१२. दूध

भारतवर्षात गाईच्या दुधाचा महिमा गोपालकृष्णाने वाढविला. गाईच्या दुधासारखी हितकर अन्य वस्तू नाही, असे सांगतात. परंतु ज्या देशात गाईला देवतेची व मातेची थोरवी देण्यात आली त्या देशात आज गाईचे दूध कोठे कोठे औषधालाही मिळेनासे झाले आहे. विशेषत: महाराष्ट्रात तर गोदुग्धाचा फारच दुष्काळ. शिवाजी महाराजांनी गाईसाठी प्राणाकडेही पाहिले नाही. त्यांच्याच या महाराष्ट्रातील मुलाबाळांना गोमातेचे दूध मिळणे मोठी दुष्कर वस्तू होऊन बसली आहे.

महाराष्ट्र आजकाल म्हशीच्या दुधातुपावरच पोसला जात आहे. महाराष्ट्र नावापुरता गोभक्त आहे; परंतु कृतीने म्हशीचाच उपासक आहे. गोमातेच्या दुधावर महाराष्ट्राचे संगोपन होत नाही. आहाराचा जर आचारावर परिणाम होत असेल तर म्हशीच्या दुधातुपाचाही अर्वाचीन महाराष्ट्रावर परिणाम झाल्यावाचून राहिला नसेल. गाईच्या तुपाने बुध्दी तरतरीत तेजस्वी राहते. गाईच्या दुधातुपाने आळस उत्पन्न होत नाही. गाय कधी चिखलात लोळणार, डबक्यात आनंदाने डुंबणार नाही. गाईला घाण सहन होत नाही. गाय सहसा बसत नाही. ती उभी असते. गाईच्या दुधावर पोसणारी राष्ट्रे आळशी होणार नाहीत. घाणीत लोळणार नाहीत. ती नेहमी खडी असतील. देशासाठी मरणारे लोक तेथे असतील. गाईच्या दुधाने माणसाची उंची वाढते, असे जपानात प्रयोग करुन सिध्द करण्यात आले आहे. जपानात मुलांना वाढत्या वयाच्या वेळेस दूध पुरविण्याचे महान प्रयत्न होत आहेत. जपानी लोकांची उंची वाढविण्यासाठी जपान आटोकाट प्रयत्न करीत आहे.

महाराष्ट्रातील लोकांची सर्वसाधारण उंची कमी पडत चालली आहे. शरीराची उंची कमी होत आहे व मनोबुध्दीची उंचीही कमी होत आहे. उंच तणे व उंच मने महाराष्ट्रात दिवसेंदिवस दुर्मिळ व दुर्दर्श होत आहेत. गाईच्या दुधाने शरीर उंच होत असेल, त्याप्रमाणे मन, बुध्दी, हृदय हीही उंच होत असतील यात शंका नाही. परंतु महाराष्ट्रात हे कसे व्हावे ? म्हशीच्या दुधातुपाचे गुण महाराष्ट्रीयांच्या अंगी हळूहळू येत आहेत. म्हशीला डबके आवडते. म्हशीला चिखलात लोळणे आवडते. संकुचितपणाच्या डबक्यात महाराष्ट्रीयास रहाणे प्रिय वाटते. कलहमत्सराच्या चिखलात राहणे त्याला आवडते. हेल्याचे गुणधर्म आमच्यात दिसून येत आहेत. सर्वांकडे वाकडया नजरेने पाहाणे, सर्वांना उन्मत्तपणे मारावयास धावणे व फारसे कोणाच्या उपयोगी न पडणे हे हेल्याचे गुणधर्म आहेत. हेला एकटाच ऐटीने शिंगे उभारत राहणार. त्याला ना ठावे सहकार्य, ना ठावी उदारता. या संतांच्या व वीरांच्या थोर महाराष्ट्रभूमीत हे दुर्गुण दिसत आहेत. आपल्या पूर्वजांनी मृत्यूचे वाहन हेला हे केले आहे. त्यात महान अर्थ आहे. जे लोक हेल्याप्रमाणे फारसे उपयोगी येत नाहीत, जे सदैव उन्मत्तपणे दुस-यांना मारावयास धावतात, जे चिखलात निरुद्योगीपणे लोळत असतात त्यांच्यावर मरणाची प्रेतकळा आल्यावाचून कशी राहील ? जे राष्ट्र आळसात लोळत पडते व उठलेच तर परस्परांस मारावयासच केवळ उठते, त्या राष्ट्रावर मृत्युदेवाची स्वारी होत असते. आज भारतवर्षावर मृत्यूची अवकळा आलेली आहे. कारण हेल्याचे गुणधर्म राष्ट्रात ठायी ठायी दिसून येत आहेत.

म्हशीला चिखलात लोळण्यास खंत वाटत नाही. त्या म्हशीची पूजा करणारे लोकही तसेच घाणीत लोळण्यात खंत मानीत नाहीत. खेडयात जाऊन पहा. खेडी म्हणजे उकिरडयावर वसलेली आहेत. असे वाटते. शौचास लांब जाणार नाहीत. सारी घाण करुन ठेवतील. शहरातील मुलांना घरासमोर बाहेर रस्त्यावर शौचास बसवितात. एकदा पुण्यातील एका वाडयातील बाईने मुलास बाहेर शौचास बसविले. नगरपालिकेच्या नोकराने त्या मुलाला उठविले. तो मुलगा रडत घरात गेला. माता नागिणीप्रमाणे बाहेर आली व त्या नोकरावर शिव्यांची लाखोली वाहती झाली. शेवटी ती म्हणाली, 'उद्या स्वराज्य मिळू दे; म्हणजे बघते. कोण उठवील माझ्या मुलाला ते !' हे शब्द मी स्वत: ऐकले आहेत व हा प्रसंग पाहिला आहे. त्या शब्दांनी मला एवढाच आनंद झाला की, लोकमान्यांनी उच्चारलेला स्वराज्य हा शब्द चुलीजवळ गेला आहे. स्वराज्य म्हणजे स्वातंत्र्य. स्वराज्य म्हणजे स्वत:च्या हातात सत्ता असणे, ही गोष्ट स्त्रियांनाही कळली आहे व त्यांना ती सत्ता पाहिजे आहे; परंतु त्यांना घाणीत लोळण्याचे व घाण करण्याचे स्वातंत्र्य पाहिजे आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel