६ दुतोंडी लेखणी

धुळे येथील भारताच्या २५ जुलैच्या अंकांत 'मा. वा. ना.' नांवाच्या लेखकांनी मला अहिंसेच्या बाबतींत कांठावरहि पास होणार नाहीं असें सांगितलें आहे.  त्यांच्या या सूचनेबद्दल आभारी आहे. परीक्षक ते नसून परमेश्वर असल्यामुळें मला भीति वाटण्याचें कांहींच कारण नाहीं. काँग्रेस पत्रांतील लेख वाचून त्यांनी विसंगति दाखविली आहे. आणि भावनाप्रधान माणसाकडून विसंगतीशिवाय दुसरें काय मिळणार असें सुचविलें आहे. 

या सद्गृहस्थास सुचवावेंसे वाटतें कीं जगांतील माझ्यासारखे क्षुद्र लोक तर बाजूलाच ठेवा.  ते चंचल म्हणून सोडून द्या प्रश्न.  परन्तु जगांतील जेवढे महापुरुष झाले व आहेत त्यांच्या प्रत्येक उद्गारांत सुसंगतीच दिसेल का? लो.टिळकांचे केसरींतील लेख वाचूं तर परस्परविरोधी शेंकडों वचनें काढून दाखवितां येतील.  महात्माजींच्या लेखांतून काढतां येतील.  त्या विसंगतींतहि एक प्रकारची सुसंगति असते.  आणि आपण त्या सर्वांचा समन्वय करीत असतों.  निरनिराळया परिस्थितींत, निरनिराळया प्रश्नांकडे लक्ष ठेवून त्या त्या क्षणीं आपण बोलत असतों. जेव्हा आज्ञाधारकपणावर व्याख्यान कोणी देतो तेव्हां त्यावर जोर देतो.  जेव्हां बुध्दिस्वातंत्र्यावर देतों तेव्हां निराळें बोलतों.  विवेकानंद एकदां म्हणाले, ' Play foot-ball and you will get God. फुटबॉल खेळा म्हणजे देव मिळेल.'  तर दुसरीकडे ते सांगतील, 'ईश्वराचे स्मरण करीत जेव्हां वेडे व्हाल तेव्हां देव भेटेल.' मनुस्मृतींत 'न स्त्री स्वातंत्र्यमर्हति ' असेंहि वचन आहे.  व ' यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता: ' असेंहि वचन आहे.  हे मा. वा. ना. जगांतील महान् विभूतींचे सारे उद्गार, सारें लिहिणें जर वाचूं लागतील तर त्यांना म्हणावें लागेल कीं, त्यांची लेखणी शततोंडी होती.

जीवनाचा विकास अनेक रीतींनी होत असतो.  वटवृक्षासारख्या प्रचंड वृक्षाला फांटेहि खूप फुटतात.  त्यांतच त्यांचें वैभव आहे.  धुळयाच्या मित्रांना हे वटवृक्षाचे फांटे आवडतात का?  त्यांनीं वटवृक्षास सांगावे 'एक फांदी इकडे, एक फांदी तिकडे  -  हा काय चावटपणा, असा सहस्रतोंडी काय होते? ही अहिंसा नव्हे.' वटवृक्ष काय उत्तर देईल?  मला माहीत नाही.  परन्तु मला खांडावयास या.  'मा.वा.ना.' गृहस्थांनी जशी लेखणी हातीं घेतली आहे, तशी वटवृक्षास खांडावयास कु-हाड घेतील का?  त्या वटवृक्षाच्या फाटयांतून त्याचें विकासवैभव प्रकट होत असतें.  एकच जीवनरस सर्व फाटयांतून खेळत असतो.       

नदी समुद्राकडे जाते.  तिला जर म्हणाल, ' सरळ जा '  तर ती म्हणेल मी मरतें.  ती कडयावरून उडया घेत, कधीं रडत, कधीं हसत, कधीं सरळ, कधी वांकडी अशी जाते.  परन्तु समुद्र तिला पास करतो; प्रेमानें हृदयाशीं धरतो.  मनुष्यांचे जीवन असेंच आहे.  ते दिसावयास विसंगत दिसलें, वेडें-वांकडे दिसलें, तरी आंत प्रबल सरलता असते. ती समुद्रास भेटू इच्छित असते.  सर्व धडपडींतून, सर्व विसंगत उक्तींतून दिव्यतेकडे जाण्याची, ध्येयाकडे जाण्याची एक अविचल वृत्ति असते.

इथलें एक वाक्य घेऊन तिथलें एक वाक्य घेऊन सत्य हातीं लागत नसतें.  आणि सारीं वाक्यें घेऊनही सत्य हातीं लागणार नाहीं.  ते सारे अवयव जोडून एक रक्त जेव्हां खेळू वाहूं लागेल तेव्हा जिवंत जीव मिळतो.  त्याप्रमाणे माणसांची येथलीं वाक्यें व तेथलीं वाक्यें घेऊनहि सत्य सापडणार नाहीं.  त्या माणसाची जी एक तळमळ असते, ती तळमळ हातीं घेऊन जेव्हां त्याचीं सारीं वाक्यें तपासूं तेव्हां त्यांत सुसंगतीचाच सूर दिसेल, वेडयावाकडया, चंचल, उच्छृंखल, भावनाप्रधान, नदीच्या हृदयांतील सागराला भेटण्याची एकतानता दिसून येईल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel