जहालांजवळ तुमचें न पटण्याइतकें जर ते हिंसक व असत्य असतील तर त्यांना काँग्रेसमधून काढून लावा.  परन्तु तसेंहि स्वच्छ उघड उघड ठराव मांडून करीत नाहींत.  तुरुंगांत आम्ही शिपायांस असें म्हणत असूं 'आम्हाला ठार तरी मारा.' त्याचें उत्तर असे ' ठार तर मारायचें नाहीं.  छळ तर थांबवायचा नाहीं.' यांत मजा असते.  असली भेसूर मजा सत्य-अहिंसा आज अनुभवीत आहे.  आणि बहुमताच्या जोरावर सारें साजून दिसत आहे.  सत्य व अहिंसेची सारीं ब्रीदवाक्यें झळकवीत, डावपेंच लढवीत बसणें, वक्रमार्गांनी हेतु साध्य करून घेणें मला तरी कसेंसेंच वाटतें. 

या सद्गृहस्थांना मी त्यागमूर्ति गांधीवादी लोकांवर टीका केली म्हणून राग आला आहे.  त्याग अनेक लोक करीत आहेत. गांधीवादी लोकांपेक्षां कम्युनिस्ट लोक त्यागांत कांकणभर अधिकच आहेत अशी माझी अनुभवाची गोष्ट आहे.  तरीहि त्या लोकांवर गांधीवादी कशी टीका करीत असतात, जनतेचे शत्रू, आगलाव्ये वगैरे शिलकी विशेषणें देत असतात, तें या सद्गृहस्थांस माहीत नाहीं का?  त्याबद्दल त्यांनी कधीं वाईट वाटलें का? 

बहुमताच्या कृतीपाठीमागील हेतु स्पष्ट करणें व जनतेस जागें करणें हेंहि एक कर्तव्यच असतें.  काँग्रेसमधील कांही गोष्टींवर टीका केल्याने आम्ही शत्रू होत नाहीं.  कोणी आम्हांला तसें म्हटलें तर आमचें मन आम्हांस ग्वाही आहे.  आम्ही लहान असलों तरी निर्मळ आहोंत.  दंवबिंदु लहान असतो.  परन्तु तो निर्मळ असल्यानें सूर्याचें प्रतिबिंब आपल्या पोटांत साठवूं शकतो.  आणि एकादा तलाव मोठा असून जर गढूळ असेत तर सूर्याचें प्रतिबिंब तेथें पडणार नाहीं.  सत्य अहिंसा कदाचित् एकाद्या लहान माणसाजवळहि थोडी अधिक होण्याचा संभव असतो.  आणि एकाद्या मोठdया माणसाजवळ कमी असण्याची शक्यता असते.

बिहारमधील किसानांमधील झगडणा-या लोकांस राजकीय कैदी कां मानीत नाहीं ?  ते का डाकू आहेत ?  त्यांना का इष्टेटी वाढवावयाच्या आहेत?  राजकारण म्हणजे तरी काय?  सर्व श्रमजीवींच्या पोटाचा लढा म्हणजे राजकारण हा आज अर्थ आहे.  कदाचित् १९३० सालींहि आम्हीं सत्याग्रही खरे राजकीय कैदी नसूं.  कारण शेतकरी, कामकरी स्वराज्य या शब्दानें, स्वातंत्र्याचा स्वच्छ अर्थ त्यांना कळत नव्हता.  आज त्यांना अर्थ कळत आहे.  तहशील कमी होण्यासाठीं, जमीनदारांचे जुलूम बंद होण्या-साठीं, सावकारी पाश तुटण्यासाठी, गिरण्यांमधील नरकसमान परिस्थिति बंद होण्यासाठी, स्वातंत्र्याचा लढा आहे.  हें त्यांना आज समजूं लागलें आहे.  परंतु बिहारमधील या किसान सत्याग्रह्यांची सरदार वल्लभभाईंनी टिंगल केली.  त्या सत्याग्रहांत राहुल सांस्कृत्यांयनांसारखे त्रिखंडपंडित आहेत.  हंसमासिकांत राहुलजींचा परिचय आलेला आहे.  ते गाढे विद्वान आहेत व त्यागी आहेत.  या कैद्यांना राजकैदी माना म्हणून ते पुन्हा पुन्हा उपवास करीत आहेत.  परंतु ते राजकीय कैदी आज ठरत नाहीत.  आम्हांला या गोष्टीचा राग येतो.  वल्लभभाई म्हणाले तुरूंगात तुम्हाला चैन पाहिजे.  मग वाटेल तो सत्याग्रही होईल.  हाल सोसून सत्याग्रही होतो.  हे असले शब्द म्हणजे दु:खावर डागणी आहे.  तुरुंगात पोळी खायला मिळावी म्हणून का राहुलजींचा सत्याग्रह आहे?

हा तत्त्वाचा प्रश्न आहे.  शेतकरी कामक-यांची स्थिति सुधारण्यासाठीं जो सत्याग्रह करतो त्याला डाकूच्या सदरांत घालूं नका.  त्याला मिठाची भाकर द्या.  परंतु त्याला राजकीय कैदी म्हणा असें आमचें म्हणणें आहे.  म्हणून मी म्हटलें  ' आम्हांला हिंसक ठरवतील, देशद्रोही ठरवतील.'  आणि तेंच तर होत आहे.  भारतांतील लेखकांस राग आला.  आमचें लिहिणें अनुदारपणाचें वाटलें.  परंतु गांधीवादी लोकांशी ज्यांचे मतभेद होतात, त्यांना एकदम तुच्छ मानणें, देशद्रोहीं म्हणणें हा अनुदारपणा नाहीं काय?

असो.  लिहावें तितकें थोडेंच आहे.  मला दुतोंडी म्हणा वा शततोंडी म्हणा.  मला त्याची लाज नाहीं, पर्वा नाहीं.  मला कां. चा शत्रू म्हणा, वा मित्र म्हणा;  खादीचा खत्रु म्हणा व मित्र म्हणा.  मरतांना माझ्या ओठांवर काँग्रेस शब्द नाचेल व शेवटच्या श्वासांतून खादी खादी आवाज निघेल.  जिवंतपणी मला काँग्रेसचा शत्रू ठरवलात तरी मेल्यावर मी काँग्रेसचा सच्चा मित्र ठरेन.

किसान कामगारांनो, लाखोंनी काँग्रेसमध्ये शिरा व तिला आत्मसात् करून टाका.  तुम्ही प्रांतोप्रांतीं, जिल्ह्या-जिल्ह्यातून, तालुक्या-तालुक्यांतून जोपर्यंत लाखोंनी काँग्रेसमध्ये शिरणार नाहीं, तोंपर्यंत तुमची बाजू घेऊन भांडणा-यांचे असेच सारे धिंडवडे काढतील.  परन्तु आजचे आमच्यासारखे बहिष्कृत उद्यांचे वारसदार आहेत ही गोष्ट इतिहास जळजळीत वाणींने सांगत आहे व तीच आमची आशा आहे.

-- वर्ष २, अंक १७

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel