एके दिवशी माझे वडील मला म्हणाले, 'श्याम ! तुझ्या वर्गशिक्षकांच्या घरी प्रत्यही सकाळी तू शिकावयास जात जा, ते तुला विनामूल्य शिकविणार आहेत. मी त्यांना भेटलो होतो.' मला ते ऐकून वाईट वाटले, 'बावळया बावळया' म्हणून मला चिडविणा-या त्या शिक्षकांकडे जाण्यास मी सिध्द नव्हतो. मी वडिलांना म्हणले, 'भाऊ ! शिकण्यास्तव जाण्याची काही आवश्यकता नाही. मी काही 'ढ' नाही. माझा नंबरही वर आहे.' वडील म्हणाले, 'अरे, अधिकस्य अधिकं फलम्. ते शिकविण्यास तयार आहेत तर का न जा ? तुझे तर हितच आहे. शाम अपाय तर नाही काही होणार ? अरे, विद्येसाठी कधीही लाजू नये. माझे ऐक, जात. जा.'  शेवटी मोठया दु:खाने त्या शिक्षकांच्या घरी मी जाऊ लागलो. तेथे दुसरी एक-दोन मुले माझ्याच वर्गातील शिकावयास येत असत. त्यांनी शिकवणी लाविली होती. त्यांना वाटले की मीही शिकवणी लावली. त्यांनी शाळेत येऊन सांगितले की, 'श्याम शिकावयास येतो. श्यामने शिकवणी धरली.' वर्गात मुले वाच्यता करु लागली. मला ती गोष्ट रुचली नाही. जो मंद बुध्दीचा असतो, तो शिकवणी लावतो. शिकवणी लावणे म्हणजे स्वत:चे आलस्य व स्वत:चे मंदमतित्व जगप्रसिध्द करणे होय. मी खट्टद्न झालो. खिन्न झालो. माझ्या बुध्दीचा अपमान मला कसा सहन होईल ? माझे तोंड रडवेले झाले. 'श्याम, तुला शिकवणी आहे ?' असे कोणी विचारताच मी माझी मान खाली घालीत असे.

एकेदिवशी रामने माझ्या वहीत पुढील प्रश्न विचारला. 'तुला शिकवणी आहे, होय ना ?' मी त्या प्रश्नाला हो नाही काही उत्तर लिहून दाखविले नाही. रामने पुन: पुन: तो प्रश्न माझ्या वहीत लिहिला. पेन्सिलीने मला टोचून टोचून बेजार केले, शेवटी मी रागाने म्हटले, 'नाही, नाही मला शिकवणी.' राम म्हणाला, 'मग सारी मुले म्हणतात ते काय खोटे ?' मी म्हटले, 'माझ्या वडिलांनी पुन: पुन: मला निक्षून सांगितले की, 'शिक्षकांच्या घरी जात जा म्हणून अगतिक होऊन मी जातो. ते मला मोफत शिकवितात, वडिलांचा व त्यांचा घरोबा आहे. माझा स्वाभिमान मला जाऊ नको असेच सांगत आहेत; परंतु वडिलांची आज्ञा कशी मोडू ?'

माझ्या उत्तराने राम शांत झाला; परंतु मी चिडलो होतो. याचे रामला वाईट वाटले. प्रेमाच्या प्रांतात मोहरीचे मेरु होतात, पराचे कावळे होतात, उगीच काही तरी खट् होते व वादळे जमतात. राम आपणात मुद्दाम चिडवीत होता, असे मला वाटले. 'आपणास इतके दिवस झाले तरी श्यामने ही गोष्ट का सांगितली नाही ?' असे रामला वाटले. आपला कमीपणा आपल्या मित्राला सांगावयास मला धीर झाला नाही. परंतु मित्राजवळ सारे नाही सांगावयाचे तर कोणाजवळ ? प्रेमाला ना भय, ना शंका, ना भीड, ना संकोच. खरे प्रेम सूर्यप्रकाशाइतके सर्वत्र अनिरुध्द संचार करते.

त्या वेळेपासून आम्हा दोघा मित्रांत काही दिवस अबोला उत्पन्न झाला. राम आपणाला कमी लेखतो, तुच्छ लेखतो, असे मला वाटले. तशी मला शंका आली. रामला पाहताच मला खुदकन हसू येईनासे झाले; परंतु तरीही त्याच्याकडे चोरुन मी पहात असे. तो गेला म्हणजे त्याच्या पाठीकडे मी बघत असे; परंतु हळूहळू बाह्य संबंध दुरावतच चालले. एकदा संकोच उत्पन्न झाला म्हणजे तो वाढतच जातो. तो संकोच वेळीच दूर केला तर बरे असते; नाही तर तो पुढे दुर्लंघ्य होतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel