मयूर बा. बागुल, पुणे.
९०९६२१०६६९
आज साधारण बघितले तर लक्षात येईल उन्हाने सगळीकडे तापू लागले आहे पण गड व किल्लेवेडे युवक काही विचार न करता फिरण्याचा आनंद घेत असतात. नेहमीप्रमाणे शुक्रवारी साधारण ९ वाजण्याच्या सुमारास ओमकारने मला संदेश पाठवला "नाईट ट्रेकिंग"चा किल्ले विसापूर मानत जास्त विचार न करता त्याला लगेच फोन केला आणि सांगितले की मी येतो आहे. मला नेहमीप्रमाणे शनिवार व रविवार सुट्टी असल्याने थोडे माझे या दोन दिवसांचे नियोजन बघितले मला लक्षात आले रविवारी नेहमीप्रमाणे कॉलेजला तास घेण्यासाठी जायचे असते. विद्यार्थांना फोन केला आणि रविवारचा तास शनिवारी घेण्याचे नियोजन केले. माझ्या फिरण्यामध्ये विद्यार्थाचे नुकसान होणार नाही यांची काळजी घेतली. शनिवारी दुपारी ३ ते ५ कॉलेज मध्ये तास झाला त्यानंतर घरी जाऊन किल्यावर जाण्यासाठी लागणारे सर्व साहित्य घेतली आणि रात्री ९ वाजता पुणे स्टेशनवर पोहचलो माझ्या सोबत बरेच मित्र मंडळी विशेषत: आय. टी. मध्ये बाहेरील राज्यातून आलेली मुले होती. आम्ही सर्वजण रात्री प्रवासासाठी निघालो आणि लोणावळा सोडले की लोहगड-विसापूर ही जोडगोळी गिर्यारोहकांचे लक्ष वेधून घेत असते. मळवली रेल्वेस्थानकावर उतरल्यावर समोरच दिसतो तो म्हणे लोहगड, मात्र डोंगरामागे लपलेला विसापूर किल्ला भाजे गावात गेल्यावरच नजरेस पडतो. रात्री बाराच्या सुमारास मळवलीहून आम्ही विसापूरगडाकडे चालत निघालो. हे अंतर सहा कि.मी. आहे.रस्ता बघितला तर चढ व उतार त्यामुळे रस्ता चढताना एकच दमछाक होते. एक महिन्यांच्या विश्रांतीनंतर ट्रेकला निघालो होतो उजव्या बाजूला द्रुतगती मार्ग,पुढे दिसणारं लोणावळा शहर आणि वर निरभ्र आकाशातल्या तारकांची सोबत पाहता मार्गक्रमण विनासायास चालू होते. आम्ही रात्री दोनच्या सुमारास गडावर पोचलो. पौर्णिमेच्या चंद्राच्या उजेडात गड किती उत्तम स्थितीत आहे हे जाणवत होतं. रात्रीचा किल्ला सर करत असतांना वाटेत मोठमोठे दगड-गोटे पार करून चढावे लागत होते आणि चोहीबाजूने घनदाट वृक्ष त्यात पक्ष्यांची किलबिल ऐकण्यात येत होते. मी किल्ला चढत असतांना सोबत गावातील एक कुत्रा सोबतीला किल्याची वाट दाखवत सोबत आला. गडावर वस्तीला राहता येईल अशी मोठ्ठी गुहा आहे. आम्ही पोचलो तेव्हा तेथे बरेच जण येऊन पोहोचलो होतो. गडावरच्या दर्ग्याला येणारे बरेचजण तिथे होते. गुहेत दहा ते पंधराजण तरी झोपलेले होते. आम्ही आसपास भटकून येऊन मग झोपायचे ठरवले. थोडं पुढे गेल्यावर मोकळं पठार दिसताच तिथे बस्तान मांडले . हळूच चिवडा,लाडू असे पदार्थ बाहेर पडले.त्यावर ताव मारत आकाश निरीक्षण चालू झाले.गच्च भरलेल्या आकाशातून बरोबर तारे शोधून काढत होतो. अथांग विश्वाच्या पसाऱ्यात मोठमोठे तारे ठिपक्यापमाणे वाटत होते. या पसाऱ्यात स्वतःबद्दलचा विचार करत गुहेत न झोपता रात्रीच्या चांदणी रात्रीत गुंतून गेलो होतो. दिवसभर उन्हाने तापलेले धरती आणि रात्री मात्र किल्यावरील मोकळ्या ठिकाणी तुफान थंडगार हवा चालू होती सोबत घेतलेली शालदेखील उडून जात होती. सकाळची निरागस व सुंदर पहाट पक्ष्यांची किलबिल आणि उगवत्या सूर्याचे दर्शन खूप सुंदर असा क्षण अनुभवण्यास मिळला.
ह्या किल्ल्याच्या इतिहास बद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न गावातील नागरिकांना काढून केला. मराठे इ. स. १६८२ सालच्या ऑक्टोबर महिन्यात पुण्याच्या उत्तर बाजूला स्वारीसाठी गेले. डिसेंबरच्या पहिल्या आठवडात शहाबुद्दीन चाकणमध्ये होता. मराठे लोहगडाच्या बाजूला आल्याचे समजल्यावर तो तेथे पोहचला. तेथे त्याने केलेल्या चकमकीत ६० माणसांची कत्तल झाली. तेथून मराठे विसापूर किल्ल्यावर गेल्याचे समजले म्हणून तो तेथे पोहचेपर्यंत मराठे कुसापुर गावाजवळ पोहचले. १६८२ मध्ये मराठ्यांचा आणि मोगलांचा शिवाशिवीचा खेळ चालूच होता. ४ मार्च इ. स. १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसर्याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले.
पायऱ्यांच्या सहाय्याने किल्ल्यावर जाताना एक मारुतीचे देऊळ आहे. बाजूलाच दोन गुहा आहेत. यात ३० ते ४० जणांची सोय होते. मात्र पावसाळ्यात गुहेत पाणी साठते. गडावर पाण्याची तळी आहेत. गडावरील पठारावर लांबवर पसरलेली तटबंदी आपले लक्ष्य वेधून घेते. गडावर एक मोठे जातंही आहे.
पहिल्या वाटेने गडावर जायचे झाल्यास वाटाड्या घेणे आवश्यक ठरते. भाजे लेण्यांना जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या पायऱ्या सोडून एक पायवाट जंगलात गेलेली दिसते. उजवीकडची पायवाट धरल्यावर २० मिनिटे चालून गेल्यावर काही घरे लागतात. या वाटेने आपण मोडकळीस आलेल्या पायऱ्यांपाशी पोहचतो. येथे बाजूलाच एक मंदीर आहे.दुसऱ्या वाटेने भाजे गावातून गायमुख खिंडीपर्यंत यावे. गायमुख डावीकडे जंगलात जाणारी वाट थेट विसापूर किल्ल्यावर घेऊन जाते.मळवली स्थानकातून बाहेर आल्यावर वाटेत एक्सप्रेस हायवे लागतो. हायवे पार करण्यासाठी बांधलेल्या पादचारी पुलावरून डावीकडे उतरणारा जिना उतरल्यावर पाटण गाव लागते. याच पाटण गावातून विसापूरवर जाण्याचा रस्ता आहे.
गडावर राहण्यासाठी दोन गुहा आहे. जेवणाची सोय आपण स्वतःच करावी. गडावर पिण्याच्या पाण्यासाठी तळी आहेत. गडावर जाण्यासाठी अडीच तास लागतात. त्यामुळे किल्ले फिरणे आणि निसर्ग सान्निध्यात जगण्याची मज्जा खूप आनंददायी असते.
सकाळी किल्यावरुन सूर्याचे दर्शन घेतले आणि संपूर्ण किल्ला भ्रमंती केली. किल्यावर फक्त चारी बाजूने तटबंदी दिसते आणि किल्यावर वस्तीही पडलेली दिसते. किल्ला दगडी बांधकामामध्ये मजबूत बांधलेला दिसतो आणि आताचे बांधकाम बघितले तर आताच्या बांधकाम शिक्षणापेक्षा पूर्वीचे बांधकाम शिक्षण हे उत्तम होते असेच म्हणावे लागते. किल्ला उतरण्यास सुरुवात केली आणि मागील बाजूने जंगलातून पायवाट काढत हळूहळू किल्ला उतरण्यास सुरुवात झाली. उतरत असतांना वाटेत दोन गुहा लागतात आणि त्या गुहेच्या जवळच कोरीव हनुमान दिसतो अतिशय सुंदर अशी मूर्ती नजरेस पडते परंतु त्या गुहेच्या आत बघितले तर घाणीचे साम्राज्य दिसते. गुहेत अतिशय उत्तम अशी राहण्याची व्यवस्था होऊ शकते एवढी जागा आहे परंतु आपले पुरातत्व विभाग आणि पर्यटन विभाग हे कुंभकर्ण असल्यामुळे त्यांना ह्या गड व किल्ल्यावरील देखरेखी साठी लक्ष देण्यास जाग येत नाही. तसेच किल्ला उतरत असतांना वाटेत भाजे गावातील लेण्या लागतात आणि त्यादेखील बघण्यासारख्या आहे. अतिशय पुरातन काळातील ह्या लेण्या बघितल्या नंतर लक्षात येते.
त्यामुळे आयुष्यात मन शांत व निरागस करण्यासाठी आवश्य चांदण्या रात्रीत चंद्राच्या छायेत आपला देह निजवून जीवनातील एक रात्र शांतपणे आकाशातील तारांच्या निरीक्षण करत काढण्यास मज्जा खूप वेगळी असते.