दोन चार दिवसांपूर्वीची गोष्ट. एका मित्राकडे जेवायला गेलो होतो. तेथे चर्चा चालल्या. जेवायला अजून अवकाश होता. आलेल्या मित्रांत निरनिराळया प्रकारचे लोक होते. एक-दोन श्रमजीवी कामगारही होते. वर्तमानपत्रे पडली होती. नुकतेच साहित्यसंमेलन संपले होते. कवी यशवंतांचे भाषण कसे होते वगैरे गोष्टी निघाल्या. माझे जे श्रमजीवी बंधू होते, ते जवळच  उदासीनपणे बसले होते. त्यांना त्या निर्जीव बौध्दिक चर्चात काही रस नव्हता. ते तेथे आहेत हे बाकीच्यांच्या जणू ध्यानातही नाही आले. मी त्या दोघांना म्हटले :

''ती दिल्लीला येणारी बिलं फार वाईट आहेत नाही?''

''होय. अगदी वाईट. सत्याग्रह करायला हवा. जगात कुठे असे कायदे नसतील.'' ते म्हणाले.

''आणि तुझा रेल्वेतला भाऊ काढून टाकला होता, तो पुन्हा लागला का?''

''नाही दादा.''

गप्प बसणारे ते कामगारबंधू बोलू लागले. इतरही मग त्यांच्या बोलण्यात रस घेऊ लागले. आपण चार जण बसलो असताना आपले सर्वांकडे लक्ष हवे. त्या कामगारांना नाही तर वाटले असते, ''यांच्या मोठया चर्चा चालल्या आहेत. आपणास त्यांत काही कळत नाही. आपण येथे खाली मान घालून मुके बसण्यापलीकडे काय करायचं? त्यांना खट्टू वाटले असते. मनुष्याने सर्वांच्या हृदयात सहानुभूतीने शिरले पाहिजे. सर्वांचा विचार करणे म्हणजेच लोकशाही. परंतु आपण आपल्याच संकुचित जगात असतो. आपल्याच ठरीव विचारसृष्टीत असतो. मुद्दाम नसले तरी नेणतेपणे दुस-याचे मन दुखविले जाते, दुस-याचा स्वाभिमान दुखविला जातो. सुधा, या जगात नीट वागणे थोर कला आहे. उदार व सहृदय मनाशिवाय ही कला साधणार नाही.''

तुला लोकर हवी आहे ती लौकरच पाठवीन. अरुणाला चेंडूही पाठवतो. कोणी भेटला म्हणजे, सारी सुखी असा. अप्पा व सौ. ताईस स. प्र. चि. अरुणास सप्रेम आशीर्वाद.


अण्णा

ता. का.

तुझ्या मोग-याला कळया आल्या का? अग, येथे शेजारच्या बागेत अगदी सुकलेला मोगरा, परंतु पाणी मिळू लागताच लगेच पाने फुटून कळे आले. खरोखर जीवन किती धडपडणारे असते, आशेने कसे वाट पाहात असते नाही?

साधना, २० मे १९५०

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel