मी आहे कान!
खरं म्हणजे 'आम्ही आहोत' कान!
कारण आम्ही दोन आहोत!
आम्ही जुळे भाऊ आहोत.
पण आमचं नशीबच असं आहे की आजपर्यंत आम्ही एकमेकांना पाहिलेलंही नाही.
कुठल्या शापामुळे आम्हांला असं विरुद्ध दिशांना चिकटवून पाठवून दिलंय काही समजत नाही.

कधी सुपासारखे कधी चिकटलेले कधी आखूड कधी लांब वर्णन तर बघा आमचे किती छान....

दुःख एवढंच नाही,
आमच्यावर जबाबदारी ही फक्त 'ऐकण्याची' सोपविली गेली
शिव्या असोत की ओव्या,
चांगलं असो की वाईट,
सगळं आम्ही ऐकतच असतो.

हळूहळू आम्हाला 'खुंटी' सारखं वागविलं जाऊ लागलं.
चष्मा सांभाळायचं काम आम्हांला दिलं गेलं.
फ्रेमची काडी जोखडासारखी आम्हांवर ठेवली गेली.

लहान मुले अभ्यास करीत नाहीत किंवा त्यांच्या डोक्यात काही शिरत नाही तेव्हा  पिरगळतात मात्र आम्हांला!
एवढेच नव्हे मुलीच्या भावाला ही आम्हांला च पिरगळलायला लावतात सगळी जबाबदारी आमचीच का हो ..

भिकबाळी, झुमके, डूल, कुडी हे सर्व आमच्यावरच लटकविलं जातं.
त्यासाठी छिद्र 'आमच्यावर' पाडावी लागतात, पण कौतुक होतं चेह-याचं!

आणि सौंदर्य प्रसाधने पहाल तर आमच्या वाट्याला काहीच नाही.
डोळ्यांसाठी काजळ, चेह-यासाठी क्रीम, ओठांसाठी लिपस्टिक!
पण आम्ही कधी काही मागीतलंय?

हे कवी लोक सुद्धा तारीफ करतात ती डोळ्यांची, ओठांची, गालांची!
पण कधी कुठल्या साहित्यिकाने प्रेयसीच्या कानांची तारीफ केलेली ऐकल्ये?

कधी काळी केश कर्तन करताना आम्हाला जखमही होते. त्यावेळी केवळ डेटाॅलचे दोन थेंब टाकून आमच्या वेदना अजून तीव्र केल्या जातात.

तर सर्दीबाईला आम्हीच आमंत्रण देतो म्हणे ही ओरड असतेच आता या कोरोनाने तर शिक्कामोर्तबच..,.

सुंगध सुवास दुर्गंध हे जरी नाकाचे काम असले तरी पंचज्ञानेंद्रियाचा मान यात ही आमचा सहभाग अदृश्य ठेवावा लागतो ...त्रिमितीय नजरेत डोळ्याची भूमिका कौतुक त्याचे पण ध्वनीची संवेदना आम्हांलाच साधावु लागते हो ...बघा पुन्हा चुरुचुरु बोलण्याचे वरदान जिभेला असले तरी आमची आवाजाची चाहूल नसेल तर ती निष्प्रभ च....!!

किती गोष्टी सांगायच्या? पण दुःख कुणाला तरी सांगितले तर कमी होते असे म्हणतात., टेलरची पेन्सील सांभाळणे, मोबाईलचा ईअरफोन सांभाळणे ह्या मध्ये आता 'मास्क' नावाच्या एका नवीन गोष्टीची भर पडली आहे.हलक्या हलक्या कुरुबुरी , मनातली हितगुजे ...असे कितीतरी...पुन्हा पिचक्या हलक्या कानाचा म्हणून आम्हांलाच दुषणे,,.अहो किती किती म्हणून सहन करायचे ते.,.पटतय ना!!!

आणा, अजून काही नवीन असेल आणा टांगायला. आम्ही आहोतच खुंटीसारखे सर्व भार सांभाळायला!..

पण तुम्ही हे आमचं मनोगत ऐकून हसलात ना? असेच हसत राहा.

सहजच सुचलेलं मनातलं कानापर्यत पोहचत शब्दांत उतरलेलं मनोगत कानांच....!!

आवडलं तर मनातल्या मनात जरूर हसा...!!

© मधुरा धायगुडे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel