भरत उपासनी
हॅलोऽ कोण बोलतायऽ टेलीफोन ऑपरेटर का ? हां...ऑपरेटरकाका नमस्कार मी मोनी बोलतेय मोनी.....अहो मनी नाही हो...मोनी... मोनी...! मनी हे मांजरीचं नाव असतं...कळलं का ? बरं ते जाऊ दया...प्लीज जरा आमच्या काकांचा नंबर जोडून देता का ? काय म्हणालात ? माहित नाहीऽऽ ? आश्चर्य आहे...अहो असं कसं होईल ? तुम्हाला तर सगळे नंबर माहित असतात ना? नसेल सापडत तर तुमच्याकडे ते पुस्तक असतं ना त्यात बघा..काय बरं म्हणतात त्या पुस्तकाला ? हांऽ आठवलं आठवलंऽत्याला डिरेक्टरी म्हणतात ..डिरेक्टरीऽ....बघा बरं त्या पुस्तकात...! त्यात काका असं नाव असेल आणि त्या नावासमोर त्यांचा नंबर असेल...हे सुद्धा आम्हीच सांगायचं ? एवढं कसं हो कळत नाही तुम्हाला..? कोणी केलं तुम्हाला फोन ऑपरेटर..? काय म्हणता..? सापडला नंबर...मग द्या की जोडून...!...
लागला..लागला...काकांचा फोन लागला...हॅलोऽ काकाऽ मी मोनी बोलतेयऽ त्या ऑपरेटरला साधा तुमचा फोनसुद्धा जोडून देता येत नाही बघा..! हां तर मी काय सांगत होते ? हां मी आता रोज शाळेत जाते बरं का....स्कूलबस येते मला घ्यायला...परवा तर आम्ही एका मोठ्ठ्या बागेत गेलो होतो...शिवाय काल मी, बाबा आणि आई आम्ही सगळ्यांनी सर्कस पाहिली सर्कस...हत्ती,घोडा,उंट,अस्वल,गेंडा असे कित्ती कित्ती प्राणी पाहिले!...एका माणसाच्या छातीवर दगड फोडला तरी त्याला काहीच झालं नाही...एक पोपट छोटी सायकल चालवत होता..आणि एका मोठ्ठ्या लोखंडी पोकळ गोलात एक माणूस मोटरसायकल चालवत होता....
मला वाटलं आता हा पडेल की काय...एवढा मोठा रस्ता सोडून तिथे कशाला गेला कोण जाणे !...मी सारखी ओरडत होते..एऽपडशील ना,उतर खाली, एऽ पडशील ना,उतर खालीऽ...पण त्याने काही माझं ऐकलं नाही...बहिरा असेल बहुतेक...मला तर तसं वाटतं..बहिराच असेल तो....! शेवटी मला इतकी भीती वाटली की मीच डोळे मिटून घेतले...पण त्याने काही माझं ऐकलं
नाही....तुम्हाला काय वाटतं काका ? तो बहिराच असेल ना बहुतेक...जाऊ द्या आपल्याला काय घेणं...!हांऽ आणि खरी गम्मत तर सांगायचीच राहिली की....!
किनई काकाऽ त्या सर्कशीत खूप मोठ्ठे झोके होते...एक रंगीबेरंगी कपडे घातलेला जोकरसुद्धा होता...त्याने डोळे मिचकावले की लांब पाण्याच्या पिचकारीसारख्या धारा आमच्या अंगावर यायच्या...मी त्याला म्हटलं, एऽ चुप बसऽ कपडे खराब होतील ना माझे...! त्याने माझं ऐकलं तर नाहीच पण वरून म्हणतो कसा ? "एऽ छोटी गुडीया,तुझ्या कपडा खराब नाय होनारऽ माझे जवल च्यांगला पानी आसतेऽ तुझ्या कपडा खराब झ्याला तर मी धुवून देनार..! ३० फेब्रुवारीला नाय तर ३२ जानेवारीला मी तुझ्या समदा कपडा धुवून देनार..!"...सगळे लोक आणि आई-बाबासुद्धा हसायला लागले....मला खरं तर त्या जोकरचा रागच आला...सगळे लोक आणि आई बाबा का हसतात ते मला कळलंच नाही...पण आता सगळे हसतात म्हटल्यावर, आपण नाही हसलो, तर ते वाईट दिसेल ना...! म्हणून मग मीही हसायला सुरुवात केली...हॅंऽ हँऽ हँऽ हँऽ हँऽ हँऽ हँऽऽऽऽ........
हाँऽ पण खरी गम्मत तर सांगायची राहिलीच की....त्या सर्कशीत खूप मोठ्ठे झोके होते..छोटया मुली,मोठया बाया आणि जोकरसुद्धा झोके खेळत होते...पण त्यांना नीट झोकेसुद्धा खेळता येत नव्हते...झोके घेता घेता त्यांचे हात सुटायचे आणि त्या बाया बदकन खाली जाळीत पडायच्या...खेळता खेळता सगळ्या मुली आणि बाया जाळीत पडल्या...शेवटी फक्त जोकर राहिला...तोच तो मला..ऽगुडीया म्हणणारा.....तो जोकरच फक्त राहिला...मनात म्हटलं,मला काही काही बोलतो आणि हसतो काय ? सपक आता चांगला जाळीत...!
पण तसं काही झालंच नाही हो...त्याची ना वेगळीच गम्मत झाली...जोकरने झोक्याची एक फिरकी घेतली आणि काय मज्जा आलीऽ...जोकरची चड्डीच सुटून गेली.....आव्व्वाऽ....पण पुन्हा मध्ये दुसरी चड्डी होतीच...पुन्हा गिरकी घेतली...पण पुन्हा मध्ये दुसरी चड्डी होतीच..मला वाटलं आता जोकरचा आव्वाऽ होतो की काय...पण तसं काही झालं नाही...ही गम्मत सांगण्यासाठीच फोन केला होता...पण तुम्ही असे हसताय काय सारखे..? काय म्हणालात परत एकदा सांगू ? हॅलोऽ ऐका बरं का...परवा किनई सर्कशीत गम्मतच झाली...झोक्यावरून जोकरची चड्डीच सुटून गेली...! हँऽ हँऽ हँऽ हँऽ हँऽ हँऽ......अच्छाऽ ओकेऽ सी युऽ बायऽ.....आता सांगण्यासारखं राहिलंच काय...? हा हा ही ही हे हे ...ऽ.....