राजेश मुंबईला जायला निघाला तेव्हा सुनंदा सुरुवातीला राजेशच्या आईसोबत गावातच थांबली कारण राजेशने बोरीवलीची रूम सोडून गोरेगांवला फिल्म सिटी जवळच घर शोधण्याचा निर्णय घेतला. सगळी व्यवस्था लावल्यानंतर तो मग तिला पुन्हा घ्यायला येणार होता. दरम्यान त्याने कोणतेही मेसेज चेक केले नाहीत कारण गावाकडे घडले ते सगळे त्याच्या मनाविरुद्ध होत होते आणि त्याचे मन त्याच्या ताब्यात नसल्यासारखे होते. त्याने जितेंद्रला तसेच इतर ज्यांच्यासाठी तो लिखाण करत होता त्यानाही थोडक्यात कॉल करून त्याला परत यायला उशीर होईल असे कळवले, मात्र लग्न झाल्याचे त्याने अजून कुणाला सांगितले नव्हते. नंतर त्याने एके दिवशी मुंबईची ट्रेन पकडली आणि निघाला - पुन्हा स्वप्ननगरी मुंबईत!
राजेश स्टेशनवर उतरला तेव्हा मुंबई तीच होती. तीच लोकलची जीवघेणी गर्दी आणि तेच ते एकामागून एक येणारे स्टेशन्स. समुद्रही तोच आणि तसाच ! कधी शांत तर कधी खवळलेला! दिवसरात्र धावणारे रस्ते. सगळे तेच होते. बदलले होते फक्त राजेशने आयुष्य! मुंबई सोडतांना सुप्रियाशी जाणूनबुजून केलेली ताटातूट आणि मग येतांना नको असलेल्या एका सोबतीचे ओझे. प्रत्यक्ष ती सोबत सोबतीला नव्हती पण मनावर असलेले ओझे होतेच!
राजेश चे दुसरे मन त्याला म्हणू लागले , "नाही राजेश! सुनंदाला तू हे जे ओझे मानतोस, ते चूक आहे. तू तुझी संमती दिली आहेस लग्नाला. मग तिला दोष देता कामा नये. काही गोष्टी आयुष्यात मनासारख्या होतात आणि काही मनासारख्या होत नाहीत. तू तर लेखक आहेस. तुला पूर्ण शक्य असूनही तुझ्या कथेतल्या पात्रांना तू त्यांच्या आणि तुझ्या मनासारखं भाग्य देतोस का? म्हणजे कल्पनेत सुद्धा तू तसे करत नाहीस मग हे खरे वास्तविक जग तर कल्पनेपेक्षा जास्त निर्दयी आहे."
बोरिवलीला रूमवर गेल्यावर दोन दिवस उदासवाणे गेले. मधूनच सुप्रियाची आठवण त्याच्या मन:पटलावरून तरळून गेली. ती कामानिमित्ताने सतत सोबत आणि जवळ होती. ती भेटायची तेव्हा त्याला असे काही प्रकर्षाने जाणवले नव्हते, पण आता ती अनेक दिवस भेटली नाही तेव्हा मात्र तीची आठवण येण्याचे प्रमाण वाढले. विशेषत: ब्रेकप झाल्यानंतर प्रथमच तो आतां मुंबईत आला होता त्यामुळे सुप्रियाची आठवण तीव्र व्हायला लागली.
तेव्हा राजेशने स्वत:ला बजावले, "नाही, राजेश. तुझे आता लग्न झाले आहे. सोड ते विचार!"
बोरिवलीची रूम सोडण्याआधी त्याने प्रथम जितेंद्र करमरकरची भेट घायचे ठरवले, मग इतर काही जणांना ज्यांच्यासाठी सुद्धा तो लिहित होता त्यांना तो भेटणार होता. पण जितेंद्र आठ दिवसांसाठी सुट्टीवर गेला होता. रोशन रोकडे पण भेटला नाही. मग आधी गोरेगांवला रूमची सेटलमेंट करून मगच आता सगळ्यांना भेटण्याचे त्याने ठरवले.
चार दिवसांत रूम शोधून झाली. पुढच्या काही दिवसांत सामान शिफ्ट झाला. त्याचे लेखन त्याने त्याच्या रेग्युलर सिरियल्सच्या निर्मात्यांकडे अगोदरच पाठवून ठेवल्याने ते लोक तसे निश्चिन्त होते. पण आता पुढच्या लेखनासाठी मात्र जास्त दिरंगाई झालेलीही चालणार नव्हती.
दरम्यान त्याच्या सिरियलच्या कामाने प्रभावित होऊन एका मराठी मालिका निर्मात्याकडून त्याला कथा, पटकथा आणि संवाद लेखनाची ऑफर आली पण ती मालिकेसाठी नसून मराठी चित्रपटासाठी होती. तो निर्माता सिरीयलनंतर आता आपले नशीब चित्रपट निर्मितीत आजमावून बघणार होता. त्यांनी चित्रपटाच्या विषयाबद्दल राजेशला कल्पना दिली होती आणि सविस्तर चर्चेसाठी प्रत्यक्ष भेटायला बोलावले होते. राजेशच्या आनंदाला पारावार राहिला नाही. अधून मधून घरी कॉल करून तो आई आणि सुनंदाशी जुजबी बोलत होता. सुनंदाला मुंबईला आणायला थोडा उशीरच होणार होता. कारण आधी या निर्मात्याला भेटणे आवश्यक होते कारण अशी संधी पुन्हा येणार नव्हती.
निर्मात्याचे नाव होते - समीरण देवधर! आतापर्यंत चार यशस्वी मालिका टीव्ही जगताला देणारे! चारही मालिकांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं होतं. टिपिकल गल्लाभरू सासू सुनेच्या ड्रामेबाजीपासून ते नेहमी दूरच राहिले होते. त्यांच्या चारही मालिका अगदी वेगवेगळ्या विषयांवर आधारित होत्या. त्यांच्या सगळ्यात पहिल्या मालिकेसाठी राजेशने संवाद लेखन केले होते.
समीरणने त्याला घरी भेटायला बोलावले होते. प्रथमच तो समीरणला घरी भेटायला जाणार होता. समीरण आरे रोड जवळ, आरे गार्डन रेस्टॉरंट जवळ असलेल्या "सुरभी" हौसिंग सोसायटीत रहात होता. आसपास अनेक मराठी आणि गुजराती व्यावसायिक रहात असत. त्याच्या घरी पोहोचतांना राजेशच्या मनात सारखी एक कल्पना घोळत होती. समीरणला ती कल्पना मान्य होईल की नाही याबद्दल तो साशंक होता. पण त्याला पटवून सांगण्याची त्याने पूर्णपणे पूर्वतयारी केली होती. समीरणने मान्य केले तर दोघांचा फायदा होणार होता आणि….?
बेल वाजली. समीरण घरी एकटा होता. त्याची पत्नी जॉबनिमित्ताने बाहेर आणि मुलगा शाळेत गेलेला होता.
दरवाजा उघडत समीरण म्हणाला, "अरे ये ये राजेश. काय म्हणतोस? ये बैस!"
राजेश एका सोफ्यावर बसला. टीव्ही सुरु होता. थोड्या वेळाने किचन मधून दोन कॉफी कप हातात घेऊन समोरच्या सोफ्यावर समीरण बसला.
एक कप राजेशला देत समीरण म्हणाला, "घे कॉफी! बोल राजेश. कसा आहेस?"
राजेश कॉफी घेत कम्फर्टेबल झाला आणि म्हणाला, "हो समीरण! आणि मी ठीक आहे. फार कमी वेळेत बराच काही घडून गेलंय माझ्या आयुष्यात!
समीरण, "म्हणजे? कसे? काय घडले ते?"
राजेश, "लग्न करून आलोय मी गावाकडून येतांना!"
समीरण कॉफी कप बाजूला ठेवत म्हणाला, "ओह माय गॉड! इट्स अ गुड न्यूज! अभिनंदन!", आणि त्याने हात पुढे केला. राजेशने अभिनंदन स्वीकारले व म्हणाला, "धन्यवाद!"
मग जुजबी विचारपूस झाल्यावर समीरण मूळ मुद्द्यावर आला.
समीरण, "हे बघ राजेश. आज मराठी इंडस्ट्रीत नवनवीन विषय हाताळले जात आहेत. हरहुन्नरी कलाकार, लेखक दिग्दर्शक उदयाला येत आहेत. विशेष म्हणजे प्रेक्षकांचा आश्रय जो कधी काळी मराठी चित्रपटांसाठी दुर्मिळ होता तोही आता मिळतोय. मल्टीप्लेक्स मध्येही मराठी चित्रपट हाउसफुल होत आहेत. अशा उमेदीच्या काळात अनेक निर्मात्यांना आणि दिग्दर्शकाना हुरूप न आला तर नवल!"
राजेश, "होय समीरण! बरोबर आहे तुमचे! भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके आज असते तर त्यांना खचितच खूप आनंद झाला असता. मध्यंतरी मराठी चित्रपट हळद, कुंकू, सासू सून, घरगुती भावनिक विषय अशा प्रकारच्या एकसूरी साच्यात अडकला होता. त्यातून आता तो समर्थपणे बाहेर पडलाय!"
समीरण, "आता कसे बरोबर बोललास! आज मराठी चित्रपट सगळ्या प्रकारचे आणि अगदी आजपर्यंत कधीही कुणीही स्पर्श न केलेल्या विषयांवर सुद्धा समर्थपणे चित्रपट काढतोय. अगदी अलीकडील काळापर्यंत मराठी टीव्ही जगतात सुद्धा फारसे आश्वासक चित्र नव्हते. पण आज इतके मराठी चॅनेल निघाले आहेत आणि ते यशस्वीपणे वाटचाल करत आहेत"
राजेश, "हो ना. खरे आहे! पण अजूनही काही मराठी सिरीयल मात्र सासू सुनेच्या घरगुती दळणात अडकून पडलीय! उलट पूर्वी दूरदर्शन वर २३ भागांच्या मालिकेचा ट्रेंड होता तो बरा होता. त्यावेळेस पण मालिकेत विविध विषय हाताळले जात असत! पण असे जरी असले तरी या इंडस्ट्रीत लेखक आणि पटकथा लेखक म्हणून टिकून राहाण्यासाठी अशा प्रकारच्या काही मालिकांसाठी मीही तेच करतोय. तेच ते सासू सुनेचे दळण! पण तसं पाहिलं तर तेही लिहिणं म्हणजे वाटतं तेवढं सोप काम नाहीये. रोज रोज प्रेक्षकांना कथेमध्ये काहीतरी वेगळं देऊन सिरीयलच्या पुढच्या भागाकरता गुंतवून ठेवणं तितकसं सोपं काम नाही. मोठ्या प्रमाणावर ज्या प्रकारच्या सिरीयल बनतात त्यांच्यासाठी लेखन करणं आवश्यक आहे, त्याशिवाय आमच्यासारख्या लेखकाचं पोट कसं भरणार?"
एव्हाना कॉफी संपली होती. समीरणने घरातील बाईला ताजा स्वादिष्ट स्वयंपाक बनवायच्या सुचना दिल्या.
समीरण हसत म्हणाला, "होय! तेही खरेच आहे. मलाही ते घरगुती विषयाचं जरा वावडंच आहे! बाकी काहीही असो पण पटकथा लेखनासोबतच तुझे संवाद लेखन फारच मस्त आहे बुवा! आपल्याला अगदी आवडलंय ते! आणि आता मी चित्रपट निर्मितीत उतरायचे म्हटल्यावर विषय तसे मुळीच नसणार आहेत. तर मला म्हणायचं आहे की माझेकडे दोन तीन विषय आहेत. दोन वर्षांच्या अंतरानंतर दोनेक चित्रपट काढायचा माझा विचार आहे. विषय मी सुचवणार. निर्मिती मी करणार. दिग्दर्शन सुद्धा मीच करणार आणि कथा, पटकथा आणि संवाद लेखनाची धुरा तू सांभाळायची. त्याचबरोबर चित्रपटाचे काही हक्क आणि नफ्यात हिस्सा सुद्धा देईन म्हणतो ते!"
राजेश, "धन्यवाद माझ्यावर एवढा विश्वास टाकल्याबद्दल. मी नक्कीच माझं सृजनशील लेखन सर्वस्व यात ओतणार यात वाद नाही! आजकाल अजूनही बरेच नवोदित लेखक या फिल्म इंडस्ट्रीत येण्यात धडपडत आहेत. बरेचदा त्यांच्या कथांची सपशेल चोरी होते आणी त्याचे क्रेडीट सुद्धा त्यांना दिले जात नाही! "
येतांना राजेशने मनात योजून ठेवलेली गोष्ट हळूहळू आता समीरण जवळ काढायची वेळ आली आहे हे राजेशच्या लक्षात आले.
समीरण, "होय अगदी खरे आहे. मराठीत सुद्धा हा प्रकार आहेच पण हिंदीत तर हे प्रकार फार वाढलेत. कायदे धाब्यावर बसवून काही लेखकांच्या कादंबऱ्या किंवा कथा संहिता डायरेक्टर लोक वाचतात, ऐकून घेतात, रिजेक्ट करतात आणि मग काही वर्षांनी त्यात थोडा फेरफार करून त्यावर चित्रपट काढतात आणि पुन्हा त्या मूळ लेखकांना धुडकावून लावत त्यांचे क्रेडीट स्वत:कडे घेतात!"
राजेश मनात म्हणाला, "समीरण अगदी मूळ मुद्द्यापर्यंत पोहोचलाय पण मी अजून माझ्यासोबत भूतकाळात घडलेले याला सांगणार नाही. त्याऐवजी मला भविष्यात काय करायचेय त्याबाबत एक पाऊल टाकायला समीरणची मला मदत घायची आहे. वेळ आली की समीरणला त्याबद्दल सांगता येईलच!"
समीरण, "कसल्या विचारांत गढून गेलास राजेश?"
राजेश, "नाही समीरण! तू जे आता म्हणालास ते अगदी योग्य आहे त्यावरच मी विचार करत होतो. बरं मी काय म्हणतो की माझी एक विनंती आहे"
समीरण, "काय विनंती आहे तुझी?"
राजेश, "सांगू की नको असे होत आहे!"
समीरण, "अरे बिनधास्त सांग. मला तुझा जवळचा मित्र समजून बिनधास्त सांग!"
राजेश, " मला असे सुचवावेसे वाटते की समीरण तू चित्रपट हिंदीत बनव! किंवा मी म्हणेन की पहिली चित्रपट निर्मिती तू हिंदीत करावीस. तू सुचवलेल्या विषयांपैकी एक विषय हिंदीत नवीन आहे. तेव्हा हिंदीत चित्रपट बनव!"
समीरण आश्चर्याने म्हणाला, "अरे काय सांगतोस राजेश हे? तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती.."
राजेश, "तू मला मित्र मनात असशील तर मी असा सल्ला देईन की जरी तू मराठीत अनेक मालिका यशस्वीरीत्या हाताळल्या आहेस तरी पहिली चित्रपट निर्मिती हिंदीत करावीस असे मला वाटते. अनेक हिंदी चित्रपट निर्माते दिग्दर्शक हे मराठी आहेत. त्यांनी सकस आणि दर्जेदार कथा असलेले हिट चित्रपट हिंदीत दिले आहेत. नंतर त्यांनी मराठीत सुद्धा यशस्वी चित्रपट निर्मिती केली आहे. आणि हिंदीतल्या काही चांगल्या लोकांशी तुझ्या ओळखी सुद्धा आहेत, त्या उपयोगी पडतील. आपण तुझ्या हिंदी चित्रपटात मराठी संगीतकराला आणी मराठी कलाकारांना संधी देऊ. त्यांना मोठं व्यासपीठ मिळेल. हिंदीत लोकांना आपण दाखवून देऊ की कथा चांगली आणि अभिनव असेल तर चित्रपट नक्की चालतो. त्याद्वारे सशक्त कथाकारांना आपण समोर आणू शकतो!"
समीरण बराच विचार करून म्हणाला, "हम्म! तुझा सल्ला आहे तसा मुद्द्याला धरूनच, पण मला थोडा वेळ दे! मी नक्की विचार करून सांगतो पण ...."
राजेश, "अगदी हवा तेवढा वेळ घे तू समीरण! शेवटी तुझा कोणताही निर्णय मला मान्य असेलच! मी लेखनासाठी सदैव तयार असेन!"
मग अवांतर गप्पा झाल्यानंतर जेवण तयार झाले होते. स्वादिष्ट जेवण खाल्ल्यानंतर समीरण कडून राजेश निघाला. त्याच्या मनात थोडी साशंकता होतीच की समीरण त्याचा हा प्रस्ताव स्वीकारेल की नाही त्याची! हरकत नाही पण अगदीच नकाराच्या भीतीपोटी प्रयत्नच न करण्यापेक्षा थोडा प्रयत्न त्याने करून बघितला होता. ही संधी तो स्वत: निर्माण करत होता. जर कदाचित संधीने हुलकावणी दिलीच तरी हरकत नव्हती. पुढे आणखी संधी नक्कीच येतील याबद्दल त्याला विश्वास होता. "नाहीतर मी संधी निर्माण करण्याचा पुन्हा प्रयत्न करेन!" राजेश मनात म्हणाला.