मंगेश विठ्ठल कोळी
मो. ९०२८७१३८२०
पुढील काही दिवसात येणाऱ्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना विविध प्रकारच्या तंत्रज्ञानापासून दूर ठेवून व्यक्ती व्यक्ती मध्ये सुसंवाद कसा साधला जातो किंवा तो कसा साधला पाहिजे याचे संस्कार केले पाहिजे त्यासाठी त्यांना प्रात्यक्षिक पद्धतीने आणि अनुकरण पद्धतीचा वापर करून मुलांच्यावर उत्तम संवाद साधण्याची गुण कौशल्य आत्मसात करण्यावर भर दिला पाहिजे. तरच हि उन्हाळी सुट्टी सार्थकी लागेल.
काही दिवसापूर्वी मी माझ्या मित्र परिवाराला एक प्रश्नार्थक मेसेज केला होता की, "तुम्हाला उन्हाळ्याच्या सुट्टीत कोणत्या ठिकाणी जाण्यास आवडेल?" आपल्या प्रतिक्रिया मला पाठवा. या प्रश्नार्थक मेसेजला भरभरून प्रतिसाद दिल्या बद्दल मी सर्वांचे आभार मानतो. अनेकांनी वेगवेगळ्या ठिकाणांची नावे लिहून पाठवली तर काही व्यक्तींनी मला प्रश्न केला की, मी हे सगळे का विचारात आहे? तर काही व्यक्तींनी मला मजेशीर पद्धतीने उत्तरे पाठविली ती अशी तुम्ही खर्च करत असाल तर कोठेही जाऊया, तुमच्या घरी यायला आवडेल वगैरे वगैरे...
या सर्व प्रतिक्रियामधील काही प्रतिक्रिया खूप विचार करण्यासारख्या होत्या. कधीही न गेलेल्या ठिकाणी जाण्यास आवडेल, काहीना शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी जाण्यास आवडेल, काही व्यक्तींनी त्यांच्या आवडत्या व्यक्तीकडे (उदा. आजी-आजोबा, काका, आत्या, मित्र-मैत्रिणी किंवा मामाच्या गावाला जाण्यास आवडेल) अशा प्रतिक्रिया पाठवल्या. त्यावेळी मला लहानपणीचे एक बडबड गीत आठवले. "झुक-झुक झुक-झुक अगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी. पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया." या गीतामधून अनेकजण लहानपणीच्या दिवसामध्ये आजही काही काळ रेंगाळताना दिसतात.
या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनामध्ये माणूस स्वत:चे आरोग्य विशेषत: मानसिक तणावाखाली जगताना दिसत आहे. थोडीशी विश्रांती मिळावी म्हणून सुट्टीच्या काळात आवडत्या किंवा मन प्रसन्न होण्यासाठी आणि नवीन ऊर्जा मिळवण्यासाठी धडपडत करत आहे, असे अनेकांच्या प्रतिक्रीयामधून जाणवले. नवनवीन तंत्रज्ञान खूप मोठ्या प्रमाणावर बदलत आहे. काही वर्षापूर्वीचे दिवस आणि आजचे दिवस पहिले तर आपल्या लक्षात येईल की, खूप कमी कालावधीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात बदल होत चालला आहे.
बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि तो सर्वांनी मान्यही करायला हवा. बदलत्या तंत्रज्ञानामुळे मानवाची सुख-शांती, समाधान, आनंद आणि उत्साह हरवत चालल्याचे स्पष्ट चित्र सर्वत्र पाहत आहे. तंत्रज्ञान ही जरी काळाची गरज असली, तरी आज ती मानवाची सवय किंवा व्यसन होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे "मोबाईल ही आजची गरज राहिलेली नसून, ते व्यसन झाले आहे." त्यामध्ये लहानापासून ते वृद्धांपर्यंत गुरफटत चाललेले दिसतात.
मी विचारलेला प्रश्न आणि त्या प्रश्नाला मिळालेली उत्तरे यानुसार अनेकांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाण्यास आवडेल असे दिसून येते. जेव्हा फिरायला जातो किंवा एखाद्या व्यक्तीला भेटायला जातो, त्यावेळी मनमोकळेपणाने बोलण सुद्धा करत नाहीत किंवा ज्या ठिकाणी फिरायला जातो, तिकडचा आनंद घेण्याऐवजी स्वत:चा सेल्फी काढण्यात किंवा इतरांचे फोटो काढण्यात जास्त वेळ खर्च करतो. ज्या व्यक्ती बरोबर फिरायला जाता त्यांना सुद्धा जास्त वेळ बोलण्यापेक्षा मोबाईलमध्ये जास्त वेळ व्यस्त असल्याची अनेक उदाहरणे पाहता येतील. खूप दिवसांनी एकत्र आलेले मित्र-मैत्रीण किंवा नातेवाईक सुद्धा आपापल्या हातामध्ये मोबाईल घेऊन व्यस्त असल्याचे चित्र पाहतो आणि अशी परिस्थिती बऱ्याच ठिकाणी किंवा दररोज अनुभव घेत असतो.
वरील चित्र बदलायचे असल्यास त्याची सुरुवात स्वत:पासून आणि आताच्या वेळेपासून करायला हवी. एखाद्या वस्तू किंवा इतर कोणतीही गोष्ट असो तिची इच्छा असणे अगदी योग्य आहे. परंतु त्याचे रूपांतरण जर तीव्र इच्छामध्ये झाले, तर तो हव्यास होतो. असा हव्यास मानवाला कधीही समाधान देत नाही. त्यापासून नकारात्मक भाव किंवा निराशा वाढत जाते. ज्या ठिकाणी आणि ज्यासाठी तुम्ही कोठेही गेलात तिकडे फक्त त्याच गोष्टीसाठी वेळ द्या. जीवनाचा आनंद लुटा आणि इतरांनाही आनंदात सहभागी करून घ्या.
धन्यवाद....