सर्वत्र उन्हाळा आहे. परंतु पाण्याचा थेंबही पडत नसताना झाडामाडांना नवपालवी फुटत आहे. फुलाफळांनी झाडेमाडे सजत आहेत. कोकिळा गायन करीत आहे. सृष्टीत अपार वैभव दिसून येत आहे. उन्हाळयाच्या रखरखीत हे अमृतमय आनंद आहेत.

आज आपले जवाहरलाल नेहरूच बघ. जगात आज सर्वांहून अधिक थोर दृष्टी असलेला कोणी मुत्सद्दी असेल तर ते नेहरू वाटतात. अमेरिकेत अजूनही नीग्रो लोकांसाठी निराळ्या शाळा आहेत. परवा एका अमेरिकन नीग्रोने एका अमेरिकन गो-या मुलीबरोबर लग्न केले म्हणून त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. दक्षिण आफ्रिकेतील मुख्य प्रधान मालन निरनिराळ्या रंगांच्या लोकांनी निरनिराळ्या अलग भागांतच राहावे म्हणून कायदे करीत आहेत. जगात अजून मानवता यायला किती काळ लागेल हरी जाणे! महात्माजी मानवतेचे उपासक होते. हे सारे बाह्य भेद त्यांनी दूर केले होते. भारतात सारे प्रकार. परंतु मरणाआधी ते म्हणाले, ''शेवटचा श्वास असेपर्यंत मी सांगत राहीन की हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती, शीख, पारशी- सारे या भारतमातेचे आहात.'' त्यांची ती दृष्टी घेऊनच जवाहरलाल जात आहेत. ती दृष्टी त्यांच्याजवळ नसती, तर त्यांनी परवाचा करार केला नसता. जगातील भांडणे, द्वेषमत्सर वाढवणारा मोठा की दु:खे गिळून मोठी दृष्टी घेऊन हे जग जरा भले व्हावे म्हणून धडपडणारा मोठा? जगात शांततेसाठी नोबेल पारितोषिक असते. परंतु जगात मानवता यावी, युध्दे जावीत, पिळवणूक संपावी, प्रेम फुलावे म्हणून ज्यांनी मरेपर्यंत अविश्रांत परिश्रम केले, त्या शांतीसाठीच ज्यांची शेवटची आहुती पडली त्या महात्माजींची आठवण त्या शांततेसाठी नोबेल बक्षीस देणा-या संस्थेस झाली नाही. आज भारत व पाक यांच्यात पु्न्हा कमालीचा द्वेषाग्नी पेटला असता, युध्द भडकेल असे वाटत असता पंडित जवाहरलाल नेहरू अनंत मनोयातना गिळून पुन्हा मोठ्या मनाने वाटाघाटी करून शांती निर्मिण्यासाठी धडपडतात! केवळ भव्य दृश्य, केवढे दैवी कर्म! भारताने जर दंगली केल्याच नाहीत तर इकडे पाकचे लोक परिस्थिती पाहायला कशाला? भारत नि पाक का समान दोषी? असे लहान दृष्टीचे लोक म्हणतात. परंतु कर नाही त्याला डर कशाला? येथे मानापमानाचे प्रश्न नाहीत. एका इंग्रजाचा कोणी स्पॅनिशाने दोन-चारशे वर्षांपूर्वी कान कापला म्हणून इंग्रजांनी युध्द पुकारले. त्या कामासाठी हजारो कुटुंबांतून हाय हाय! असले मानापमान रानटी होत.

दोन राष्ट्रांतील प्रश्न म्हणजे पोरांमधील भांडण नव्हे. जो मोठी दृष्टी घेईल तो मोठ्या मनाचा. तो मानवतेला तारणारा, तो तिचा उध्दारकर्ता! सुधा, नेहरूंनी आज भारताला सा-या जगात नैतिक दृष्टीने उंच केले आहे. आपल्या राष्ट्राला याचा अभिमान वाटावा. सभोवती आंधळेपणा, अहंकार, विनाश, द्वेष, अज्ञान यांचे थैमान असता नेहरू समझोता करीत आहेत. मौलाना आझाद दिल्लीला सांस्कृतिक संबंध संस्था सुरू करीत आहेत, याचा आपणास अभिमान वाटायला हवा. जगात अणुबाँब, हैड्रोजन बाँब यांचे शोध लागत आहेत, परंतु भारत हृदये जोडण्याचा प्रयोग करीत आहे. तो प्रयोग करताना महात्माजी पडले. त्यांचा वारसदार पुत्र तो प्रयोग पुढे नेत आहे. ऋषिमुनींनी सुरू केलेला प्रयोग पुढे जात आहे. मानवांना एकत्र नांदविण्याचा प्रयोग. वेदांतील सरस्वतीसूक्तातील सरस्वती म्हणते :

''अहंराष्ट्रीसंगमनीजनानाम्''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel