आई मुलाला चिमण्या, कावळे दाखवीत जेवविते. तुलसीरामायणात राम बर्फीचा तुकडा कावळ्याला दाखवतो व तो त्याला पुढे पुढे आणतो असे मनोरम वर्णन आहे. सेवादलाची मुले जर जंगलात आठ दहा दिवस राहतील तर पक्ष्यांची सुरेल सृष्टी त्यांच्या परिचयाची होईल. आणि कधी रात्री वाघ दिसेल, तरस दिसेल, कोल्हा दिसेल. कधी जवळून सळसळ करीत साप जाईल. अनेक अनुभव येतील. जीवन अनुभवाने समृध्द करणे याहून महत्त्वाचे दुसरे काय आहे?

अलीकडे सेवादलाचा विचार करताना माझ्या मनात अनेक गोष्टी येत असतात. ज्या गावात सेवादल आहे, त्या गावात सुंदरशी फुलबाग असायलाच हवी. सेवादलाने लहानशी वा मोठी जागा मिळवावी. तेथे खेळ, तेथे गाणी. तेथे त्यांची बाग. तेथे फळभाज्या. खेडयापाड्यांतून कोठेही सुंदरशी बाग नसते. सायंकाळी लोक जेथे घटकाभर जाऊन बसतील, अशी एक तरी रमणीय जागा गावात नको का? सेवादलाने सौंदयाचे उपासक व्हावे.

सौंदर्य दोन प्रकारचे आहे. आंतरिक व बाह्य. जीवनात सुंदरता कशाने येईल?  सत्याने येईल, सेवेने, प्रेमाने येईल. आपण ज्या वेळेस खोटे बोलतो, त्या वेळेस आपण सुंदरता गमावतो. मुखावरची प्रसन्नता जाते. हृदय वाकडे होताच तोंड वाकडे होते. इमर्सन म्हणून अमेरिकन लेखक होऊन गेला. तो लिहितो, ''तुमचे सारे अंतरंग तुमच्या मुखावर लिहिलेले असते.'' महात्माजी सौंदर्याच्या रूढ अर्थाने सुंदर नसतील, परंतु त्यांच्या तोंडावरचा आनंद, त्यांच्या तोंडावरील प्रसन्न असीम होती. सत्याचे ते सोज्ज्वल प्रतिबिंब असे. आणि तुम्ही प्रेम करीत असाल तर तुमचे डोळे किती गोड दिसतात, तुमच्या मुखावर कशी कोवळीक असते! सत्य, शिव, सुंदर असे शब्द आपण वापरतो.  ज्या मानाने जीवनात सत्य, शिव आणाल त्या मानाने सुंदरता येईल.

समाजात बाह्य घाण आहे आणि विषमतेची घाण आहे. बाहेरचा केरकचरा वगैरे घाण दूर करून तेथे आपणास सुंदरता आणायची असते. समाजातील विषमतेची कुरुपताही दूर करीत सर्वांच्या संसारात सुंदरता आणायची असते. असे खरे कलावान फार दुर्मिळ. आज समाजात कुरुपता फार आहे. लाखो लोकांना रहायला घर नाही, सोन्यासारख्या मुलांचे संगोपन होत नाही. ही कुरुपताही दूर करायची आहे. सौंदर्याची उपासना, समाजात अन्तर्बाह्य सौंदर्य निर्माण करणे, हेच मानवजातीचे परम प्राप्तव्य होय. सेवादलाच्या सैनिकांनी जीवनात सुंदरता आणावी, बाहेरची घाण दूर करून आपापल्या चाळीत सुंदरता आणावी, फुलबागा, फळबागा कराव्यात, निर्मितीचा आनंद लुटावा; आणि पुढे समाजातील अन्याय जावा, विषमता जावी, सर्वांच्या जीवनकळयांचा सुंदर विकास व्हावा म्हणूनही निर्मल सुंदर साधनांनी झगडावे, धडपडावे.

आज भारताची सत्त्वपरीक्षा आहे. भारत सर्वांना जवळ घेणार की तोही इतरांप्रमाणे संकुचित होणार? ज्यांना जायचे असेल त्यांनी जावे. परंतु जे राहू इच्छितात त्या सर्वांना आम्ही प्रेम देऊ. सर्वांना मानव म्हणून वागवू. चतकोरातला नितकोर तुलाही देईन, ये. असे आपण म्हणू या. भारतमाता प्राचीन कालापासून सत्त्वाला जागली. हरिश्चंद्र, दाशरथी राम, शिबी, श्रियाळ सारे सत्त्वाला जागले. भारत का ती थोर परंपरा घालवणार? आपण होऊन कोणासही त्याच्या इच्छेविरुध्द दूर नका लोटू. उलट तो जाऊ लागला तर आपणास वाईट वाटावे. आपला त्याला विश्वास वाटला नाही म्हणून तो जात आहे असे मनात येऊन डोळ्यांत पाणी यावे. सुधा, माझ्या मनात असे विचार येतात. कसोटीच्या वेळेसच जपावे लागते दहा हजार वर्षांचे भारताचे पुंजीभूत सत्त्व- ते गमावून उपयोगी नाही. ते गमावू तर जगण्यात काय अर्थ? मागे पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले होते, ''प्राचीन काळापासून भारताने थोर ध्येयांची उपासना केली आहे. ती ध्येये नसतील तर सारा अंधारच होईल!''

तुला त्या एका बुध्द साधूची गोष्ट माहीत आहे? एकदा एका गावी दुष्काळ आला. त्या गावात एक साधू राहात असे. लोक त्याला जेवायला देत असत. साधूच्या मनात आले, ''दुष्काळात आपला बोजा कशाला?'' पहाटे उठून तो निमूटपणे निघाला. सकाळी गावक-यांना कळले की साधू गेला. त्याच्या शोधार्थ मंडळी धावली. साधू भेटला. ''महाराज, परत चला.'' लोक म्हणाले. साधू म्हणाला, ''तुमचाच संसार नीट चालण्याची अडचण. माझा भार कशाला?'' लोक म्हणाले, ''आमच्या चतकोरातील नितकोर तुम्ही घ्या परंतु जाऊ नका, आमच्या गावचे सत्त्व जाईल. दुष्काळात साधूला दवडले असे म्हणतील.'' तो साधू पुन्हा परत आला. 'Soul of  Burma' ब्रह्मदेशाचा आत्मा म्हणून एकाने ब्रह्मदेशावर हे पुस्तक लिहिले आहे. त्यातील ही गोष्ट आहे.  'Soul of  Burma' भारताचा आत्मा म्हणून एक पुस्तक लिहावे असे १९३२ पासून ती गोष्ट वाचल्यापासून माझ्या मनात आहे. शेकडो लहानसान गोष्टींतून व्यक्तीचा वा राष्ट्राचा आत्मा प्रगट होत असतो. कित्येक वर्षांपूर्वी दीनबंधू ऍण्ड्रयूज यांनी आफ्रिकेतील एक अनुभव लिहिला होता. दक्षिण आफ्रिकेतील त्या गरीब वस्तीत हिंदी श्रमजीवी राहात असत. कोणत्या तरी रोगाची साथ आली होती. दीनबंधू त्या वस्तीची पाहणी करण्यासाठी गेले होते. सर्वत्र दलदल होती. लहान लहान झोपड्यांतून सारे ओलसर नि दमट. चिखल होता. झोपड्यांतून चिखलावर फळ्या घालून कशी तरी मुले झोपवलेली होती. दीनबंधू एका झोपडीत गेले. एका कोप-यात मुले कशी तरी झोपवलेली होती. जी थोडीशी कोरडी जागा होती, तेथे देवांची जागा होती. तेथे नीरांजन लावलेले होते, उदबत्ती होती दीनबंधू म्हणाले, ''त्या दरिद्री झोपडीत उदात्ततेचे दर्शन झाले. प्रभूची निर्मळ भक्ती दिसली.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel