दिलमा दिवा करो

मी त्या मैदानात बसून माझा प्रेमदीप पाजळीत होतो. आमच्या प्रेमदीपावर काजळी भरली होती. रामच्या घरी निरहंकारपणे जाऊन मी माझा दिवा पुन्हा प्रज्वलित केला होता. कित्येक महिन्यांची काजळी झडझडून टाकली. शेवटी मी उठलो. उशीर झाला तर घरी रागे भरतील. असे मनात येऊन मी लगबगीने निघालो. मी घरी आलो तो घरची मुलांची जेवणे होऊन गेली होती. मी पाय धुऊन गेलो. आतेभावाची पत्नी मला म्हणाली, 'आम्हाला वाटले घरी येता की नाही.?'

"वयनी ! मला कधीही उशीर होत नाही. मी क्रिकेट खेळण्याचे सुध्दा सोडून दिले. एखादे दिवशी उशीर  झाला तर नाही का चालणार ?' मी विचारले.

"आम्हाला का तोच उद्योग आहे सारखा ? पाने वाढणे, उष्टी-शेणे, सारखे तेच. तुमचे पान तेथे     झाकून ठेवले आहे. घ्या आणि स्वत:चे उष्टे काढून शेण लावा. ताट नीट घासून आणा !' वयनी म्हणाली.

आज वयनी प्रसन्न नाही, हे मी ओळखले. प्रत्येकाच्या मनात सुखदु:खे आहेत. मी माझे पान वाढून घेतले. मी एकटाच तेथे जेवत होतो. माझे पोट भरुन आले. एक-दोन घास मी खाल्ले व तसाच उठलो. सारे ताट मी गाईसमोर नेऊन ठेवले. गाईने ताट चाटून पुसून लख्ख केले. मी ताट घासले. शेणगोळा फिरवला. जेवण आटोपून मी एकदम अंथरुण घालून पडलो. एवढी माझी जाड गोधडी तीही उशाशी ओलीचिंब झाली.

लागोपाठ दोन-तीन रविवार मी रामच्या घरी गेलो. राम भेटत नसे. मी अर्धा तास बसून खिन्न मनाने परत येत असे; परंतु रामच्या मनावर माझ्या तपश्चर्येचा परिणाम झाल्याशिवाय राहिला नाही. वाटाघाटी सुरु झाल्या. एकदम अबोला कसा मोडावयाचा ? काही इतर मित्रांनी मध्यस्थी केली. राम व श्याम दोघांनी दहा दहा पावले एकमेकांकडे चालत यावयाचे व दोघांनी एकदम एकाच क्षणी एकमेकांच्या नावाने हाक मारावयाची असे ठरले. तडजोडीचा दिवस उजाडला. साक्षीदार आले. राम श्याम आले. दोन्ही बाजूंनी दोघे दहा-दहा पावले चालत आले. एकमेकांनी एकमेकांचे हात हातात घेतले. श्यामने 'राम' व रामने 'श्याम' अशी एकदम हाक मारली. मिटले भांडण ! सुटले ग्रहण ! माझा आत्मचंद्र प्रेमाकाशात मिरवू लागला ! माझा आत्महंस प्रेमस्नेहाचा मोत्याचा चारा खाऊ लागला.

रामने एके शनिवार मला चिठ्ठी दिली. कसली होती चिठ्ठी ? काय होते तिच्यात ? मी ती चिठ्ठी पुस्तकात धरुन कितीदा तरी वाचली. रामने मला फराळासाठी बोलाविले होते. त्या दिवशी एक शिक्षक आमच्या वादविवादोत्तेजक मंडळातर्फे एका विषयावर बोलणार होते. गीतेवर बोलणार होते. मी असला प्रसंग कधी सोडावयाचा नाही; परंतु रामकडे जावयाचे होते. बौध्दिक व वैचारिक मेव्यापेक्षा प्रेमाचा मेवा मला मोलवान वाटत होता. मी फळासाठी भुकेला नव्हतो; परंतु रामच्या घरी जाण्यास भुकेलेला होतो. ज्या आमंत्रणासाठी मी वाट पहात होतो ते आमंत्रण आल्यावर मी ते कसे झिडकारु ?

इतरही मित्र रामकडे आले होते. आम्ही सारे मित्र फराळास बसलो. सारे गप्पा गोष्टी करीत होतो, खेळत-खिदळत होतो. हा श्याम फारसे बोलत नव्हता. तो सुखावला होता. भरलेले भांडे थोडेच बोलणार ! श्यामचे डोळे बोलत होते. त्याच्या तोंडावरची प्रसन्नता, कोमलता, मधुरता शतजिव्हांनी बोलत होती. हृदये हृदयाला मिळाली. गंगा यमुनेला मिळाली. रामला श्यामची अंधुकशी ओळख झाली. पुरी ओळख व्हावयास किती तरी वर्षे लागावयाची होती !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel