काँग्रेसचे हेंच धोरण आहे.  संस्थानें जागी होऊं देत.  संस्थानी सेवक विधायक कामें करीत फिरूं लागूं देत.  हालचाल किसानांत सुरू होऊं दे.  संस्थानी तमाम जनता उठाव करूं दे.  मग काँगेस आपलें बळ त्यांत ओतील.  स्टेट काँग्रेसला हा सल्ला महात्माजींनीं दिला.  त्यांनी सांगितलें, '' खादी खपवितांना अटक झाली तर खटला लढवा. विधायक काम फुकट जाणार नाहीं.  पुढें सत्याग्रह करावा लागला तर तो शतपटींने जोमदार होईल.  आमची जनता त्यांत भाग घेईल.  खेडोपाडीं जागृत होऊन त्यांत उडया घेतील. ''

काँग्रेसची ही अशी दृष्टि खोल आहे.  त्यांत खोलपणा आहे, मूलग्राहीपणा आहे.  क्षणभर दिपवणारा विजेचा लखलखाट तिला नको.  विजेचा चकचकाट आकाशांत होतो.  परन्तु पाऊल टाकावयास प्रकाश मिळत नाहीं.  असला झकपक प्रकाश काय कामाचा.

भारतीय जनता काँग्रेसचा आत्मा ओळखते.  काँग्रेस तात्पुरत्या स्वार्था-साठीं कांहीं करीत नाहीं.  उद्यां निवडणुकींत आपलें काम होईल अशा क्षुद्र काळजींने ती बुध्दीस न पटणारी गोष्ट करणार नाहीं.  पुढें निवडणुका आल्या तर महाराष्ट्रांत काँग्रेस टिकणार नाहीं, असे कोणी म्हणतात.  परन्तु महाराष्ट्र म्हणजे पुणें, नाशिक, नगर नव्हे;  महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रांतील हजारों खेडीं.  ही खेडीं ह्या गोष्टींपासून अलिप्त आहेत.  खेडयांत काँग्रेसनिष्ठा वाढतच आहे.  जनतेला स्वातंत्र्य मिळवून देणारी काँग्रेस कोणास भीत नसते.  ती योग्य वेळीं योग्य तें करीलच करील.  जनतेची ही खात्री आहे कीं, '' कोणी कांही अधिकांत अधिक आपलें हित करील तर ती काँग्रेसच करील. ''

हिन्दुमहासभेला पुढील निवडणुकींची का स्वप्नें पडत आहेत?  परन्तु त्याच्या आधीं भारतांत सत्याग्रहाचा प्रचंड झगडा सुरू होण्याचा संभव आहे.  असेंब्लीच्या ऐवजीं लाठीमार, गोळीबार, लष्करी कायदा, फांस यांतून जावें लागेल.  त्या वेळेस महान् काँग्रेस संस्था ऊभी राहील.  तिचें लक्ष खुर्चीवर, मतावर नाहीं.   तिचे लक्ष फांसावर आहे.  राष्ट्र नेहमीं मला मत देईल ही तिची श्रध्दाच आहें;  कारण राष्ट्रसभेनं अनंत बलिदान केलें आहे व पुढे करावयास ती उत्सुकतेंने तयारच आहे!

-- वर्ष २, अंक ५

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel