०००
माझ्या व्हर्टिगोच्या त्रासामुळे मला बाईक चालवणे बंद करावे लागले होते. मला एखादा विश्वासू रिक्षेवाला हवाच होता. तसे दोनचार ऑटोवाल्यांचे नंबर होते माझ्याकडे. पण ते वेळेवर येत नसत. पैशासाठी वाद घालत. त्यामानाने हा बरा वाटला.
हळूहळू या 'ऑटोभास्कर' बद्दल माहिती मिळत गेली. आणि त्याच्यातला 'माणूस!' अधिक प्रभावी होऊ लागला. हा मलाच काय कोणालाच पैशासाठी आडवत नाही हे कळले आणि एकदा अनुभव पण आला.
मी बेंगलोरला निघालो होतो. रेल्वे स्टेशनवर पोहचलो. दोन हजाराची नोट माझ्याकडे होती, त्याच्याकडे सुटे नव्हते. मी त्याचे भाडे तीन महिन्यानंतर, परत आल्यावर दिले.
समजा हा अव्हेलेबल नसेल तर, 'काका, संभाजीला पाठवू? दुसरा रिक्षेवाला हाय, मी भाडं घेऊन भिस्तबागला जातोय!' म्हणून सोय करतो.
असंच एकदा मी फोन केला. "भास्कर, अरे उद्या गावात जायचंय! सकाळी अकराच्या दरम्यान ये!"
"काका, उद्या नाही जमायचं! जोशी काकांना भिंगारला घेऊन जायचं आहे. पेन्शन काढून द्यायची आहे. माझ्या साठी ते तीन दिवस थांबलेत!"
हे जोशी माझे सिनियर आहेत, मी यांना ओळखतो. त्याच दिवशी ते संध्याकाळी मला रस्त्यात भेटले. "सर, तुम्हीपण भास्करची ऑटो वापरता?" बोलताबोलता मी विचारले.
"फक्त त्याचीच रिक्षा मी वापरतोय! गेल्या तीन वर्षांपासून! दुसरी रिक्षा नाही करत."
"का? काही विशेष?"
"अरे, एक मुलगा अमेरिकेत, मुलगी ऑट्रेलियात! इथं कोण माझं? तिकडं जायला अनंत अडचणी. या नगरमध्ये, डॉक्टर गंधे आणि हा ऑटोभास्कर माझ्या पाठीशी आहेत! माझ्या म्हातारपणाचा आधार!"
हा विश्वास मिळवणे दुर्मिळच. ०००
आमच्या शेजारच्या मुलाला, शाळेत नेण्या-आणण्यासाठी रिक्षा लावायची होती. मी, या ऑटोभास्कराचा नंबर दिला. 'विश्वासू आहे. डोळे झाकून पोराला त्याच्या स्वाधीन करा.' म्हणून पुस्ती पण जोडली.
दुसरे दिवशी आमचे शेजारी "काय उर्मट दिलात हो, रिक्षेवाला? जमायचं नाही म्हणाला!"
मला हे भास्कर कडून अपेक्षित नव्हते. "का रे भास्कर? मी सांगितले होते, भास्करची रिक्षा लावा म्हणून. तू 'जमायचं नाही!' म्हणालास म्हणे."
"काका, मी शाळेची पोरं वहात नाही! माझं गिऱ्हाईक वेगळं असतं."
"वेगळं म्हणजे?"
"मी ज्यादातर म्हाताऱ्या कोताऱ्यांची ने-आण करतो. त्यांच्या पैकी कोणी नसलं तर, मग इतर भाडं घेतो. पोरांच्या शाळेचं म्हणजे बांधिलकी असते. मग माझं 'गिऱ्हाईक' अडचणीत येईल! म्हणून मी पोरं घेत नाही.
आता तर इतके लोक माझ्या भरोश्यावर आहेत, की मलाच पेलनात. 'बाबांनो, मला वेळ नाही', म्हणालो तर, आपली कामं, माझ्या सवडीनं करत्यात! काय करू मी? कसा त्यांचा विश्वास लाथाडु?"
हे रिक्षा भाड्याच्या पैश्यापलीकडचं काही तरी होतं. "भास्करा, अरे तु किती पुण्ण्याचं काम करतोयस हे तुला माहित आहे का?"
"काका, कसलं पुण्य? मी काही फुकट करत नाही. मोबदला घेतोच कि!"
"पण एक सांग, तू हे 'म्हाताऱ्याना' सेवा देण्याचे, व्रत केव्हा पासून, अन् का करतोस?"
"खरं सांगू? मी कामासाठी मुंबईला होतो. मायबाप गावी. त्यांच्या म्हातारपणी मामानं त्यांची देखभाल केली. मायबाप गेल्यावर गावी आलो. मुंबईन कष्ट घेतले, तसा पैसा दिला नाही.
म्हाताऱ्यांची सेवा या रिक्श्यापायी घडतीय, आणि माझं घरपण आनंदानं चालतंय! माझ्या कडून माझ्या मायबापाची नाहीतर कुणाच्यातरी मायबापाची थोडी बहुत सेवा होती, यातच मला समाधान आहे. अन मी हेच करत रहाणार!"
त्याच्या वाढलेल्या दाढीच्या पांढऱ्या खुंटांकडे मी आदराने पहातच राहिलो. ००००
एकदा मी न बोलावता भास्कर घरी आला. कधी नव्हे तो, आज पायी आला होता. "काका, पाच एक हजार पाहिजे होते."
"का रे, काय झालं?"
"ऑटो ट्रक खाली गेली!पार्किंग केली होती. ट्रकवाल्यानं न बघता रिव्हर्स मारला!"
"परत कधी करणार?"
"दोन महिन्यांनी दिन!"
मी त्याला पैसे दिले. आणि दुसऱ्या महिन्यात आम्ही बेंगलोरला आलो. अपेक्षेपेक्षा मुक्काम वाढला. चार एक महिन्यांनी आम्ही नगरला परतलो. नेहमी प्रमाणे भास्करला रात्री स्टेशनवर येण्यासाठी फोन करून सांगितले होते.
तो आला. आम्ही घरी पोहचलो. मी रिक्षाचे भाडे म्हणून शंभर रुपये दिले. त्याने ते नाकारले.
"नको! काका. भाडं नको. मीच तुम्हाला देणं लागतो." असे म्हणत, त्याने खिशात हात घालून नोटांचं पुडकं मला दिले.
"हे काय?"
"ते उसने पैसे घेतले होते ते!"
"अरे घाई कसली? सावकाशीने द्या
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel