण सिध्द होतो. काँग्रेस देशाचे स्वातंत्र्य मागत होती. इंग्लंडमधून क्रिप्ससाहेब बोलणी करायला आला. प्रथम आरंभ बरा झाला. परंतु साहेब शेवटी आपल्या वळणावर गेला. वाटाघाटीतून काहीच निष्पन्न झाले नाही. महात्माजींना सात्विक संताप आला. राष्ट्राने असेल नसेल ती शक्ती उभी करून स्वतंत्र होण्यासाठी उभे राहिले पाहिजे, असे ते म्हणाले. त्यांनी लिहिले, 'हिंदुस्थान राहिला तर माझे प्रयोग. हा देश आणखी कोण्याच्या ताब्यात जायचा असेल तर? मी किती वाट पाहू? परचक्र दारात आहे. आम्ही या क्षणी स्वतंत्र झाले पाहिजे. माझी सारी अहिंसक शक्ती मला उभी करू दे. हिंदुस्थानातील इतर पक्षांनी, इतर संस्थांनी आपापल्या पध्दतीने लढावे. काँग्रेस आपल्या अहिंसक मार्गाने लढेल. परंतु ही परसत्ता दूर करायला सर्वांनी उठले पाहिजे.'
परंतु उठणार कोण? आपसात लाथाळया माजवणा-या भाराभर संस्था नि संघटना असतील. परंतु परकी सत्तेशी झगडा करणारी एकच संस्था हिंदुस्थानात आहे. ती म्हणजे काँग्रेस. महात्माजींनी 'चले जाव' हा मंत्र राष्ट्राला दिला. मुंबईस ऑगस्ट १९४२ च्या आठ तारखेस काँग्रेसची ती ऐतिहासिक परिषद झाली. स्वातंत्र्याचा ठराव, स्वातंत्र्यासाठी लढा करण्याचा ठराव पास झाला. त्या दिवशी रात्री महात्माजी दोन अडीच तास बोलले. त्यांनी आपला ह्दयसिंधू ओतला. हिंदी जनतेला नवराष्ट्राचा तो महान नेता म्हणाला, 'उद्यापासून तुम्ही स्वतंत्र आहात. स्वतंत्र आहोत या वृत्तीने सारे वागा.' ते शब्द ऐकताच सर्वांच्या जीवनात जणू नवविद्युत संचारली.
अमर अशी ९ ऑगस्टची तारीख उजाडली. हिंदुस्थानभर स्वातंत्र्याचा अहिंसक संग्राम सुरू झाला. गोळीबारांत, लाठीमारांत स्वातंत्र्यवीरांचे बलिदान होऊ लागले. गोपाळपूरचा गोप्या कोठे आहे? तो काय करीत आहे?
गोप्या नि त्याचे मित्र, ते पाहा जंगलात जमले आहेत. त्यांनी काही तरी योजना चालली आहे.
'आपण आपला तालुका स्वतंत्र करू या.' दौल्या म्हणाला.
'परंतु तशी परवानगी आहे का?'