चि. प्रिय सुधास,

सप्रेम आशीर्वाद.

तुझे सुंदर पत्र पोचले. तुम्ही दोन दिवस शाळेत शिबिरजीवन कंठलेत. वाचून आनंद झाला. एकत्र राहात होतात, खेळत होतात. गुरुजनही सारे बरोबर. शेवटच्या दिवशी रात्री घरचे आणलेले फराळाचेच खाल्लेत. मोकळ्या मैदानावर आकाशाखाली सारे विद्यार्थी व सारे गुरुजन खेळीमेळीने एकत्र फराळ करीत आहेत, गोष्टी सांगत आहेत, विनोद करीत आहेत. किती गोड अनुभव, आणि ''मी गेली बारा वर्षं निरनिराळ्या शाळांतून शिकवण्याचं काम केलं, परंतु शाळेचे मुख्याध्यापक, आजीव सभासद व इतर शिक्षक एकत्र प्रेमानं बरोबरीच्या नात्यानं बसले आहेत असं कधी पाहिलं नाही.'' असे तुमच्या शाळेत नवीन आलेल्या एका शिक्षकबंधूने त्या वेळेस काढलेले उद्‍गार जे तू दिले आहेस, ते वाचून मनात शत विचार आले. शिक्षणसंस्था चालविणारे तरी समतेने वागणारे, सहानुभूतीने वागणारे नकोत का? चालकांना शिक्षकांशी समरूपता वाटायला हवी. परंतु भारतात मोठे मन दुर्मिळ झाले आहे. देशात अन्नधान्याचा दुष्काळ, वस्त्रांचा दुष्काळ, त्याचप्रमाणे उदार वृत्तीचा, मानवतेचाही दुष्काळच आहे.

तुमच्या तेथे शिक्षकांसाठी नवी छोटी टुमदार घरे बांधली जात आहेत. मुलांनी पाया खणला. तुझ्या हस्ते पायाच्या दगडाची पूजा करण्यात आली. तू दिलेले ते सारे भावपूर्ण वर्णन वाचून मी आनंदलो. ज्या वेळेस मनु्ष्य आपण होऊन काम करतो, त्या वेळेस ते काम म्हणजे आनंद असतो. आणि खरोखर श्रमजीवनात अपार गोडी आहे. राहून राहून एक विचार माझ्या मनात हल्ली येत असतो. भारतातील मुले स्वावलंबी झाली पाहिजेत. श्रमावे, कष्टावे, यात परमानंद ती व्हावीत. अमेरिकेच्या एका अध्यक्षाचा मुलगा गवंड्याच्या हाताखाली काम करताना पडून मेला. केवढे स्फूर्तिदायक उदाहरण! अनेक विद्यार्थ्यांना नोकरी हवी असते. नोकरी कोठे मिळणार? रस्त्यातून दोन तास वृत्तपत्रे विकू, छोटी पुस्तके आगगाड्यांतून खपवू, असे कोणाच्या मनात येत नाही. विद्यार्थ्यांना या कामात आनंद हवा. परंतु त्यांना कोठे तरी कचेरीत बैठे काम हवे असते. कष्टाने श्रम करून मिळविलेले दोन आणे मोलाचे आहेत. हिंदीतील 'सुदर्शन' नावाच्या एका लेखकाने एक सुंदर गोष्ट लिहिली होती. मुलगा सोळा वर्षांचा होतो. बाप म्हणतो, ''तू स्वत: काही मिळवून आण.'' मुलगा आईजवळ जातो व तिच्याकडून चार आणे घेतो. ते चार आणे वडिलांना दाखवून तो म्हणतो, ''बघा माझे चार आणे.'' वडील म्हणतात, ''गटारात फेक ते.'' पुढे वडिलांना कळते की आईच मुलाला पैसे देते. ते त्या गोष्टीला आळा घालतात. आता कुठून आणायचे पैसे? शेवटी मुलगा मजूर बनतो. उन्हातून हिंडतो. दोन आणे आणतो. घरी येऊन वडिलांना म्हणतो, ''हे मी मिळवलेले दोन आणे.'' ते नेहमीप्रमाणे म्हणाले, ''गटारात फेक.'' तो संतापाने म्हणाला, ''काय म्हणून फेकू? हे माझ्या निढळाच्या घामाचे आहेत. हे पैसे साधे नाहीत.'' बापाने मुलाला हृदयाशी धरले. मुलाने जे पैसे स्वत:च्या कष्टाने मिळविले. त्याचे त्याला मोल वाटले. वस्तूची किंमत तिच्यासाठी आपण जे कष्ट करतो त्यामुळे असते.

सुधा, तू कष्ट करणारी हो. झाडांना पाणी घाल. उन्हाळ्यात झाडांना पाणी लागेल. नाही तर ती सुकतील. आपण वाढवलेल्या झाडामाडांना फुले फळे लागलेली पाहून आपणास कृतार्थता वाटते, खरे ना?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel