एकमेकांची दहने  ।  पाहून न होता शहाणे

माझ्या आत्याचे घर टेकडीच्या पायथ्याशी होते. टेकाड फोडून खणून आत्याच्या यजमानांनी जमीन तयार केली होती. आत्याच्या यजमानांना आम्ही तात्या म्हणत असू. तात्या तरुणपणी फार उद्योगी होते. डोंगर खणून त्यांनी पीक घेता येईल, अशी जमीन तयार केली. कितीतरी फणसांची व आंब्यांची झाडे त्यांनी स्वत:च्या हातांनी लाविली. त्या झाडांना फळे येऊ लागली होती. तात्या अभिमानाने सांगायचे, 'ही सारी माझ्या हातची झाडे.' तात्यांना फुलझाडांचाही फार नाद होता. त-हेत-हेची फुलझाडे त्यांनी लावलेली होती. अनंत, बटमोगरा, साधा एकेरी मोगरा, कण्हेरी, कांचन, तगर, जाईजुई, गुलाब, जास्वंद, कितीतरी फुलझाडे त्यांच्याकडे होती. गजरी जास्वंद, कातर जास्वंद, पांढरी जास्वंद, कितीतरी पुन: त्यांत प्रकार होते ! त्यांनी सोनचाफा, कंकरी वगैरे कितीतरी सुवासिक फुलझाडे माझ्यासमक्ष लाविली. ते म्हातारे झाले होते, तरी त्यांचा उत्साह कायम होता. त्यांना दम लागत असे. तरी ते काही ना काही परसात करीतच असावयाचे. पावसाळा आला की, चांगल्या आंब्याच्या जपून ठेवलेल्या बाठी ते परसाच्या कडेला लावावयाचे. दर वर्षी नवीन फळझाडे, नवीन फुलझाडे लाविल्याशिवाय ते राहात नसत. त्यांनी कॉफीचे  झाड लाविले होते. ते छान झाले होते. त्याला कॉफीची ती बारीक बारीक लालसर हजारो फळे लागत. पेरुची झाडे, जांबाची झाडे, नारळी पोफळीची झाडे, केळी, सारे प्रकार तेथे होते. तुतीचे झाड प्रथम मी तेथेच पाहिले. चंदनाची झाडेही त्यांनी लाविली होती.

तात्यांनी टेकडीच्या टोकाला एक मोठी गुहा खोदली होती. प्रचंड जांभ्या दगडात ती १० फूट x १० फुटाची गुहा होती. गुहेच्या दारातून वाकून जावे लागे. आत शांत गंभीर वाटे. गुहेच्या आत चोहो बाजूंस, तसेच वर खाली छिनून छिनून सारखे केले होते. प्राचीन काळी लेणी कशी खोदीत त्याची कल्पना आम्हाला तात्यांनी दिली. तात्यांनी पुढेमागे ध्यानधारणा करण्यासाठी म्हणून ही गुहा खोदली होती.

तात्या निर्भय होते. दूरच्या एका पहाडात त्यांचे गवत होते. डोंगरातील आपल्या मालकीच्या गवताच्या जागेला 'लाग' म्हणतात. तात्या लागीत रात्री रखवालीसाठी जात असत. डोंगरात रानडुकरे असतात. रानडुकरांची मुसंडी मोठया जोराची असते. रानडुकराजवळ लढणे सोपे नसते. तात्या पाजळलेला एक लखलखीत सुरा जवळ घेऊन जात. ते म्हणत, 'आलीच वेळ तर डुकराची आतडी आणीन.' समोरुन वाघ आला तर तात्या भीत नसत. कोकणातील वाघ फार भयंकर नसतात. तरी किती झाले तरी वाघच तो. तात्या रात्री दुस-या एका तात्या प्रधान नावाच्या सुखवस्तू गृहस्थाकडे गप्पा मारावयास जावयाचे, ते रात्री बारा बारा वाजताही घरी परत येत. तशा वेळेस कधी कधी वाघ त्यांना सामोरी येई. तात्या तसे प्रसंग सांगत असत.

तात्या फार स्वाभिमानी होते. ते सरकारी पोलिस पाटील होते. 'एकदा कलेक्टराचा मुक्काम आला होता. कलेक्टरच्या बरदाशीसाठी जे बिल होते ते त्यांनी कलेक्टरकडे पाठवले. त्या बिलात 'सहा आणे चार पै' जास्त आकारण्यात आले असे कलेक्टरने कळवले. कलेक्टरने तेवढी रक्कम नामंजूर केली. उगाच ठपका दिलेला तात्यांना सहन झाला नाही. तो सहा आणे चार पैचा प्रश्न नव्हता. तो चारित्र्याचा व नीतीचा प्रश्न होता. तात्यांनी कलेक्टरवर फिर्याद केली. त्यांनी कलेक्टरला कोर्टात खेचले. कोर्टात कलेक्टरला खुर्ची देण्यात आली. तात्या कोर्टात म्हणाले, 'कोर्टात सारे सारखे. न्यायासनासमोर उच्च नीच नाही, कलेक्टरला जर खुर्ची देण्यात आली तर ती मलाही मिळाली पाहिजे.' शेवटी तात्यांनाही खुर्ची मिळाली. तात्यांचा हा सहा आणे चार पैचा खटला सर्वश्रेष्ठ न्यायासनापर्यंत गेला. शेवटी तात्या विजयी झाले. सहा आणे चार पैचा सर्व खर्च त्यांना मिळाला. निर्णयपत्रात न्यायाधीशांनी कलेक्टराचे चांगलेच कान उपटले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel