तिसरा संस्थानांचा प्रश्न.  म्हणे आमचे तहनामे आहेत.  हे तहनामे वाटेल तेव्हां, ब्रि. साम्राज्य सरकारला इच्छा असते तेव्हां ढिले होतात.  परन्तु हे तहनामे त्रेतायुगांत झाले.  त्यांचे का आज लोकशाहीच्या काळांत महत्त्व? जनतेचा कौल घ्या.

संस्थानिकांना काय विचारता? स्वयंनिर्णय अमलांत आणा.  युरोप खंडात जर त्या तत्वाप्रमाणें लोकांचे मत अजमावलें जातें, तर येथें का अजमावलें जाऊं नये? या संस्थानिकांच्या सुलतानशाह्या पाहिजेत का? असें विचारा जनतेला.  जनता म्हणजे गुरेंढोरें किंवा निर्जीव चिजा नव्हेत.  जनतेला मन आहे, आत्मा आहे.

जातीय तेढ तुम्हीच निर्माण केली आहे.  गुलमगिरी असली म्हणजे कर्तृत्वाला अवसर नसतो;  मग नौक-यांसाठी भांडणें.  स्वराज्य द्या म्हणजे ही तेढ आपोआप नष्ट होईल.  सूर्य आला म्हणजे अंधार जातो, धुके पळते;  घूत्कार करणारीं घुबडें दडून बसतात.  स्वातंत्र्याचा सूर्य आला म्हणजे जातिनिष्ठ घुबडें अंधारात दडतील.  सारी प्रजा स्वतंत्र पक्षाप्रमाणे ऊडूं लागेल, गाणे गाऊं लागेल.

ब्रिटिश साम्राज्य सरकार हें असें कधींहि करणार नाहीं.  महात्माजींना ही गोष्ट पूर्वी  दिसत नव्हती असें नाही.  परन्तु पुन्हां एकदां खडा टाकून ते बघतात.  त्यानें कांहीं बिघडत नाहीं.  अद्याप साम्राज्य सरकार निगरगट्टच आहे हें जगाला स्पष्ट कळतें.

महात्माजी लिहितात, 'जर हिंदुस्थानवरची पकड ब्रि. साम्राज्य सरकारला कायम ठेवायची असेल, तर ब्रिटिशांना जय मिळावा असें मी इच्छिणार नाहीं.  अर्थात् हे वाक्य मी अत्यंत दु:खाने लिहीत आहे.'

साम्राज्यांतील सारे भाग जोंपर्यंत एकत्र बसूं शकत नाहीत, संपूर्ण स्वातंत्र्याचा आपला हक्क आहे, वाटेल तेव्हा साम्राज्यांतून फुटून निघूं अशा हक्कानें जोपर्यंत बसूं शकत नाहींत, तोपर्यंत हें साम्राज्य नष्ट व्हावें असेंच त्या साम्राज्यातील दडपले जाणारे लोक म्हणणार.

महात्माजींचा सूर आस्ते आस्ते तीव्र होत आहे.  त्यांच्या शब्दांत हळु-हळू वज्राचें सामर्थ्य येत आहे, त्याच्या आधीं गांधी सेवासंघाची महत्त्वाची बैठक भरत आहे.  एक महिना आहे.  हा महिना अत्यंत महत्त्वाचा आहे.  कामगारांनी लढा सुरू केला आहे. रेल्वेचे कामगार असंतुष्ट आहेत.  दडपशाहीस सुरुवात जोरानें होत आहे.  दररोज धरपकडी होत आहेत.  २४ तारखेस श्री सुभाषचंद्रांनी 'दडपशाही निषेधदिन' पाळण्याचें जाहीर केलें होते.  तो ठिकठिकाणीं पाळला गेला असेल असें वाटतें.  असें वातावरण आहे.  रामगड काँग्रेस काय तो आदेश देईल. कुचाची तयारी करून ठेवूं या.  गावोगांव स्वयंसेवकांची नोंद ठेवूं या.  हजारोंच्या संख्येनें तयार राहूं या.  हस्तपत्रके तयार ठेवूं या.  मुंबईला सायक्लोस्टाईल्स काँग्रेसचे कायर्कर्ते विकत घेऊ लागले.  अहमदाबादेच्या बाजूला सत्याग्रहींची नोंद सुरू झाल्याचे कळतें.  महाराष्ट्रा, तूं कोठें आहेस?  तूं केवळ बावळटासारखा पडून राहूं नको.  सूत कांत, रस्ते झाड, खादी खपव.  परन्तु भाई हो, हुशार तयार रहा, असें पदोपदीं सांगण्याचे विसरूं नको.  खानदेशांतील किसानांनो, कामगारांनो, तरुणांनो, बन्धुभगिनींनो, लहानथोरांनो, सत्त्वपरीक्षा आली तर कमी ठरूं नका.  गांवोगांव तयारी ठेवा.  प्रत्येक तालुक्यांत हजार दोन हजार सत्याग्रहींची नोंद तयार पाहिजे.  कातणा-यांची नोंद होत आहे.  खादी घालणा-यांची नोंद होत आहे.  परन्तु मरणा-यांची नोंद होत आहे का? मरणा-यांची नोंद करण्याची जरूरी नाहीं.  हांक कानीं येताच ते नाचत पुढें येतील व होमकुडांत उडया घेतील हे खरें आहे.  तरीहि नि:शंक खात्री असावी म्हणून तालुक्यातालुक्यातून सत्याग्रहींची सेना नोंदवून ठेवा.  शिंग फुंकलें गेलें कीं एकच घोंगाट करून उठा.

--वर्ष २ रें, अंक ४६.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel