वडील माघारी गेले. मी दुस-या इयत्तेच्या वर्गात जाऊन बसलो. मी कावराबावरा झालो होतो. त्या काळात शाळांची वार्षिक परीक्षा ऑक्टोबर महिन्यातच होत असे. दुस-या इयत्तेत मला चार-पाच-महिनेही पुरे काढावयाचे नव्हते. माझा इंग्रजी अभ्यास ठीक होता. मराठी तर मला काहीच कधी अडत नसे. मी वार्षिक परीक्षेत चांगल्या प्रकारे उत्तीर्ण होईन, अशी मला आशा होती.

मधल्या सुट्टीत काही मुलांनी माझी थोडीथोडी चौकशी केली. घंटा होताच सारी मुले जागेवर बसली. वर्गनायक टेबलाजवळ उभा राहून 'गप्पा बसा; तू उभा रहा.' वगैरे बोलून सत्ता गाजवीत होता. दुसरी घंटा झाली. मराठी व इंग्रजी शिकविणारे शिक्षक आले. तो मराठीचा तास होता. मी शेवटी बसलो होतो. शिक्षकांनी एका मुलाला एका शब्दाचे व्याकरण विचारले. कोणाला येईना. 'तू, तू, तू' असे विचारीत माझ्यावर पाळी आली. मी बरोबर उत्तर दिले. शिक्षकांनी मला वर बसावयास सांगितले. मला जरा आनंद झाला.

मराठीच तास संपला व गणिताचा सुरु झाला. जे शिक्षक कवाईत घेत तेच गणित शिकवीत. त्यांची सर्वांना भीती वाटे. त्यांची चर्या भयंकर होती. हातात छडी घेऊनच ते आले. पोलिसाच्या पाठीशी दंडुका असतो; परंतु शिक्षकाच्या तर हातातच असतो. मी चूपचाप बसलो. मला पाहिल्याबरोबर त्यांनी विचारले, 'कोणत्या शाळेतून आलास ?'

मी:- कोणत्याही नाही.

शिक्षक:- अरे, यापूर्वी कोणत्या शाळेत होतास ?

मी:
- पालगडच्या.

शिक्षक:- पालगड येथे का इंग्रजी शाळा आहे ?

मी:- नाही.

शिक्षक:- मग इंग्रजी कोठे शिकलास ?

मी:- पुण्याला मामाजवळ.

शिक्षक:- पुण्यास राहात होतास वाटते ?

मी:- हो.

शिक्षक:- तरीच गाल वर दिसतात. पुण्याची ज्वारी-बाजरी भाकर आहे ही. गाल वर आहेत; परंतु डोक्यात काही आहे का रे ?

मी काही बोललो नाही. मी खाली बसलो. शिक्षक रागावले. ते कवाईत घेणारे शिक्षक होते. 'उठ उभा रहा. मी बस सांगितले का ?' ते रागाने म्हणाले. मी उभा राहिलो. पहिल्याच दिवशी शिक्षकांच्या छडीचा हातावर प्रयोग होतो का शिक्षकाच्या हाताचा गालावर प्रयोग होतो, याची मला भीती वाटू लागली; परंतु त्या दिवशी तसे काही एक झाले नाही. 'बस खाली.' अशी शेवटी आज्ञा झाली व श्याम खाली बसला.

अशा रीतीने तो पहिला दिवस गेला. सायंकाळी घरी गेल्यावर वडिलांनी विचारले, 'श्याम, कशी काय शाळा आहे ? तुझा अभ्यास इतरांच्या मागे तर नाही ना ? इतर मुलांच्या बरोबरीने राहशील ना ?' मी 'होय' म्हटले. त्यांना समाधान झाले. दुसरे दिवशी मोठया पहाटे उठून ते पालगडला जाणार होते. त्यांनी मला थोडा उपदेश केला. ते म्हणाले, 'श्याम ! चांगला अभ्यास कर. येथे सर्वांचे ऐक. येथेही नीट वागला नाहीस तर मग मी पुन्हा घरात घेणार नाही. रडू नको. सर्वांची वाहवा मिळव. कष्टाशिवाय जगात काही मिळत नाही. हे ध्यानात धर. सर्वांच्या इच्छेविरुध्द मी तुला येथे शिकण्यासाठी ठेवीत आहे. माझी मान खाली होईल, असे काही करु नको. समजलास ना. काही लागले तर मजजवळ मागत जा. कोणाच्या वस्तूस हात नको लावू. कोणतेही काम करावयाचा कंटाळा नको करु. डोळयांना जप. सांभाळ.' असे सांगून त्यांनी माझ्या पाठीवरुन वात्सल्याने भरलेला हात फिरविला. मला खाऊला एक आणा देऊन वडील माघारी गेले. ते गेले व मी ओक्साबोक्शी रडू लागलो. वडील गेले म्हणून नाही; तर माझे सर्व पूर्वचरित्र आठवून. पुण्याचे माझे प्रताप आठवले. व्यर्थ मी व माझे जीवन असे मला वाटले. गतजीवनावर पडदा पडू दे व नवजीवन सुरु होऊ दे. असे मी संकल्पपूर्वक ठरविले व हा संकल्प देवा पुरा पाड, असे वर तोंड करुन हात जोडून मी त्या विश्वंभराला विनविले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel