चि. प्रिय सुधास,

सप्रेम आशीर्वाद.

आपला चैत्र महिना संपून वैशाख सुरू झाला. अग, जतीनकडे परवा गेलो. तो त्यांचा त्या दिवशी नवीन वर्षाचा आरंभ होता. आपला वर्षारंभ चैत्रात, तामीळ बंधूंचा वैशाखात. परंतु आंध्र प्रान्तात मात्र महाराष्ट्राप्रमाणे चैत्रात वर्षारंभ असतो. जतीनला विचारले, काय रे, आज तुम्ही काय करता? तो म्हणाला, 'सकाळी उठायचं. ज्यानं त्यानं आरशात बघायचं. वडील मंडळी लहान मुलांना आज खाऊस म्हणा, कशाला म्हणा काही पैसे देतात. आज घरात फळफळावळ आणतात.' आपण ज्याप्रमाणे गुढी उभारतो, तसे त्यांचे नाही. आपण शालिवाहन राज्याच्या विजयाची खूण म्हणून गुढी उभारतो.

भारतात किती विविधता आहे. परवा एका व्यापा-याच्या पावती-बुकावर किती विविध तारखा पाहिल्या. तेथे विक्रम संवतप्रमाणे तिथी होती, शालिवाहन शकाप्रमाणे होती, हिजरी सन होता, पारशी सनही होता. मिसरी सन होता, ख्रिश्चन सन होता. पुन्हा बंगाली तारीख निराळीच. या विविधतेमुळे कधी कधी गोंधळ वाटतो तर कधी कधी मौज वाटते.

परवा रत्नागिरीचा एक मित्र आला होता. बराच वेळ आम्ही बोलत बसलो. जगातील सारे विषय जणू आमच्या संभाषणात आले. मध्येच प्रेमासंबंधी काही चर्चा झाली. मी लैला आणि मजनू यांचे उदाहरण सांगितले. लैलाचे बोट कापले तर मजनूंच्या बोटातूनही रक्त निघाले. माझा मित्र म्हणाला, ''त्या जुन्या कथा जाऊ देत: परंतु रत्नागिरीत गेलात तर तुम्हांला एक करुणसुंदर कथा ऐकायला मिळेल.'' मी म्हटले, ''मला तरी सांगा.'' ते म्हणाले, ''मागे थिबा राजा रत्नागिरीस स्थानबध्द होता. आज ब्रह्मदेश स्वतंत्र झाला आहे. परंतु थिबा राजा रत्नागिरीसच त्याचा देश गुलाम असताना मरण पावला. राजा मेल्यावर त्याची सारी मंडळी परत ब्रह्मदेशात जायला निघाली; परंतु एक मुलगी जाईना. तिचं एका माणसावर प्रेम जडले होतं. कोण होता तो? तो एक टांगेवाला होता. ब्रह्मदेशातील माणसं तिथं थोडीच होती? हा टांगेवाला त्यांना फिरायला वगैरे नेत असावा. ती मुलगी समुद्रावर बसे. सागर उचंबळत असे, नाचत असे. तो टांगेवाला गाणं गाई. तिच्या हृदयातही प्रेमसंगीत सुरू होई. तो तिच्याकडे पाही. ती त्याच्याकडे. तिनं आपलं हृदय त्याला दिलं. तिच्या जीवनातील एक उणीव भरून निघाली. त्या टांगेवाल्याच्या जीवनाचा प्रवाह धो धो करीत आला व तिच्या जीवनाचा खळगा भरून पुढे निघाला. तिला मिळे ते ती त्याला देई. परंतु ती त्याच्याबरोबर लग्न कशी करणार? टांगेवाल्याने दुस-या एका स्त्रीशी लग्न केले. त्याचा संसार चालू झाला; परंतु ही मुलगी मनात त्याची पूजा करी. जेव्हा सारी मंडळी ब्रह्मदेशात जायला निघाली तेव्हा ही मुलगी जाईना.''

''तू इथं एकटी काय करशील? चल ब्रह्मदेशात. तिकडचं इथं काय आहे? तिकडे ती बांबूची वनं, सागाची जंगलं, तिकडचे हत्ती, तिकडचे पागोडे,- इथं काय आहे! चल बेटा-'' ती मंडळी म्हणत.

''मी इथंच राहीन. इथंच माझा स्वर्ग, इथंच माझा मोक्ष. जिथं प्रेम आहे तिथं माझा पागोडा. मी तिकडे येऊन काय करू? मी आता इथलीच झाले आहे. हा समुद्र, ही लाल माती, ही नारळीची झाडं, हे आम्रवृक्ष - यातच मी वाढले; आणि मी एकाला इथं माझं जीवन दिलं,- त्याला सोडून कशी येऊ?''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel