तुला ती एक गोष्ट माहीत आहे? भगवान बुध्द नगराबाहेर वनराजीत उतरले होते. त्यांचा शिष्य नगरात ''भगवान बुध्दांना द्यायला योग्य अशी देणगी द्या'' असे म्हणत जात होता. ते पाहा मोठमोठे शेठसावकार धनाने भरलेली ताटे आणीत आहेत. परंतु तो शिष्य म्हणतो, ''नको. मला निराळी देणगी हवी. ही योग्य नाही.'' त्या शिष्याला कोणत्या प्रकारची देणगी हवी होती? त्याला त्या मोठ्या नगरात गुरुला द्यायला योग्य अशी देणगी मिळाली नाही.

तो रिक्तहस्ताने जात असतो. त्याची पावले वनाकडे वळतात. इतक्यात एका वृक्षाआडून पुढील शब्द कानांवर येतात :

''ही माझी देणगी घ्या. मजजवळ माझ्या नेसूंच्या वस्त्राशिवाय दुसरे काही नाही. ते वस्त्र मी देत आहे. ते घ्या.''

तिने वस्त्राची घडी त्या शिष्याकडे फेकली. तो शिष्य म्हणाला, ''मी कृतार्थ झालो. गुरूला द्यायला ही योग्य अशी देणगी आहे.''

सुधा, ती चिंधी धनवंतांनी देऊ केलेल्या माणिकमोत्यांच्या राशीहून का अधिक मोलाची होती? होय. त्या चिंधीची किंमत कोण करील? धनवंतांनी ताटे भरून धन आणिले. त्यांच्या संपत्तीतील तो कचरा होता; परंतु त्या अभगिनीने शेवटची जवळची चिंधीही दिली होती. महात्माजींच्या स्मारकाला बड्या व्यापा-यांनी पाच कोटी रुपये दिले. त्यांच्या संपत्तीतला तो एक कण होता. तो कणही नाना हेतू मनात धरून दिलेला असेल; परंतु एखाद्या गरिबाने दिलेला एक आणा,- त्याची किंमत अनंत आहे. खरे प्रेम सर्वस्व द्यायला तहानलेले असते व शेवटी प्राणही समर्पिते.

मी ही अनेक लग्ने बघत आहे. परंतु रूढ बंधने मोडून कोणी लग्न करीत आहे का इकडे माझे लक्ष असे. त्याच त्या जातीतील लग्ने आता पुरेत असे वाटते. सरमिसळ झाल्याशिवाय भारतास सर्वगामी नवचैतन्य येणार नाही. अजून आपल्याकडे ही जात, ती जात, याच कल्पना आहेत. श्रेष्ठकनिष्ठपणाची बंडे आहेत. हिंदुधर्मातच हे आहे असे नाही तर सर्व धर्मांच्या अनुयायांतही हे प्रकार दिसतील. ख्रिस्ती धर्मातही बडे सरदार लोक गरिबाशी लग्न लावायला तयार होत नाहीत. तो इंग्लंडचा राजपुत्र आठवा एडवर्ड. त्याला गादी सोडावी लागली. का तर तो राजघराण्यातील एखाद्या राजकन्येशी लग्न न करता दुस-या एका मुलीशी लग्न करता झाला म्हणून! इंग्लंडमधील लोकशाहीचा हा पराजय होता. नुसते सर्वांना मत देऊन लोकशाही येत नाही. सर्वांचा दर्जाही समान लेखायला हवा. मानवता सर्वत्र एकच आहे. अग आमचे एक मित्र बाबूलाल अत्तार चांगले कार्यकर्ते आहेत. ते एका शेख घराण्यातील मुलीशी लग्न करणार आहेत, म्हणून त्यांची अत्तार मंडळी त्यांच्यावर रागावली आहेत. अत्तार समाजातीलच मुलीशी लग्न लाव, असा त्यांचा आग्रह. तसे पाहिले तर शेख हे अत्तार समाजाहूनही श्रेष्ठ मानले जातात; परंतु आपल्याच समाजातील हवी हा आग्रह. वास्तविक पैगंबर हे मानवतेचे महान उपासक. त्यांनी कालपर्यंत गुलाम असणा-या मुली मोठमोठ्या खानदानांना देवविल्या. ज्या एका गुलामाला त्यांनी स्वतंत्र केले त्याने आपल्यामागून खलिफा व्हावे अशी इच्छा त्यांनी प्रदर्शित केली होती. त्याच पैगंबरांच्या धर्मातील हे लोक, तू अत्तार, मी शेख करीत बसले आहेत. मनुष्याला समता का आवडत नाही?

भारतात सर्रास सर्वत्र मिश्र विवाह सुरू व्हावेत, असे मला वाटते. मुलामुलींनी याबाबत बंड करावे; परंतु आईबापांच्या आधारावर अवलंबून असणारी मुले बंड करू शकणार नाहीत. स्वतंत्र व्हायला स्वत:चा संसार स्वतंत्रपणे चालवायची अंगात धमक नाही. नाही तर ''अर्थस्य पुरुषो दास:'' याप्रमाणे शेवटी 'आईबाप असे म्हणतात, मग काय करायचे-' असे रडके उद्‍गार काढणारे तरुणच सर्वत्र आढळायचे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel