१४. शनिमाहात्म्य व रामाचे चित्र

पुण्यासही माझ्या भक्तिभावास पोषक असे वातावरण मला मिळाले होते. आमच्या वाडयात पारिजातकाचे झाड होते. त्याची फुले मी गोळा करीत असे. गुरुवारी मामांकडे भजन असे. त्यांचे मित्र जमत. मामांकडे दत्ताची जशी भव्य गंभीर तसबीर होती तशी तसबीर मी दुसरीकडे कोठेही पाहिली नाही. मामा एकतारी छान वाजवीत. त्यांच्या एकतारीचा आवाज गोड होता. मामांना दत्ताची किती तरी पदे पाठ येत होती. दत्ताचे पाळणे, दत्ताचे धावे, दत्ताच्या आरत्या, त्यांना लिहून घेतल्या होत्या. मामा तन्मय होऊन पदे म्हणत. ते श्रोत्यासही तन्मय करीत.

खुन्या मुरलीधराच्या देवळात काकडआरती सुरु झाली होती. आमच्या वाडयातील काही बायका जात असत. त्यांच्याबरोबर आंघोळ करुन मीही जावयाचा. पहाटेची वेळ असे. आकाशात ठळक ठळक तारेच त्या वेळेस दिसत असत. लहानसा धूमकेतू त्या वेळेस दिसत असे. त्याच्या आदल्या वर्षाचा धूमकेतू तर प्रचंड होता. जवळजवळ निम्म्या आकाशापर्यंत धूमकेतूची शेंडी येत असे. त्यावेळेस सातवा एडवर्ड राजा मरण पावला; परंतु पुन्हा लहानसा धूमकेतू दिसू लागला. आम्ही म्हणत असू, 'आता कोणता राजा मरणार ? हा लहान धूमकेतू आहे; म्हणून लहानच राजा मरेल.' पहाटेच्या प्रशान्त वेळी तो छोटा धूमकेतू मोठा सुंदर दिसत असे.

खुन्या मुरलीधराच्या देवळातील काकडआरती फार चांगली होत असे. काकडा ओवळणारा पुजारी वेठ न मारता मनापासून नीट सावकाश ओवाळी. देवळात पणत्या लावलेल्या असत. हृदयातही भक्तिप्रेमाचे दिवे लागत असत. पहाटे काकडआरती असे तर रात्री गालिचे असत. निरनिराळया मंदिरांत रांगोळीचे गालिचे भरलेले असत. हौदांतून फुलांचे गालिचे रचीत. पुण्याला हा मोठा महोत्सवच असतो. लहान, थोर, स्त्री-पुरुष हे गालिचे पहावयास जात असतात.

दीपावाळीच्या सुमारास ओंकारेश्वराजवळ काळी फार मौज असे. त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी सा-या ओंकारेश्वराच्या मंदिरावर पणत्या लावलेल्या असत. नदीपलीकडील व नदीअलीकडील लोकांची दारुकामाची लढाई चालत असे. त्यांनी इकडे बाण फेकावयाचे, त्यांनी तिकडे फेकावयाचे. दारुचे बाण सू करीत उंच आकाशात जात व हिरेमाणके फेकीत हवेत विलीन होऊन जात.

दीपावली झाली. कार्तिकी एकादशी आली. एकादशीला तुळशीबाग व बेलबाग येथे गर्दी असावयाची. तुळशीबाग म्हणजे बायकांचे साहित्य पुरविण्याची जागा. रामाचे दर्शन घेण्याऐवजी संसारोपयोगी जिन्नस घेण्यासाठीच मुख्यत: गर्दी जमत असे. रामात राम कामात काम या दोन्ही होत. तुळशीबागेत संसार व परमार्थ या दोहोंची जोड घातलेली आहे. संसारोपयोगी वस्तूंच्या समुद्रात राम बसलेला आहे. आजूबाजूला अनंत संसाराचा पसारा व मध्ये हा जगदभिराम मेघश्याम राम आहे.

तुळशीबागेमध्ये आहे सुंदर सुमूर्ति रामाची  ।
नयनी नित्य पाहाता हरतिल पापे अनंत जन्मांची  ।।

श्रीरामाच्या मूर्ती तुळशीबागेमधे कशा रमल्या।
ज्याल त्याला पावती श्रीमंतांच्या मनामध्ये भरल्या  ।।   

हे श्लोक लहानपणी मी पाठ केले होते. तुळशीबागेतील मूर्ती पेशव्यांनाही आवडल्या, असे या आर्यांत सांगितले आहे. तुळशीबागेत थोर रामशास्त्री, मुत्सद्दी नाना फडणीस यांच्यासारखी रत्ने कथाकीर्तनास येऊन बसत. नाना कीर्तनास येताच सर्वत्र एकदम शांतता व स्तब्धता पसरे, असे सांगतात. व्यवस्थितपणा, शिस्त, टापटीप, हिशोबीपणा याबद्दल नानांची हिंदुस्थानभर ख्यातीच होती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel