हे गृहस्थ म्हणाले, 'आमच्यापेक्षा तुमच्याजवळ श्रध्दा ? आमच्या अभिषेकांना हसता आणि पुन्हा श्रध्दा आहे म्हणता ?'
मी म्हटले, 'पाऊस पडला तरी वाहवा न पडला तरी वाहवा. माझा देव त्यामुळे जगत नाही वा मरत नाही. देव तारो वा मारो. तरीही त्याच्या मंगलावरची श्रध्दा ज्याची नाहीशी होत नाही तीच खरी श्रध्दा. देवाने जीवनाचे अमृत दिले किंवा मरणाचे विष दिले तरी दोहोंतही देवाची अपार करुणा जो पाहील, त्याचीच श्रध्दा खरी. मरणाचा खेळ करणारी कराल काली तिच्या क्रूर डोळयांत ज्याला प्रेमसुधेची गंगा दिसेल, त्याचीच श्रध्दा खरी. मागे महात्माजींनी २१ दिवसांचा उपास केला व तो जेव्हा पार पडला त्या वेळेस त्यांनी एका मित्रास पत्र लिहिले होते, त्यात त्यांनी काय लिहिले होते ?
'देवाच्या कृपेने पार पडलो; परंतु माझा देह पडला असता तरीही ती देवांची अपरंपार दयाच झाली असती.'
याला म्हणतात श्रध्दा. मातेच्या मारणा-या हातात अमृत असते, हे मुलाला माहीत असते. म्हणूनच आईचे मारुन झाले की, तो तिच्या पदरातच पुन्हा तोंड खुपसतो. तिच्या मांडीवर त्या मारणा-या हातांनी थोपटला जातो. खरी श्रध्दा सोपी नाही. श्रध्दा म्हणजे मरण आहे. श्रध्दा म्हणजे सुळावरची पोळी आहे. श्रध्दा स्वस्त वस्तू नाही.
परंतु तुमची श्रध्दा ही बाजारी श्रध्दा आहे. असल्या बावळट श्रध्देला मूठमातीच दिली पाहिजे. वीरांची श्रध्दा पाहिजे. तुमच्यासारख्या या अभिषेकी व नवशी श्रध्देपेक्षा, देव नाही असे म्हणणारा प्रांजल कर्मवीर अधिक श्रध्दावान होय. स्वत:च्या प्रयत्नावर तरी त्याची श्रध्दा असते. पुरीपुरी असते. मागून येणारे माझे काम पुरे करतील अशी श्रध्दा याचीही असते.'
मित्रांनो ! मूर्तिपूजेची प्रतिष्ठा आपण नाहीशी केली आहे. मूर्तीची पूजा करणारे आपण सा-या जगात सेवाहीन झालो आहोत, प्रेमहीन झालो आहोत. मूर्तिपूजेचा अर्थ काय ? दगडातही मी सौंदर्य पाहीन, हा त्याचा अर्थ. दगडालाही तुच्छ मानणार नाही. त्या दगडातील सुप्त सौंदर्य मी उघडे करीन व त्याला वंदन करीन. सा-या सृष्टीत तुच्छ अशी जी वस्तू तीही उच्च मानणे, सौंदर्यसिंधू मानणे याला म्हणतात मूर्तिपूजा. दगडातील सौंदर्य पाहणारा माणसात सौंदर्य पाहू नाही का शकणार ! परंतु दगडाची पूजा करणारा शिक्षक मुलाला दगडोबा म्हणून छडया मारतो ! त्याला त्या मुलातील दिव्यता का न दिसावी ? ती प्रकट करण्यासाठी प्रेमाने व भक्तीने त्याने का आजन्म कष्ट करु नयेत ?