माझ्या लहानपणी आपल्या गावात जितके खेळये येत तितके आता येत नाहीत. समुद्रकाठच्या गावी कोळ्यांचा नाच असतो. एका माणसाच्या कमरेभोवती पुढेमागे कागदी रंगीत होडी असते. तो मध्ये उभा राहून त्याच्याभोवती इतर मंडळी हातात छोटी छोटी वल्ही घेऊन नाचतात. मजेदार गाणी म्हणतात. वाद्ये वाजत असतात. काही ठिकाणी ढोल, लेझीम यांचे खेळ चालतात.

पुण्यामुंबईकडे शिमग्याच्या सणाला लहानमोठ्या मुलांना साखरेच्या माळा खाऊ म्हणून देतात. कोकणात ही प्रथा फारशी नाही. देशावर फार. पुढेही आठ दहा दिवस कोणी भेटले तर त्याला साखरमाळांची भेट द्यायची. साखरेत रंग मिसळून नाना आकारांची साखरी पदके करून त्यांची ही माळ करतात. माझ्या लहानपणी रामनवमीच्या यात्रेत आपल्या गावात ही साखरेची दुकाने येत. साखरेच्या नाना वस्तू. साखरेचे उंट, साखरेचे हत्ती. मग आम्ही त्याचा पाय खायचे, शेपटू खायचे! मुलांना गंमत वाटते. आणि पुढेही काही दिवस जेवताना भाकरीचे निरनिराळे आकार करून मुले खातात! आई मला एकदा रागे भरली होती. मी दातांनी तुकडे तोडून भाकरीचे हत्ती घोडे करीत बराच वेळ जेवत बसलो म्हणून!

तुम्ही साखरेच्या माळा घेतल्या का? अरुणाच्या गळ्यात घातलीत का केशरी साखरमाळा? पुढे गुढीपाडव्याच्या वेळेस गुढी उभारताना साखरेची माळही गुढीवर चढविण्याची देशावर पध्दत आहे. सध्या साखरेचे दुर्भिक्ष तरीही साखरेच्या माळा दिसत होत्या.

अग आपल्या मारुतीच्या देवळासमोरच्या होळीत वामनाने नारळ टाकला! होळीत नारळ फुटतो! फुटलेल्या नारळाच्या करवंट्या काढून मग त्यातील खोबरे प्रसाद म्हणून खावयाचे. नारळ ताड्कन फुटला! आणि रघू गेला काढायला. काठीने करवंट्या ओढीत होता. तो एकदम त्याचो तोल गेला. होळीतच पडायचा, परंतु गणूकाकांनी त्याला एकदम ओढले म्हणून वाचला. होळीच्या वेळेस असे अपघात होतात. कधी ठिणग्या किटाळे उडून आगी लागतात. कोकणातील गवतारू घरे. एक ठिणगी पडली तरी भडका उडायचा. आजूबाजूला पेंढ्यांच्या उडव्या असतात. धोका असतो. कधी कधी पेटलेली किटाळे किती दूर जाऊन उडत! आगीची जणू उडती पाखरे!

फुटलेला नारळ बघताच मला ती सुधन्व्याची गोष्ट आठवते. तुला आहे का माहीत? धर्मराजाने अश्वमेध यज्ञ केला. अर्जुन अश्वमेधाचा घोडा घेऊन दिग्विजयाला निघाला. हंसध्वज राजाच्या राज्यात तो आला. हंसध्वजाने घोडा धरला. युध्द सुरू झाले. जे जे तरुण आहेत त्या सर्वांना उद्या सूर्योदयांबरोबर युध्दासाठी बाहेर पडावे अशी दवंडी देण्यात आली. हंसध्वजाचे दोन मुलगे. सुरथ नि सुधन्वा अशी त्यांची नावे. सुधन्वा युध्दासाठी जायला निघतो. परंतु त्याची प्रिय पत्नी म्हणते: ''आजचा दिवस थांबा, उद्या जा.'' शेवटी तो घरी राहतो. दुस-या दिवशी तो जातो. राजाचे शंख आणि लिखित या नावाने दोन पुरोहित असतात. ते राजाला म्हणतात, 'जो दवंडीप्रमाणे येणार नाही त्याला तापलेल्या तेलात टाकण्यात येईल, असे आपण घोषविले होते. तुझा मुलगा काल आला नाही. एक दिवस घरी राहिला. न्याय नि:पक्षपाती हवा. तुझ्या मुलाला ही शिक्षा व्हायला हवी.' हंसध्वज राजाचे डोळे भरून आले. परंतु प्रजेने नावे ठेवू नयेत व सर्वांना समान न्याय असावा म्हणून आपल्या मुलाला तो ती शिक्षा देतो. कढईत तेल सळसळत असते. सुधन्वा त्यात टाकला जातो. तो देवाचा परम भक्त. त्याला ते तप्त तेल थंडगार वाटते. सरोवरात कमल हसावे त्याप्रमाणे त्याचे मुखकलम हसत असते. तेल नीट तापले नसावे असे शंख व लिखित यांना वाटते. ते चुल्यात मोठी लाकडे घालतात. तेल तापले की, नाही बघायला एक जण त्यात नारळ टाकतो. तो त्या नारळाचे ताड्कन दोन तुकडे घेऊन एक शंखाच्या कपाळात व दुसरा लिखिताच्या कपाळात बसतो. तेल तर तापलेले आहे! हा देवाचा परमभक्त आहे असे सर्वांच्या ध्यानात येते! त्याला बाहेर काढतात तो मग अर्जुनाजवळ लढतो. जैमिनीअश्वमेध म्हणून मराठीत ओवीबध्द ग्रंथ आहे. त्यात मला वाटते ९६ अध्याय आहेत. अश्वमेधाच्या या युध्दाच्या कथा त्यात आहेत. चंद्रहास्य, बभ्रुवाहन, दुंदुभी, मयूरध्वज वगैरे अनेकांच्या रोमांचकारी कथा त्यात आहेत. लहानपणी हा जैमिनीअश्वमेध मला जणू पाठ होता. पाठच्या भावांना आंदुळताना मी त्या ओव्या म्हणायचा! सुधा तुला या सा-या गोष्टी माहीत आहेत का? गद्य गोष्टींच्या रूपाने त्या झाल्या असतील. तुमच्या मुलांच्या ग्रंथालयात असतील. दादांनी तुला आतील काही गोष्टी तोंडी सांगितल्याही असतील!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel