सावित्री जगदाळे
ज्येष्ठ लेखिका

राधाला माहेराहून तिच्या भावाचा फोन आला,तिचे वडील आजारी आहेत येऊन जा.राधा प्रवीणला म्हणाली,

"जाऊ या का,आपण सगळेच ?"

"सगळ्यांना कसं शक्य आहे....दोन दिवसांत अर्जुनची परीक्षा सुरु होईल.त्याच्या अभ्यासात अडचण कशाला,तू ये भेटून."प्रवीण म्हणाला.

"अहो पण इथं सैपाकाचे सगळ्यांच्या कसं जमेल?मला तर बसने जायचे म्हणजे मुक्कामच करावा लागेल."

"कर न मग ,आमची काळजी नको करूस.चपात्या आणतो आम्ही बाहेरून ओम्लेट करू,एक दिवसाचा तर प्रश्न आहे."

"राधाबाई तू जा बिनघोरी.मला येतंय कालवण करायला. हां...भाकरी जाड व्हत्यात त्या दोघांपुरत्या आणतील हाटेलातनं."आजोबा म्हणाले .

"बाबा पण आत्ताच आजींच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेय.त्यांना नीट खाणेपिणे नको का द्यायला?"

"मी देतो सगळं.मला तुपातला शिरा करायला  येतो .औषधंपण नीट देतो.तू जा,आमची अजिबात काळजी करू नकोस.काय अर्जुन बाळा?"

"हो आई ,तू जा.मी नीट अभ्यास करेन,जेवण पण नीट करेन".

"अर्जुन बाळ हुशार फार,नाकाला लागलीय शेंबडाची धार."आजोबा हसत म्हणाले.

"ऑss" अर्जुन ओरडला

"जायला तर पाहिजेच ,लवकर येते मी."राधा काळजीने म्हणाली.

राधा माहेरी गेली.तिचे वडील खूपच आजारी होते.तिची आई त्यांच्या  शेजारी बसलेली.राधा गेल्यावर खूपच रडू लागली.

'अगं,रडतेस कशाला,वाटेल बरे त्यांना  .कुठल्या डॉक्टर कडे नेलं होतं?"राधाने वडिलांच्या जवळ बसत विचारलं .

"कसला दवा अन कसला डॉक्टर ...दवाखान्यात न्यायला त्याला वेळ नको का?सुगीन त्याला काही सुचतंय का?ज्वारी भरडायला मशीन आलं ,तिकडं गेल्याती दोघं पण .'

"औषधपाणी तरी काय केलं का न्हाय ?"

"न्हाय,राधा आणील म्हणाला.तिला माहिताय सगळं.

'"असं कसं आणील , मी काय डॉक्टर आहे का?तपासल्याशिवाय डॉक्टर तरी देतील का औषध?"

"तुझा भाऊ म्हणाला बाई......आता काय बोलणार...म्हाताऱ्याच पाय सुजल्यातंय.मला तर लाय भ्या वाटतंय ."

"काय काळजी करू नकोस.मी डॉक्टर कडून आणते औषध."

'अगं आता इथं नसतो डॉक्टर ..तालुक्याला जावं लागल ."

"आता गं काय करायचं /"

"गाडी असल्याशिवाय कसं न्यायचं ?सवडच न्हाय कुणाला तर काय करणार संग."राधाला तर काय सुचतच न्हवतं.म्हाताऱ्याच लक्षण काय ठीक न्हवतं तिनं प्रवीणला बोलवून घेतलं .

अर्जुनची परीक्षा असल्यामुळं अर्जुनला नेणं शक्यच न्हवतं .त्याला सकाळी शाळेत पोचवून प्रवीण राधाच्या माहेरी जाणार होता.

प्रवीणने अर्जुनला सांगितलं ,"मी उशिरानंआईला घेऊन येतो.घरी आल्यावर आजोबांना त्रास देऊ नकोस.असेल ते खाऊन अभ्यासाला बस.झोप आली कि झोपून घे आम्हाला यायला उशीर झाला तर काय टेन्शन घेऊ नकोस .आजोबा आजी आहेतच .त्यांना काय त्रास देऊ नकोस हं ."

"हो बाबा ,तुम्ही जावा बिनधास्त.लवकर यायचं आणि मला मोठ्ठं चॉकलेट आणायचं ."

"नक्की आणतो "

प्रवीण गाडी घेऊन गेल्यावर म्हाताऱ्याला दवाखान्यात नेलं.यात दोन दिवस गेले.

अर्जुन शाळेतून आला की गणवेश बदलून ,हातपाय धुवून लगेच अभ्यासाला बसला .आजोबांनी त्याला दूध दिलं.दूध बिस्कीट खाऊन तो अभ्यास  करत बसला .

अर्जुनला एक गणित फारच अवघड वाटत होते.त्याला काय करावं ते कळेना.मग तो आजोबांना विचारायला गेला.आजोबा म्हणाले,आरं बाळा, मला तरी काय कळतंय ,थांब एवढं पीठ मळून ठिवतो आणि येतो.वायच कळ काढ .अर्जुनला त्यांचे शब्द कळले नाही तरी त्यांना काय म्हणायचे ते कळले.आजोबा आल्यावर म्हणाले,

"अर्जुन बाळा ,तुमचं गणितातलं मला काय बी कळत न्हाय तर  कसं करायचं ?"

'याचा भागाकार करायचा कि गुणाकार तेवढंच सांगा ."

"आरं बाबा , म्या साळाच शिकलो न्हाय तर तुला काय सांगणार..साळाशिकलो असतो तर कुटंतरी नोकरी नसती का केली?"

"आजोबा तुम्ही अज्जिबात शाळेत नाही गेलात?"

"न्हाय ना....शाळेत माझ्या बापानं नाव घातलं.दुसऱ्या दिवशी पाटीपेन्सिल घेउनशान गेलो कि शाळेत ,लाय भ्या वाटत व्हता .बापाचा हातच सोडत न्हवतू ,कसं तरी बसवून गेला बाप .एकदोन दिवस नुसतं बसून काढलं.मला काय कळायचं न्हाय.मला म्हणायचं मास्तर ..आरं,असं लिही..,तसं लिही ,गिरव .मी आपला सुंभ .मास्तरांनी काय काय काळ्या फळ्यावर लिहिलं.म्हणालं,जसंच्या तसं लिव्हा .सगळी पोरं लिव्हायला लागली  मला कायच कळना..म्या नुसत्या रेषा मारू लागलो .ओळीनं गोल गोल केलं.मास्तरांनी पाटी बघितली .म्हणालं,तुला आता तसं येणारच न्हायी बघ..छडी लागे छम छम ....असं म्हणून त्यांनी माझ्या हातावर छडी मारायला सुरुवात केली.मी ओरडतच घरी पळालो दुसऱ्या दिवशी काय साळेत गेलोच न्हाय .मग मास्तरच आलं घरी मग बळदाच्या मागं लपून बसलो ."

"बळदाच्या ? "अर्जुनने हा शब्द पहिल्यांदाच ऐकला होता .

"आरं ती कणिंग,मोठी कणिंग असती त्यात ज्वारी भरायची ,तवा ज्वारी लय पिकायची ."

"कणिंग कसली?"

"तुला तर असलं कायच म्हाईत न्हाय . रानातल्या घरी हाय ती दावतो तुला .अशा हारीनं कनिंगी  मांडायच्या .आता उस आला अन शेतकरी उसाच्या मागं लागला .ज्वारी कमी करायला लागली मानसं आधी लय पिकायची ठेवायला जागा नसायची .पाटलाच्या वाड्यापुढं पेवं असायची ."

"आजोबा आता पेवं कशाला वाड्यापुढं/का त्यात पण ज्वारी भरायची?"

'व्हय त्यात बी ज्वारी ठेवायची."

"कणिंग घरात आणि पेवं वाड्यापुढं असं का? त्याला उन नव्हतं का लागतं?"

आजोबा तर अर्जुनला नवनवे धक्के देत होते.नवीननवीन गोष्टी सांगत होते.गणितं राहिली बाजूला .भाषेचाच अभ्यास सुरू होता.अर्जुनला हे भारी वाटत होतं.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel