रणार्थ आव्हान

रणनौबदींनो तुम्ही वाजा; रणशिंगानों कानठळया बसणारा आवाज काढा.  सर्व घरांच्या खिडक्यांतून, दारांतून तुमचा प्रचंड ध्वनि आंत घुसूं दे.  ती देवळांत कसली धमर्परिषद चालली आहे, कसलें प्रवचन चाललें आहे? हा आवाज तेथें घुमूं दे व सभा उधळून लावूं दे.  असल्या सभा भरवण्याची वेळ नाहीं आतां.  आतां देशासाठीं मरणाची वेळ येऊन ठेपली आहे.  ते पहा, विद्यार्थी  पुस्तके वाचण्यांत, अध्ययन करण्यांत गुंग आहेत.  हा आवाज त्यांच्या कानांत शिरूं दे.  ही अभ्यासाची वेळ नाहीं.  देश स्वतंत्र झाल्यावर मग अभ्यास.  तो पहा एक तरुण.  तो म्हणतो, माझें नुकतेंच लग्न झालें आहे.  कसलें आणलें आहे लग्न. देशासाठीं चल, बाहेर पड.  ही वेळ सुखविलासाची नाहीं, घरांत गप्पा-विनोद करण्याची नाहीं.  तो पहा शेतकरी, शेतांत नांगरीत आहे.  धान्य कोठारांत सांठवीत आहे.  चला, त्यालाहि ओढा. आतां सगळयांना एकच काम--लढाईवर चला.  वाजा, रणनौबदींनो, भयंकर रीतीनें वाजा, आकाश भरून टाका; रणशिंगांनों, वाजा, फुंका.

वाजूं दे.  रणनौबदा झडूं दे.  रणकर्णे घुमूं दे.  तुमुल नाद होऊ दे.  शहरांतली देवघेव अजून बंद नाहीं का पडली?  अजून गाडीवाले गाडया हांकीत आहेत, माल विकीत आहेत!  छे, गाडया हांकण्यांस माल देण्या-घेण्यास कोणी नको!  चला--सर्वजण चला.  गाडयांच्या चाकांचा आवाज बंद पडूं दे.  ते पहा रात्रींची निजण्याची तयारी करूं लागले!   कसलें रे निजतां?  लाज नाहीं वाटत?  तुमच्या डोळयांवरची झोंप उडून गेली पाहिजे. चला, गुंडाळा ते बिछाने व बाहेर पडा.  ते पहा, मालाचा सौदा करीत आहेत, किंमतीची घासाघीस करीत आहेत.  ते पहा दलाल लोक; ते पहा, उद्यां कपाशीचा भाव काय होईल वगैरे अंदाज करणारे लोक.  चला ओढा सर्वांना.  रणांगणावर आधी चला.  काय?  अजून गप्पीदास गप्पाच मारीत बसले आहेत?  व्याख्यानबाजी करणारे व्याख्यानेंच झोडीत बसले आहेत?  आपल्या झिरमिळयांच्या पगडया सांवरीत हे वकील कोर्टात जाऊन आपल्या पक्षकाराची अजून तरफदारी करण्यांत दंग आहेत?  काय, हे गाणारे अजून गाण्याच्या मजलसीच भरवीत आहेत?  छे : हें काहीं नाहीं उपयोगी!  वाजा, नौबदींनो वाजा; रणशिंगांनों घुमा. जितकी शक्ति असेल त्या सर्व शक्तींने वाजा, आवाज करा, तुमचा आवाज ऐकून सर्व बाहेर आले पाहिजेत!

वाजा, रणनौबदींनो भयंकर गर्जना करा; शिंगें-कर्ण्यांनो, कानठळया बसवा; वाजा!  अरे त्याच्याजवळ वादविवाद काय करीत बसलांत? ही काय वादविवादाची वेळ आहे?  अरे त्याची कानउघाडणी करण्यांतहि वेळ दवडूं नको.  बोलायला वेळ नाहीं ; उदंड कामें पडलीं आहेत.  चला, एकदम ओढा सर्वांना.  काय रे म्हणतो तो? म्हणे मी भित्रा आहें - असशील भित्रा ; चल.  शूरांची कृत्यें पाहून तूंहि शूर होशील.  हे पहा रडुबाई, डोळयांत पाणी आणून म्हणतो ' मला नका रे नेऊं'! नका रे नेऊं म्हणजे? चल,  नीघ, तो पहा हात जोडून विनवण्या करीत आहे!  ओढा त्याला;  खेंचा.  ते पहा वृध्द गृहस्थ-ते त्या तरुणाला म्हणत आहेत 'नको रे आम्हांस सोडून जाऊं'! नाहीं-ही वेळ त्या म्हातारबोवांच्या केवीलवाण्या प्रार्थना ऐकण्याची नाहीं.  ओढा त्या तरुणाला.  तें पहा लहान मूल म्हणत आहे 'माझ्या बाबांना नका नेऊं. मग मला कोण?  आईला कोण? ' ऐकूं नका रे करुण शब्द. देव त्यांची काळजी घेईल.  प्रथम देश - मग मुलेंबाळें!  ओढा त्याला.  ती पहा प्रेमळ माता डोळयांस पदर लावून म्हणत आहे, 'नका गायवासरांची ताटातूट करूं ; नका माझा प्राण नेऊं, नका माझा आधार नेऊं.  लहानपणापासून याला अंगाखांद्यावर वाढवला, दूध दिलें,'  रात्रंदिवस यांची खस्त खाल्ली.  तें सर्व यानें मला म्हातारपणीं सोडून जावें, यानें रणांगणावर मरावे, त्याला कोल्ह्याकुत्र्यांनी खावें - म्हणून का रे  नका रे चांडाळांनो, माझा प्राण नेऊं--' छे : ऐकूं नका या सुक्या शब्दांना.  आयांचा हा मोह आहे.  त्यांनी आपण होऊन पुत्रांना लढाईवर पाठविलें पाहिजे.  ओढा त्याला.  आजचा प्रसंग असा आहे कीं, सर्वांनी घरें दारें, आप्तमित्र, बायकापोरं सोडून गेलेंच पाहिजे.  रणवाद्यांनो, तुमचा नाद एवढा प्रचंड होऊंदे कीं, मेलेले खडबडून जागे व्हावे व त्यांनी दंड थोपटून लढाईसाठी धांवत यावें!  होऊं दे भयंकर रणनाद!  वाजा, गर्जा, चला सारे! देश - देश - माझा, आपला देश - चला - वंदे मातरम्.

--विद्यार्थी मासिकांतून.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel