राधारमण आले. त्या मुलांनाही भान नव्हते. तो तमाशा पाहून राधारमण संतापले. ती दोन्ही मुले बाजूला उभी राहिली. राधारमण क्रोधाने थरथरत होते. 'काय आहे प्रकरण ?' त्यांनी विचारले. 'आमच्या पिशव्या कुणी तरी बांधून ठेवल्या आहेत व त्या सुटत नाहीत.' एक जण म्हणाला. संतापाने राधारमणांनी विचारले, 'कोणाचे आहे हे काय ? ज्याने केले त्याने उभे रहावे.' कोणी बोलेना, कोणी उभा राहिना. अमच्या वर्गात एकी होती. माझे नाव कोणी सांगणार नाही अशी माझी खात्री होती, मी उभा राहिलो नाही. मला धैर्य झाले नाही. मी माराला भीत होतो, अशातला प्रश्न नाही. मी का उभा राहिलो नाही, ते मला समजत नाही. उभा राहिलो नाही खरा. त्या दोन मुलांचाही मला थोडा राग आला होता. त्यांनी चाकूने पटकन कोणाची तरी नाडी तोडावयाची, कोणी तरी एकाने उदार होऊन स्वत:च्या थैलीचे थोडे नुकसान करुन घ्यावयाचे, वर्गात अशी फजिती शिक्षकांसमोर त्यांनी करावयास नको होती, असे मला वाटले. मी काही उभा राहिलो नाही. दुस-याने कोणी ते जर केलेच नव्हते तर उभा कोण रहाणार ?

शिक्षक म्हणाले, 'मी पहिल्या नंबरापासून तो शेवटच्या नंबरापर्यंत पाच पाच छडया मारतो. काढा छडी.' वर्गनायकाने छडी काढली. शिक्षकांनी ती छडी हातात घेऊन खुर्ची सोडली. प्रत्येकाला ते मारीत सुटले. 'माझ्या तासालासुध्दा हा चावटपणा ! इतर शिक्षकांच्या वेळेला करताच; परंतु माझ्या तासालाही कराल, असे मला वाटले नव्हते. कोणाचीच कदर तुम्हाला राहिली नाही.' वगैरे शब्द मारता मारता उच्चारीत होते. त्यांचा अहंकार दुखावला गेला. आपणालाही ही मुले मानीत नाहीत, असे त्यांना वाटले. इतर शिक्षकांप्रमाणेच आपणही झालो, आपले महोच्चस्थान खाली आले. इतर शिक्षकांतच आपलीही गणना, इतर शिक्षकांइतकाच आपल्याबद्दलही आदर व पूज्यबुध्दी, आपल्यासही कोणी धूप घालीत नाही, आपल्या शब्दाला व रुबाबालाही फारसा मान नाही, या सर्व गोष्टींचे त्या शिक्षकांस वैषम्य वाटले. स्वत:चा वृध्दिंगत झालेला अहं दुखावला गेलेला कोणाला पहावेल ?

माझ्या अपराधासाठी इतर मुले मार खात होती. त्या दोन मुलांच्या कृपणतेमुळे, त्यागहीन वृत्तीमुळे मार बसत होता. मीही छडया खाल्या. दहाव्या नंबरपर्यंत छडया मारीत गेले. दहावा नंबर छडी खाता खाता सहज म्हणाला, 'घंटेच्या आधी तो दुसरीतील का तिसरीतील केळकर आमच्या वर्गात आला होता.' त्याबरोबर एकदम राधारमण म्हणाले, 'बस, त्याचेच हे काम ? बोलवा त्या हरामखोराला !' वर्गनायक गेला व तो केळकरास घेऊन आला. तो केळकर लहानपणाचा माझा मित्र होता. पालगड गावात आम्ही लहानपणी एकत्र धिंगामस्ती केलेली होती. कवींनी त्याला दरडावून विचारताच तो एकदम म्हणाला, 'मी नाही गाठ मारली, मी नुसता उभा होतो. श्यामने गाठ मारली. मी नुसता हसत होतो व घंटा होताच निघून गेलो.'

वर्गावर वज्र पडावे तसे झाले. श्यामची मान मेल्याप्रमाणे खाली झाली. त्याचा मुखचंद्र एकदम काळवंडला. प्रेतकळा तोंडावर आली. आता काय होणार, याची सर्वांना भीती वाटू लागली. तो नरसिंह अवतार श्यामला चावू का खाऊ करीत होता. राधारमण खवळले व गरजले. केळकर निघून गेला. मला टेबलाजवळ बोलविण्यात आले. टेबलाजवळ मी अपराध्याप्रमाणे उभा राहिलो. 'हरामखोर ! मोठा साळसूदपणाचा आव आणतो नाही ? सा-या वर्गाला स्वत:ची कातडी वाचविण्यासाठी मार खायला लाविलेस ? बेशरक ! निलाजरा कुठला-' वगैरे शब्दवृष्टी माझ्यावर होत होती. वर्गनायकाला त्यांनी दोन-चार निगडीच्या काठया आणावयास आज्ञा केली. काठया आल्या. राधारमणांनी दोन काठया हातात घेतल्या व मला हात पुढे कर, अशी आज्ञा केली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel