धर्माच्या शिंपल्यांत प्रार्थनेचे मोती आहे. हें मोती हृदयाशी धर.  मुसलमानांच्या हातांत प्रार्थना हेच शस्त्र आहे.  प्रार्थना हें त्यांचे बळ आहे. प्रार्थनेंनें पाप मरतें, चुका गळून जातात, वेडेंवांकडें केलेलें सरळ होतें.  प्रार्थना करावी.  आणि उपवास? उपवास म्हणजे क्षुधा-तृषांवर हल्ला आहे.  कर्तव्याचा पंथ आक्रमीत असतां तहानेनें वा भुकेनें खचून जाऊ नयें म्हणून उपवासाची संवय करावयाची.  उपवास म्हणजे विषयभोगांच्या किल्ल्यावरचा जोरदार हल्ला आहे.  आणि यात्रा? आणि यात्रा त्यासाठी करावयाची कीं, त्यामुळें श्रध्दावंतांचे मन उत्पन्न होतें.  यात्रेला जातांना घरदार, प्रेमळ मुलें-बाळें, सर्वांचा वियोग सहन करावा लागतो.  यात्रा संसारातून थोडे अनासक्त रहावयास शिकविते.  घरादाराच्या बंधनांतून थोडा वेळ मोकळें करते.  यात्रेत लाखों लोक एके ठिकाणी येतात व आपण सारे एक ही भावना बळावते.  धर्म ग्रंथाची विस्कळीत पानें यात्रेंत बांधली जातात.  आणि दान कां करावें? दान केल्यानें पैशाचा मोह कमी होता, समानतेचा परिचय होतो ; हृदयाला पावित्र्य लाभतें.  दानानें संपत्तीची आसक्ति कमी होईल, संपत्ति नाही कमी होणार.  प्रार्थना, उपवास, यात्रा, दान हीं सारी आत्म्याला बलवान, करण्यासाठीं आहेत.  असा तुझा धर्म बलवान् असेल तर तूं अजिंक्य होशील.  स्वत:च्या मनाचा मालक हो आणि त्यासाठीं 'हे सर्व शक्तिमान प्रभो ' अशी हांक मार म्हणजे शक्ति मिळेल.

तूं देहावर स्वामित्व मिळवलेंस, म्हणजे दुनियेवर स्वामित्व मिळवशील.  जगांत अंतापर्यंत तुझी कीर्ती राहील.  या जगांत देवाचें राहणें फार गोड आहे. तो पंचमहाभूतांवर सत्ता चालवील.  तो दुनियेचा जणूं जीव होईल.  जो प्रभूच्या छायेप्रमाणें होतो, त्यास सारीं रहस्यें कळतात.  या जगांत जो जन्मतो व जगाचा इतिहास बदलू लागतो, त्याच्या जीवनांत चैतन्याचा सिंधु उसळतो व तो अनंत कर्मद्वारा प्रकट होतो.  तो नवसृष्टी जणू निर्माण करतो.  त्याच्या कल्पनेंतून गुलाबांच्या फुलाप्रमाणें अनंत विश्वें प्रकट होतात.  तो कच्चाला पक्के करतों, अपूर्णाला पूर्ण करतो.  तो बाह्य आकारांना नष्ट करून आत्म्याची भेट करवितो.  त्याचा स्पर्श होतांच प्रत्येक हृदयवीणा निनादूं लागते, गोड संगीत स्त्रवतें.  तो देवासाठीं जागृत असतो.  देवासाठींच झोप घेतो.  तो वृध्दांना नवजवान बनवतो, सर्वांना तारुण्याने व उत्साहानें फुलवतो.  मानव जातीला तो आनंदाचा महान् संदेश देतो, त्याबरोबर धोक्याची घंटाहि वाजवितो.  तो शिपाई असतो, सेनापति असतो, सम्राट असतो.  जो देवाचा   झाला, तो जन्मतांच काळाचा वारू झपाटयाने दौडूं लागतो, त्याच्या रागानें तांबडा समुद्र कोरडा होतो.  तो हाक मारतो, आणि मेलेले खडबडून जागे होतात.  सा-या जगासाठीं तो स्वत: प्रायश्चित्त घेतो.  त्याच्या दिव्यतेंनें दुनिया बचावते.  स्वत:च्या छत्राखाली घेऊन घुंगुरटयाला तो सूर्याची भेट घडवितो.  तो आपल्या संपन्न अस्तित्वानें सारा संसार सारमय करतो.  आश्चर्यकारक रीतींनी तो चैतन्य निर्मितो, कामाची नवीनच दिशा दाखवतो.  त्याच्या पायाच्या धुळींतून भव्य स्वप्नें निर्माण होतात.  जीवनाला तो नवीन अर्थ देतो.  अशांचे जीवन म्हणजे महान् जीवन, वेणूंचे संगीत आहे.  अशी महान् विभूति निर्मिण्यासाठी जीवनांत नव संगीत निर्माण करणा-या अशा थोर विभूतींच्या जीवनाचा मेळ जमविण्यासाठी सृष्टि शतकानुशतकें आटापीट करीत असते.  असा पुरुष या संसारवृक्षाचें गोड फळ आहे.  एक दिवस उजाडेल व असा महापुरुष जन्माला येईल.  आजच्या मातींत उद्यांची जग दिपविणारी ज्योति सुप्त राहिली आहे.  कळींतून गुलाब फुलेल.  ऊद्याच्या ऊष:कालाने आमची दृष्टि सतेज झाली आहे.

हे काळावर स्वार होणा-या दैवी पुरुषा, प्रकट हो.  बदलणा-या अंधारांतील प्रकाशा, ये.  या संसाराला प्रकाशित कर.  राष्ट्राचा गलबला बंद कर.  आमच्या बुबुळांत तूं येऊन रहा.  तुझ्या संगीतानें आमचे कान भर.  बंधुभावाची वीणा नीट लाव व वाजव.  प्रेमाचा पेला आम्हांला पुन्हा भरून दे.  जगाला पुन: शांतीचे दिवस दे.  युध्दपिपासू लोकांना शांतीचा संदेश दे.  मानवी समाज म्हणजे शेतें व त्या शेतांतील तू अमोल दाणा.  तूं मानवी समाजाच्या मुसाफरीचें ध्येय.  हिंवाळा येऊन सारीं पानें गळून गेलीं आहेत.  तूं वासंतिक वा-याप्रमाणे ये व जीवनाची बाग पुन: हसव, फुलव.  आमच्या माना आज खाली आहेंत.  अधोवदन दुनियेचा हा प्रणाम घे.  तूं समोर उभा राहिलास म्हणजे मग आमच्या माना वर करूं ; या जगांतील सारी आग मग आनंदानें सहन करूं.  तूं ये, ये.

-- वर्ष २, अंक २४.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel