प्रश्न :--  तो कसा?
उत्तर :--  समजा उद्यां सत्याग्रह झाला.  पूर्वीच्या सत्याग्रहापेक्षा तो निराळा होईल.  किसान संघ, कामगार संघ त्यांत सामील होतील.  रेल्वे कामगार सामील होतील.  अशा वेळी शांति व अहिंसा राहील का?  १९३० सालच्या रेल्वे सत्याग्रहाला गाडया उलथून टाकतील, रूळ काढून टाकतील, पूल उडवतील अशी भीति वाटे.  आपण सत्य व अहिंसा मानूनहि ती शक्य होईल का?  अशाच बाबतींत महात्माजींचा व सुभाषांचा मतभेद असेल.  तसेंच महायुध्द सुरू झालें तर प्रतिसरकार एकदम स्थापावें असें सुभाषांचे म्हणणें असेल.  आपलीं कोर्टें, आपल्या कचे-या, आपलीं स्वयंसेवकदलें म्हणजेच पोलीस व लष्करी सैन्य अशा रीतीनें आपलें स्वातंत्र्य एकदम कृतींत आणावयाचे.  सुभाषचंद्रांची ही आवडती कल्पना आहे.  आयर्लंडमध्यें असेच प्रकार झाले.  मंत्रिमंडळांनी प्रांतांत आपलें प्रतिसरकार स्थापता येईल अशा ध्येयानें कारभार हांकावा असें सुभाषचंद्रांस वाटतें.  काँग्रेस कमिटयांस महत्त्व दिलें पाहिजे.  पाटील, मामलेदार, कलेक्टर यांच्या इतकेंच किंबहुना त्यांच्याहूनहि जास्त महत्त्व ग्राम, तालुका व जिल्हा कां. कमिटयांस मिळावें असें त्यांना वाटतें.  स्वयंसेवकदलें ठायीं ठायीं हवींत.  परंतु आज असें कोठें आहे?  सरकारी अधिका-यांचेच रिपोर्ट अद्याप महत्त्वाचे मानले जातात.  सुभाषचंद्रांच्या या कल्पना महात्माजींस कदाचित् पसंत नसतील. पॅरलल् गव्हर्मेंट, प्रतिसरकार आपण स्थापन करूं. पाहूं तर!   इंग्रज रक्तपात करील.  लष्करी कायद्यांचा धिंगाणा सुरू होईल.  लोकहि शांत रहाणार नाहींत असें त्यांस वाटलें असेल.  किंवा शत्रूची अडचण ती आपली संधि ही विचारसरणीहि महात्माजींस मान्य नसेल.  कारण त्यांत खरें सामर्थ्य नाहीं.  जी गोष्ट ख-या सामर्थ्यावर अधिष्ठित नाहीं, ती तात्पुरती आहे.  महात्माजी पत्रव्यवहारांत लिहितात, 'राजकीय व आर्थिक बाबतींत तुमचें आमचें पटेल असें वाटत नाही.  सहकार्य कसें व्हावें   दोन भिन्न प्रवाह आहेत.  तुम्ही विचारप्रसार करा.' तुमच्याजवळ मी जें बोलतों आहें तें माझ्या कल्पनेने; कोठें विरोध आहे तें स्पष्ट केलें नसल्यामुळें.  जो तो आपला तर्क चालवितो.  राष्ट्रीय उद्योगीकरणाच्या समितीचे कार्यवाह श्री. कामत यांनी मागें सुचविलें होतें कीं, 'त्रिपुरीच्या आधीं बार्डोलीस जी वर्किंग कमिटी भरली, जेथे कांही एक ठरलें नाहीं, तेथें महत्त्वाचे प्रश्न चर्चिले गेले असावेत.  महात्माजी व सुभाष यांच्यामध्यें कोठें स्पष्ट मतभेद आहेत तें जनतेला कळलें पाहिजे; त्या चर्चा प्रसिध्द व्हाव्या.' परन्तु तसें कांहीं एक झालें नाहीं.

प्रश्न :--  फेडरेशन घेतलें जाणार का?
उत्तर :--  ठराव तर त्रिपुरीला स्पष्ट आहे.  घटनासमितीमार्फतच आम्ही आमची योजना बनवूं.

प्रश्न :-- हल्ली वल्लभभाई वगैरे सारे म्हणत आहेत कीं, 'राष्ट्राची तयारी नाही.. शिस्त नाही. सख्य नाहीं. अहिंसेचा अस्त दिसतो. सरकारला आव्हान कसें द्यावें.  आम्ही दुबळे झालों आहोंत.' या म्हणण्याचा इत्यर्थ असाच नाहीं का कीं, फेडरेशनला विरोध कसा करावा? शक्तिहीन झाल्यामुळें येईल तसें घ्यावें;  पुढें पाहू.
उत्तर :--  मला असें वाटत नाही. राष्ट्रानें सावध व्हावें, दक्ष व्हावें म्हणून ही सूचना आहे.  शिवाय महात्माजी कधीं एकदम सत्याग्रह जाहीर करतील त्याचा नेम नाही. ३० सालच्या सत्याग्रहाबद्दल ते म्हणाले होते, 'कोणाला असें माहीत होतें की सारें राष्ट्र उठेल? परन्तु ईश्वराची तशी इच्छा होती.  सारें राष्ट्र पेटलें.'  ३० साली महात्माजींस राष्ट्राची खात्री नव्हती, तरी ते उठले.  तसेच ३९-४० सालीं होईल.  तेजोभंग करण्याचा त्यांचा हेतु नाहीं.  परन्तु अधिक संघटित व्हा, हिंसेचा प्रचार नका करूं, असें ते म्हणत आहेत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel