४. मी राम राम म्हणवून घेत होतो

मी मुंबईहून कोकणात आलो. पालगडच्या मराठी शाळेत माझे नाव घालण्यात आले. मी मराठी दुस-या इयत्तेत काही दिवस होतो. मराठी दुस-या इयत्तेत आमच्याच गावातील धोंडोपंत भागवत म्हणून एक शिक्षक होते. त्यांच्या वर्गातील मुले आली म्हणजे सर्वांना रांगेत ते उभे करीत. मग हातातक छडी घेऊन ते विचारीत, 'दात घासलेस का ? शौचास जाऊन आलास का ? डोळे धुतले नाहीस वाटते ?' जी मुले शौचास जाऊन आलेली नसत त्यांना धोंडोपंत घरी पाठवीत. आम्हाला त्यांचा राग येत असे; परंतु ते करीत तेच योग्य होते. शिक्षण हे प्रथम देहापासूनच सुरु झाले पाहिजे. स्वच्छतेचे धडे वर्गात वाचतात; परंतु मुले स्वच्छ आहेत की नाहीत या गोष्टींकडे शिक्षकांचे लक्ष क्वचितच असते.

बंगालमध्ये डेव्हिड हेअर म्हणून एक गृहस्थ कलकत्त्यात होऊन गेले. १८५० च्या सुमाराची गोष्ट आहे. त्यांनी हिंदी मुलांसाठी शाळा काढली होती. प्रथम त्या शाळेत  कोणी मुले पाठविनात. परंतु डेव्हिड हेअर घरोघर जाऊन मुलांची भिक्षा मागत. त्यांची कळकळ व तळमळ शेवटी यशस्वी झाली. शाळेत मुले येऊ लागली. शाळेत मुले आली म्हणजे डेव्हिड हेअर आधी काय करायचे ? ते मुलांचे दात पहावयाचे. ज्यांचे दात स्वच्छ नसतील त्यांचे स्वच्छ करावयाचे, मुलांचे डोळे पुसावयाचे. कोणाच्या सद्रयाला गुंडी नसेल तर गुंडी लावायचे. सद्रा फाटलेला असला तर शिवून द्यावयाचे. कपडे मळलेले असले तर 'चल आपण धुऊ' असे म्हणावयाचे. हे डेव्हिड हेअर कलकत्त्यातील लोकांना देव वाटू लागले. ते जेव्हा मेले तेव्हा त्यांच्या प्रेतयात्रेस न युरोपियन आले न अँग्लो इंडियन ! ' डेव्हिड हेअर हे हिंदाळलेले आहेत' असे त्यांचे साम्राज्यवादी जातभाई म्हणत. हिंदी लोकांनी डेव्हिड हेअर यांचा अंत्यविधी केला. त्यांच्या नावाचे एक हायस्कूल कलकत्त्यास आहे.

डेव्हिड हेअर हे खरे बालशिक्षक होते. आमचे धोंडोपंत तसेच होते; परंतु ते छडीने आरोग्य शिकवीत. दुस-या इयत्ततील महत्त्वाची अशी गोष्ट मला आठवत नाही. दुसरी, तिसरी या इयत्ता झाल्या. मी चौथ्या इयत्तेत गेलो. चौथ्या इयत्तेत असताना मी खूपच वाचले. पोथ्यापुराणे वाचली. रामराम म्हणण्याचे त्या वेळेस वेडच मला लागले होते. सायंकाळी शाळेतून घरी आलो की, मी रामराम म्हणत फे-या घालावयाचा. मी एके दिवशी वडिलांना म्हटले, 'भाऊ ! आज पाच हजार व काल दहा हजार.' भाऊनी विचारले., ' काय पाच हजार व काय दहा हजार ?'

मी त्यांना म्हटले, 'ओळखा.' ते म्हणाले, 'नाही ओळखता येत. सांग तू काय ते.'

'मी रामाचा जप करतो. दहा हजार झाला. आजचा पाच हजार.'

भाऊ म्हणाले, 'तुझा जप फुकट गेला !'

मी त्यांना विचारले, 'का ?'

ते म्हणाले, 'आपण काय करतो, हे दुस-याला सांगितले तर केलेले व्यर्थ होते. विशेषत: देवाच्या संबंधी आपण जर काही केले सवरले तर त्याची वाच्यता करु नये. आपण आपली फुशारकी मारतो असे ते होईल. देवाला फुशारकी आवडत नाही. जेथे जेथे फुशारकी असते तेथे श्याम देव नसतो.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel