सध्यांचे शिक्षणांत मुलांस त्याच्या भावनांस पोषक असें शिक्षण मिळत नाहीं.  ज्या ज्या वेळीं राष्ट्रीय चळवळी निघतात, त्या त्या वेळेस तरुणांची मनें संस्फूर्त होतात व त्या चळवळींत ते जातात.  शाळांमधून जें शिक्षण देण्यांत येते त्या शिक्षणांतच राष्ट्रोद्वीपक भाग असेल, राष्ट्रप्रेमाला पोषक परिस्थिति निर्माण करण्यांत येईल तरच अलीकडे निरनिराळया शाळा-कॉलेजांतून चालक-विद्यार्थी यांमध्ये होणारे तंटे-बखेडे शमतील, तरुणांच्या तरुण वृत्ति मारून त्यांस कोंडून ठेवूं पाहणें याहून घोरतर पातक कोणतें आहे?  परंतु ज्या राष्ट्राला स्वातंत्र्य नाहीं तें राष्ट्र आपल्या शिक्षणांत मुलांच्या देशभक्तीस वाव देऊं शकणार नाही ; कारण सरकार तो अंकुर मारावयासच पाहणार!

अशी सर्व बाजूंनी हलाखीची व निराशेची जरी स्थिति आहे; तरीहि आपल्या देशासाठी थोडें फार आपणांस करिता येईल.  इच्छा असेल तर मार्ग हा सांपडतोच.  जर हिंदुस्थानासाठीं, आपल्या प्रिय भारतभूमीबद्दल तुमच्या मनांत खरें जिव्हाळयाचें प्रेम असेल तर तुम्हांस खरोखर कांही तरी करता येईल.  आपणांस मोठमोठया गोष्टी करता येणार नाहींत.  आणि आपण सवर्च मोठे होण्यासाठी जन्मलेलों नाही.   तरी लहान गोष्टीचेहि मोठे परिणाम होतात.  प्रत्येकानें थोडथोडें केलें तरी काम उठेल.  जें राष्ट्र आर्थिक बाबतीत स्वावलंबी आहे ; जें दुस-याच्या तोंडाकडें हरघडी लागणा-या वस्तूंसाठी पहात नाहीं, तें राष्ट्र सुखी व संतुष्ट असतें.  याचा अर्थ हा कीं आपल्या जीवनाच्या रोजच्या आवश्यक गरजा त्या आपणच सर्व भागवल्या पाहिजेत.  आपणांस लागणा-या वस्तू आपण उत्पन्न केल्या पाहिजेत.  ज्या वस्तू आपणांस उत्पन्न करता येत नाहींत, त्यांची जरूरच आपण निर्माण करूं नये.  आपल्या देशांतील निरनिराळे पदार्थ उत्पन्न करणारे कारागीर, मजूर यांस आपण आधीं आश्रय दिला पाहिजे.  मोडकें तोडकें असले तरी तें माझें आहे, तें मला प्रिय आहे.  मँचेस्टरचा मलमलीचा सदरा व तनु दर्शविणारे धोतर जर माझ्या देशांत होत नाहीं तर मी घेणार नाही;  माझ्या देशातील जाडी पासोडी  हीच मला प्राणांहून प्रिय आहे.  कैलासांत राहणारे भगवान् शंकर यांनी विष्णूचा पीतांबर परिधान केला नाहीं, तर त्याच देशांत हिमालयांत होणारे कपडे परिधान केले.  कोणते हे कपडे?  व्याघ्रचर्म.  श्री शंकरांनी कोणतीं भूषणे परिधान केलीं तर सर्प.  कैलासाहून तो भगवान् पशुपति सर्व हिंदुस्थानास सांगत आहे : 'माझ्याजवळ असणारे सापहि मला प्रिय आहेत, परंतु परकीयांचे माणिक मोत्यांचे हार नकोत.  सर्पाच्या विळख्यापेक्षां परकीयांच्या दास्याचा, परावलंबनाचा विळखा नको. '  पण भगवान् शंकराचा हा कृतिमय उपदेश कोण ऐकतो? आपल्याच देशांत झालेलें आपण प्रथम घेतलें पाहिजे.  आपणां सर्वांनाच शेतांत, कारखान्यांत कामें करणें शक्य नाहीं.  परंतु जे काम करतात त्यांना उत्तेजन देणें, ते जें निर्माण करतात तें खपविणें हे आपलें काम नाही का?  सरकारी नोकरी, वकिली, डॉक्टरी, शिक्षकी हे कांही उत्पादक धंदे नाहींत.  म्हणून नोकरी हे ध्येय ठेवणें फारसें स्तुत्य व स्पृहणीय नाहीं.  वरील सर्व लोक मजुरांच्या, शेतक-यांच्या श्रमावर जगतात.  जे शारीरिक श्रम व कष्ट करून प्रामाणिकपणें जगण्याचा प्रयत्न करतात, त्यांना उत्तेजन देंणें, मदत करणें हें आपलें कर्तव्य आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel