पिता धर्मः पिता स्वर्गः पिता हि परमं तपः
पितरि प्रतिमापन्ने प्रीयन्ते सर्वदेवताः

पित्याचे वर्णन करतांना त्याची तुलना स्वर्गा समान केली आहे. आपल्या संस्कृत सुभाषितांचा आधार घेतला तर पित्याचे स्वरूप देवा समान आहे. बदलत्या काळानुसार पित्याची भूमिका बदलत असेल पण त्याचे स्थान पुरातनकाळापासून अबाधित आहे.

ज्यांच्यामुळे आपण हे जग पाहू शकलो या "बाबा' "पिता' या व्यक्‍तिरेखेविषयी लिहताना प्रथम विचार येतो तो त्यागाचा त्याग समर्पण म्हणजे "बाबा'!
"स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' म्हटले, तरी बाबांचे महत्व तितकेच आहे फक्‍त आई इतका हळवेपणा बाबांच्या व्यक्‍तिरेखेत त्यांच्या स्थितप्रज्ञ भूमिकेमुळे आपण बघितलेला नसतो. म्हणून बाबा दुर्लक्षित इतकेच.
बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार या व्यक्‍तिरेखेची प्रतिमा ही बदलत गेली. संदर्भ बदलले पित्याचे स्वरूपही बदलले पण मूळ भावनिक साचा तोच आहे. कारण धग तिथे धगधग, ओलावा जिथे प्रेम हाच आधार पिता या व्यक्‍तिरेखेलाही लागू पडतो.

मराठी साहित्यातील पिता या व्यक्‍तिरेखेचे बदलते स्वरूप बघायला मिळेल. अनेक साहित्यिकांनी आपल्या बापलेक किंवा वडिलांविषयी आपल्या नात्याचा उलगडा वेगवेगळ्या पद्धतीने केलेला दिसेल. पण शेवटी वडिलांनाही एक संवेदनशील मन असते. हीच भावना निष्कर्षापर्यंत येते कधी प्रेमळ, तर कधी शिस्तप्रिय, कधी तापट, तर कधी तटस्थ वाटणाऱ्या आपल्या पित्याचे विविध पैलू गुण-दोष मांडलेले बघायला मिळतात. पण "पिता' ही भावना कायम कालखंड बदलला तरी तशीच निर्वीवाद.

आधुनिकतेचा प्रसार होताना पित्याला कधी एकटे राहूनही आपली भूमिका पार पाडावी लागते. विचारांच्या तफावतीमुळे विभक्‍त झालेल्या पित्याची भूमिका जबाबदारीने पार पाडावी लागते तर उलट घरापासून नोकरीच्या निमित्ताने कायम लांब राहणारा पिता आपल्या कुटुंबाप्रती जबाबदाऱ्या पार पाडताना कुठे काकणभरही कमी पडत नाही केवळ सहवास दुर्लभतेमुळे नात्यामधील भावनिक धागा थोडाफार धुसर होऊ शकतो पण तरीही हा स्थितप्रज्ञ पिताही काही कमी महत्वाचा नाही.

तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीचा विचार केला तर वैज्ञानिक तंत्राचा आधार घेऊन "बाप' झालेल्या पित्याची भूमिकाही आव्हानात्मक म्हणावी लागेल. व कौतुकास्पदच तर याउलट "दत्तक' घेऊन बाप होण्याचा सन्मान मिळवणारा पिता नकळत पुण्यकर्मच करतो. मग "पिता' म्हणून आपली भूमिका वठवताना तो कुठेही नक्कीच कमी पडत नाही पुन्हा एकदा तेच "पिता' म्हणून "भावनिक साचा' तोच असतो. पिता एक आधार म्हणूनच आपण त्याकडे पाहतोय, पाहात आलोय अन्‌ पाहणार ती एक आपली भावनिक बांधिलची मनाने, संस्काराने, संस्कृतीनुसार दाखवून दिलेली एक आत्मिक भावना म्हणजे पिता. ती आपल्या मनात कायम राहील.

स्त्रीवरील लेखन करतांनाही "बाप' या व्यक्‍तिरेखेलाही आपण विसरत नाही आहोत त्यांचा एक बापलेक या नात्याने सन्मान या पितृदिनी करता आहोत. हे त्याचेच उदाहरण नाही का! तुमच्या, माझ्या सर्वांच्या मनात असलेली ही पित्याची प्रतिमा एक पिता म्हणून बदलत्या काळानुसार आदर्शही बदलत जातात हा विचार केला तर एक उत्तम व्यक्‍तिमत्व म्हणून आरोग्यदायी हसतमुख पिता हा आदर्श बघताना ही भावनिक साचा तोच आदर्श बदलले तरी पिता म्हणून धर्म, त्याग सर्व देवतांच्यावर त्याचे आपल्या मनात कायम स्थान असावे हाच वरच्या सुभाषितांचा गाभा आहे. मग माते बरोबर पित्याचे स्थानही आपल्या मनात तेवढेच अधोरेखित होणे गरजेचे. "पिता' या व्यक्‍तिरेखेला अभिवादन!

©मधुरा धायगुडे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel