सविता कारंजकर
सातारा, ९९२२८१४१८३

आई , सुट्टी लागली कि मी उशिरा उठणार आहे गं!
आणि मी पोहायला , डान्स क्लासला वगैरे कुठं जाणार नाही हं!
घराघरातून असे संवाद ऐकू येण्याचे हे दिवस..
नोकरी करणाऱ्या आईबाबांसमोर यक्ष प्रश्न..
शाळा नाही,अभ्यास नाही, बाप रे ! कुठे आणि कसं गुंतवायचे मुलांना ?
यु ट्यूब ,इंटरनेट ,फोन ,आयपोड ,गेम्स,बाप रे बाप!
सगळी बिल्स वाढणार,लगेचच कंटाळा येणं सुरु होणार..
मुलांची सुट्टी म्हणजे पालकांची काळजी..

काळजी त्यांच्या सतत वाढत्या इंटरनेट वापराची आणि सतत डोळे स्क्रीन मध्ये खुपसून बसण्याची.
एकदा का डोकं आणि डोळे स्क्रीनवर खिळले कि या मुलांना आजूबाजूला काय चालू आहे , आपल्याला तहान भूक लागते या गोष्टींचही भान राहत नाही.
इंटरनेटने आपल्या सगळ्याच्याच आयुष्याला असं जखडून ठेवलंय.
मुलं फक्त या विळख्यात अडकून राहत आहेत.त्यांना आनंद मिळत नाही.

मैदानावर खेळणे,आईबाबा किंवा घरातील इतर सदस्यांशी मोकळा संवाद साधणे,नवनवीन गोष्टी शिकून त्या करण्यातला आणि नवनिर्मितीचा आनंद,विचार करणं या गोष्टींपासून मुलं आज अनभिज्ञ राहतील कि काय अशी भीती पालकांना वाटत आहे शहरी भागातील पालक तर या समस्यांनी ग्रस्त आहेतच. गरज आहे ती यात आपल्या मुलांना अडकू न देण्यासाठी  आणि अडकलेल्या मुलांना यातून  बाहेर काढण्याची.

पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती त्यावेळी पालकांना मुलांना घडविताना फारसे कष्ट पडत नव्हते. आजी - आजोबा ,काका-काकू,मामा-मावशी,आत्या या नात्यात मुलांना प्रेम ही मिळत होत आणि वडीलधा-यांच्या आचरणातून संस्कार मिळत होते.आजी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टींमधून नीतीमूल्ये मुलांच्या मनावर ठसत होती.

आज आईनोकरी किंवा व्यवसायात  बिझी आणि आजी असेलच घरात तर तीही टीवीवरील मालिकांमध्ये व्यस्त ..असे चित्र आज समाजात घरोघरी दिसून येतेय.
चला ,तर पालकहो...यातून बाहेर पडून आपल्या मुलांचं व्यक्तिमत्व फुलासारखं सुंदर आणि सुगंधी करण्यासाठी छोटे छोटे बदल आपल्यामध्ये करूया.

आधी हे लक्षात घेऊ..कोणताही बदल एका रात्रीत घडत नाही.

तेव्हा  आधी आपण संयम बाळगू.शाळा सुरु असताना मुलांची दिनचर्या कशी असते ,त्यांची मानसिकता ,त्यांच्या आवडीनिवडी यांचा आधी विचार करू.
शाळा सुरु असते तेव्हा मुलांना सकाळी लवकर उठावेच लागते.एक नजर घड्याळाकडे ठेवून स्वतःचा अभ्यास,गृहपाठ ,प्रात:विधी आटोपणे यासाठीच त्यांना वेळ अपुरा पडतो.
द्राविडी प्राणायाम करून शाळेची बस पकडणं त्यांना कठीण जाते.त्यातून बाहेर पडेतोवर शाळेत एकामागून एक विषय शिकवले जातात.तो विषय शिकण्याची मुलाची मनाची तयारी आहे नाही याचा विचार आत्ताच्या शिक्षणपद्धतीत फारसा केलेला दिसत नाही आणि आपण पालक ही मुलांच्या गुणात्मक प्रगतीपेक्षा संख्यात्मक प्रगतीवरच जास्त भर देतो.
तेव्हा सुट्टीचा कालावधी व्यतीत करताना घड्याळाची टिकटिक मुलांना विसरायला लावू.

आठ वाजेपर्यंत त्यांना झोपू देऊ .त्यांचा दिनक्रम त्यांनाच ठरवू देऊ.मात्र त्यांना रूपरेषा आपण ठरवून द्यायची.सगळ्यांनी मिळून हा दिनक्रम अमलात आणायचा.मोबाईल,टीवी इंटरनेट या सगळ्याची परवानगी  द्यायची मात्र त्या वापरावर मर्यादा आपण घालून द्यायच्या. कुटुंबाचा एकत्रित वेळ असेल तेव्हा मात्र  या सगळ्या साधनांचा वापर करणं आपणही टाळायचं..प्रामाणिकपणाने.
सगळ्यांनी मिळून ठरवले तर नक्कीच जमेल .
वेळेचे नियोजन करायला शिकवण्यासाठी सुट्टीचा कालावधी अतिशय योग्य.

दिवसभरात घरातल्या काही कामांची विभागणी करायची .प्रत्येकाच्या क्षमतेनुसार त्यांना काम ठरवून द्यायचे .त्या कामासाठी लागणारा संभाव्य वेळ त्यांना सांगून ठेवायचा.उदा.भाजी आणणे,स्वयंपाकघरात लागणारा किराणा माल आणणे.पसारा आवरणे,कचरा काढणे ,भाजीची पेंडी निवडणे,रद्दी नीट आवरणे,आपापले कपडे घडी करून जागेवर नीट ठेवणे ,कपड्यांना इस्त्री करणे .दैनदिन कामातील मुलांचा सहभाग त्यांना आपल्या पालकांच्या अडचणी समजून घेण्यात मदत करतो.भाजी आणायला गेल्यावर आपण जर  त्यांना सांगितले कि आज आपण तुझ्या आवडीच्या भाज्या खरेदी करू तर त्यांच्या चेहऱ्यावर होणारे बदल आपण टिपू  शकतो.बाजारात गेल्यावर कोणत्या भाज्या मिळतात,त्यांचे भाव काय आहेत,कोणती भाजी निवडायची,ताजी भाजी कोणती ,आपले आईबाबा भाजी कशी निवडतात हे त्यांना प्रत्यक्ष समजेलच.त्यासाठी वेगळे कष्ट आपल्याला घ्यावे लागणार नाहीत.शिवाय आपली आवडती भाजी खरेदी केल्याचा आनंद वेगळाच असेल.अशा प्रकारे अनेक कल्पना आपण लढवू शकतो जेणेकरून घर कामातील मुलांचा  प्रत्यक्ष सहभाग वाढवू शकतो.

एक तक्ता बनवू मुलांसाठी.
वार  / तारीख  / ठरवून दिलेले काम / त्यासाठी लागणारं संभाव्य वेळ. /तुम्हाला हे काम करायला लागलेला वेळ
हा तक्ता त्यांनाच भरायला लावू.
सुरुवातीला आठवडाभराचा तक्ता करू .तो भरला कि आठवड्याचा तक्ता तपासू.
संभाव्य वेळेत काम पूर्ण केलेले दिसले तर शाबासकी देऊ आणि नसेल वेळेत काम पूर्ण झालं तर त्याची कारणमीमांसा करू.पुढच्या आठवड्यात पूर्वीच्या चुका टाळायला प्रवृत्त करू.

काय होईल?
-    घरातल्या कामात मुलांची मदत होईलच
-    मुलांना वेळेचं महत्व पटवून देण्यात मदत होईल.
-    जबाबदारीची जाणीव थोड्याफार प्रमाणात मुलांना होईल.
-    आईबाबा किंवा घरातील लोक किती कष्ट करतात याची जाणीव मुलांना होईल.
-    मुलांचा वेळ सत्कारणी लागेल शिवाय चढाओढीने मुलं काम करतील.

एकदा का वेळेचं नियोजन जमलं कि मुलांना आनंद तर होईलच पण त्याचा आत्मविश्वास वाढेल .आईबाबा आपल्याशी काही गोष्टी वाटून घेतायत ,आपल्यावर विश्वास ठेऊन जबाबदारीची कामं आपल्याला करायला देतात आणि आपलं कौतुक करतायत.ही गोष्ट त्यांच्या व्यक्तीमत्वात सकारात्मकता निर्माण करणारी आहे .बरेचदा पालक आपल्याकडे दुर्लक्ष करतायत ही गोष्ट मुलांना सलत असते,ही त्यांची सल अशा छोट्या नियोजनातून निघून जाईल.

लहान मुलांना रंगाचं  खूप आकर्षण असते.चित्र काढणं,त्यात  त्यांच्या आवडीप्रमाणे रंग भरणं,त्यासाठी वेगवेगळे विषय त्यांना देणं या छंदाला आपण  पालक प्रोत्साहन देऊ शकतो.रेषांमधून,रंगांमधून मुलं व्यक्त होत असतात.
चित्र काढण्यासाठी आपण त्यांना विषय ठरवून दिला तर त्यांच्या निरीक्षणशक्तीचा विकास होतो.निसर्गातल्या लहानसहान गोष्टींमधला बदल त्यांना आपण टिपून ठेवायला सांगू शकतो.आपण पालक जेव्हा त्यांच्या पातळीवर जाऊन त्यांच्यातलेच एक होऊन या गोष्टी त्यांना समजावून सांगू तेव्हाच ते या सगळ्या गोष्टी पटकन आत्मसात करतील.

सुटीच्या दिवसात अनेक कौटुंबिक सोहळ्याचे आयोजन केले जाते .अशा समारंभात मुलांना अवश्य सहभागी करून घेतल्यास त्यांना नाती माहित होतील, नात्यातला गोडवा , आपुलकी  जाणवेल.सामाजिक ,कौटुंबिक जबाबदारीची जाणीव अशा सहभागातून वाढेल.नातेसंबंध जपायचे कसे याची कल्पना येईल.त्यातूनच मुलांचे सामाजिकरण निकोप पद्धतीने होईल.
नोकरी करणारे पालक असतील तर मुलं आजी आजोबा याच्या सहवासात वाढतात किंवा पाळणाघरात.

आईची करडी शिस्त आणि आजीआजोबांचा दृष्टिकोन यात फरक असतोच घरच्या आपुलकीच्या वातावरणापेक्षा पाळणाघरात एक प्रकारचा रुक्षपणा असतो.त्यामुळे मुलांना दिवसभरात वेगवेगळे संदर्भ चिकटलेले असतात.अशावेळी पालक म्हणून आपली जबाबदारी वाढते .अशा मुलांना अतिशय काळजीपूर्वक जपावे लागते.ज्याच्या सहवासात ते दिवसभर असतात त्यांच्या वृत्ती मुलांच्या कृतीत डोकावतात.त्यांचे ते सगळे संदर्भ अलगद बाजूला काढून पालकांच्या कुशीत जेव्हा मूल विसावते तेव्हा त्याला सुरक्षिततेची भावना येते आणि त्याला शांत झोप लागते.

सुट्टीत मुलांना कसं गुंतवायचं,त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या दुष्परिणामापासून कसं दूर ठेवायचं ,त्यांचं नाजूक व्यक्तिमत्व कसं खुलवायचं ?ही आजच्या पालकांसामोरची आव्हानं.या आव्हानांना सामोरे जायचे असेल तर आपल्याला कंबर कसायलाच हवी.

त्यासाठी स्वतःमध्ये काही बदल घडवू.ऑफलाईन राहणं ही गरज ओळखून आधी आपणच मोबाईल पासून लांब राहू.
इंटरनेट पासून मुलांना दूर ठेवणे शक्य नाही आणि तशी गरजही नाही तेव्हा हे तंत्रज्ञान आपण समजून घेऊ ,संयमाने त्याचा वापर करायला शिकू आणि मुलांनाही शिकवू.मुलांचा आक्रस्ताळेपणा त्यांची बदलती मानसिकता त्यांची चिडचिड आपल्याला सहन करायचीय त्यासाठी आपण शांत राहण्याचा आधी प्रयत्न करू.आपल्या मुलांना आपण किती तास वेळ दिला यापेक्षा थोडासाच वेळ त्यांच्यासोबत व्यतीत करू पण तो सत्कारणी लावू .मुलं सतत काहीतरी नवीन शिकण्यासाठी धडपडत असतात.त्यांच्या धडपडीचा ,प्रयत्नांचा आदर करू.टीवी मोबाईल पासून मुलं दूर राहणं कठीण आहे हे स्वीकारू,त्यांच्या या वापरावर नियंत्रण मात्र ठेऊ.

बरेचदा मुलांशी वागताना कणखर व्हावे लागते आणि हेही एक मोठे आव्हान असते आपल्यासाठी.वेळ प्रसंगी मुलांना शिक्षा करावी लागते पण चांगल्या कामासाठी त्यांना बक्षीसही देऊ.बक्षिसाची सवय लागू न देता आणि बक्षिसांचे आमिष न दाखवता त्यांना प्रोत्साहित करीत राहू.

कुटुंबातील व्यक्तींचा प्रेमळ सहवास, मनमोकळ्या गप्पा,एखादी छोटी का होईना कौटुंबिक सहल,मुलांनी बनवलेले चटकदार पदार्थ सगळ्यांनी एकत्र बसून खाणे,वेळोवेळी योग्य पद्धतीने केलेले त्यांचे कौतुक या गोष्टीतली मजा मुलांना एकदा का समजली कि मग पहा.. मुलांची सुट्टी  पालकांना नको असलेल्या साधनांशिवाय कशी  साजरी होतेय ते!.

अशा बहारदार, सर्जनशील, मुलाचं व्यक्तिमत्व खुलविणाऱ्या या सुट्टीच्या मुलांसह पालकांनाही बहारदार शुभेच्छा.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel