माया माथुरचे पती सुशांत माथुर हे एक नावाजलेले डॉक्टर होते आणि त्यांनी स्वत: उभारलेल्या एका मोठ्या हॉस्पिटल मध्ये ते नेहमी बिझी रहात. त्यांनी आजवर अनेक गरीब रुग्णांना मोफत किंवा अगदी कमी खर्चात ऑपरेशन आणि औषधसेवा दिली होती. डॉक्टरी पेशाचा कधीही त्यांनी दुरुपयोग केला नव्हता आणि माया माथुर एक प्रसिद्ध अभिनेत्री असल्याने दोघांच्या आयुष्यात खूप पैसा, प्रसिद्धी आणि नावलौकिक मिळाला होता. सौंदर्य, अभिनय आणि नृत्य या तीन गोष्टींच्या जोरावर तिने चित्रपटसृष्टीची अनेक वर्षे गाजवली होती. सध्या तिच्याकडे चित्रपट नव्हते पण ती डान्स क्लासेस घेत होती.

त्या दिवशी सहावीत शिकत असलेली माया माथूरची जुळी मुले घरी आली. दप्तर बेडवर फेकून ती दोघे ओरडत म्हणाली, "मम्मा, उद्या सुट्टी आहे. टुडे वी फिनिश्ड अवर क्राफ्ट प्रोजेक्ट. वी विल नॉट डू होमवर्क टुडे. वी आर गोइंग तो प्ले इन द गर्दन डाऊन!" असे म्हणून दोघांनी फ्रीजमधून ब्रेड आणि जाम काढले आणि मम्माला म्हणाले, "आम्हाला ब्रेड जाम आणि दूध दे मम्मा, मग आम्ही खेळायला जातो, पटकन दे! भूक लागली आहे!", असे म्हणून दोघेही टीव्ही लाऊन सोफ्यावर बसले.

दोघांची खाण्यापिण्याची आवड जवळपास सारखीच होती. एकाचे नाव अरुण आणि दुसरा वरूण.

"अरे बाबांनो, खायची घाई, खातांना टीव्ही पण पाहिजे, लगेच खेळायला जायची सुद्धा घाई? अरे दप्तरातून सकाळचा टिफिन आणि पाण्याची बाटली तर काढाल की नाही, की ते पण मीच काढू?" असे म्हणून ती प्रथम त्यांच्या दप्तराकडे गेली तेवढ्यात दोघे पुन्हा ओरडले, "आई प्रथम दूध जाम ब्रेड मग आमचा टिफिन नंतर काढ दप्तरातून!"

शेवटी तिने दप्तराचा नाद सोडला आणि ब्रेड जाम आणि दूध बोर्नव्हीटा करायला घेतले.

"चला, जा बेसिन मध्ये हात धुवून घ्या बरं आधी! चला उठा!" असे म्हणून तिने जबरदस्तीने त्यांना सोफ्यावरून उठवले आणि हात धुवायला पिटाळले.

अर्धा तास डोरेमोन आणि शिनचान बघता बघता दूध ब्रेड जाम खाऊन झाल्यावर मग ते दोघे खाली पळाले. लिफ्टमध्ये लिफ्ट अटेंडंट असल्याने तसे ते दोघे सातव्या मजल्यावरून खाली बागीच्याकडे जाऊ शकत होते. थोड्याच वेळात खिडकीसमोरच्या बगिच्या ते दोघे त्यांच्या मित्रांसोबत लपाछपी पळापळी खेळायला सुद्धा लागले होते. त्या दोघांना मुक्तपणे खेळताना पाहून मायाला इतर कशापेक्षाही जास्त आनंद झाला. त्यांचे टिफिन दप्तरातून काढतांना अचानक एक चिठ्ठी खाली पडली. ती मायाने उचलली! दप्तरात ही कोणती चिठ्ठी असे म्हणून ती चिठ्ठी उलगडतांना विचार करू लागली, "शाळेने एखादी सूचना पालकांसाठी लिहून दिली असावी!"

चिठ्ठी प्रिंटेड होती आणि लाल अक्षरात होती, ज्यामुळे माया जरा घाबरलीच.

"घाबरलात ना? मुलांच्या दप्तरात ही चिठ्ठी अचानक कशी आली ते बघून? तुमची दोन्ही मुले ज्या नावाजलेल्या शाळेत जातात त्यात इतकी सुपर सिक्योरिटी असूनही ही चिठ्ठी आम्ही मुलांच्या दप्तरात टाकू शकलो तेही त्यांच्या नकळत तर आम्ही त्यांना किडनॅप पण सफाईदारपणे करू शकतो! अ अ अ! पूर्ण वाचा आणि पोलिसांना किंवा तुमच्या डॉक्टर पतीला यातले काही एक सांगण्याचा विचार चुकुनसुद्धा मनात आणू नका! आता दुसऱ्या दप्तरातली चिठ्ठी वाचा!"

फुल एसीमध्ये चेहऱ्यावर घाम जमा होऊन माया थरथरायला लागली आणि तिने खिडकीतून खाली पहिले. मुले दृष्टीस पडली नाहीत. ती खूपच घाबरली आणि तिने आणखीन डोकावून पाहिले तेव्हा तिला अरुण घसरगुंडीहून सरकतांना आणि वरूण उंचच उंच झोके घेतांना दिसला. मेन गेट जवळ सिक्योरिटी गार्डस होते, मग तिला हायसे वाटले.

नोबिता घरातून गायब झाल्याने चिंता करत असलेली त्याची आई डोरेमोनला विनंती करते की कोणतेतरी गॅजेट काढ ज्याद्वारे तो नोबिताला शोधू शकेल, असे दृश्य टीव्हीवर सुरु असलेले पाहून तिने पटकन टीव्ही बंद केला आणि दुसरे दप्तर घेऊन त्यात तिने चिठ्ठी शोधली. त्यात लिहिले होते:

"सूरज तुमच्याकडे विनंती करण्याकरिता आला होता, तुम्ही त्याला नाही बोलला. तो तर फक्त आमचा मोहरा आहे. त्याला तुम्ही नाकारलेत, पण आमच्यापासून तुम्ही वाचू शकणार नाहीत. तुमच्या मुलांची सुरक्षितता हवी असेल तर सूरजच्या चित्रपटाला फटक्यात हो म्हणा! आमच्या भाईचा भाई त्यात काम करणार आणि माया माथुर त्याला नाही म्हणणार? भाईला सहन होईल का ते? सांगा बरं? तुमचे खूप भले आहे मॅडम असे करण्यात! काय मग फोन करून सांगता ना आताच सूरजला? दोन्ही चिठ्ठ्या मस्तपैकी जाळून टाका आता. खूप भलं होईल तुमचं असं केल्यावर!!"

घामाने डबडबलेल्या चेह्र्यासह ती मटकन खुर्चीवर बसली. पाणी पिता पिता ती विचार करू लागली, त्या चिठ्ठ्या जाळून टाकायच्या का? की कुठेतरी लपवून ठेऊ? सुश ला सांगू की नको? तो म्हणेल सोडून दे ही मनोरंजन नगरी! बास आणि बासरी दोन्हीही राहणार नाहीत. पण सोडून दिली समजा ही चित्रपटसृष्टी तरी माझ्यामागचे वलय कायम राहणार! आणि आता सोडण्याचा विचार केला तरी काय होणार? हा चित्रपट करावाच लागणार असं दिसतंय आणि समजा मी चित्रपट केला तरी काय हरकत आहे? प्रथम हो तर म्हणूया, शुटींग सुरु करुया मग बघू काय करायचे ते?

खिडकीतून हाका मारून तिने दोघाना वर बोलाऊन घेतले आणि त्यांच्यावर अनेक प्रश्नांचा भडीमार सुरु केला जसे –

"बेटा, तुला शाळा सुटल्यावर कुणी अंकल भेटले होते का?"

"बसमध्ये चढतांना कुणी भेटलं होतं का?"

"रस्त्यात कुणी..?"

सगळ्या प्रश्नाचे उत्तर "नाही" असे आले.

"का विचारते आहेस मम्मी आम्हाला असे?"

"काही नाही आपलं सहज रे! अनोळखी लोकांना भेटत जाऊ नका रे! चांगले नसतात बरे!" असे सांगून तिने विषय बदलून टाकला.

म्हणजे ज्यांनी दोघांच्या दप्तरात नकळत चिठ्ठ्या ठेवल्या ते सराईत गुन्हेगार असावेत. अशांच्या विरोधात जाण्यापेक्षा सध्या त्यांची मागणी पूर्ण करणे हाच उपाय आहे. चित्रपटात काम करा अशीच अपेक्षा ते करत आहेत दुसरे तर काही ते मागत नाहीएत, बघुया! आता हो म्हणूया मग पाहू! पण तिच्या मनात सूरजला भेटल्यापासूनच शंकेची पाल चुकचुकतच होती. कारण फिल्म इंडस्ट्रीत बऱ्याच जणांना रागिणीची आत्महत्या मान्य नव्हती, त्याना तो खूनच वाटायचा. शंकेला वाव होता. मायाला सुद्धा रागिणीच्या आत्महत्येमागे काहीतरी गौडबंगाल आहे असे वाटत होतेच. पण कुणाजवळ पुरावा नव्हता आणि कोर्ट पुरावा मागतं. जसा एखाद्या माणसाला जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजन हवा असतो तसा जज्जला न्याय देण्यासाठी पुरावा हवा असतो. काय करणार? जज्ज हा सुद्धा कायद्याच्या चौकटीत राहूनच न्याय देऊ शकतो!

सूरजला मायाकडून फोनवर गुड न्यूज मिळाली की ती त्याच्या कॉमेडी चित्रपटात काम करणार!

सूरज खुश होऊन मनात म्हणाला, "चला बरे झाले! पुन्हा व्हेरोनिकाला भेटायला जायला आता मी मोकळा आणि टेन्शन फ्री!"

कातील खान आणि माया माथूरचा तो विनोदी चित्रपट – "गँगस्टर की दुल्हन!" सुपरहिट झाला. त्यात ओलिव्हियाला त्याने महत्वाची भूमिका देऊ केली होती. त्या चित्रपटानंतर कातील खान भारतात राहायला येऊन त्याने मुंबईतच बांद्रयाला तळ ठोकला, भाईच्या कृपेने कमी किमतीत समुद्रकिनारी फ्लॅट मिळवला. माया माथुरच्या चित्रपटानिमित्त लाभलेल्या सहवासातच तो सध्या खुश होता. दरम्यान सूरजचे ड्रग्ज कनेक्शन वाढत गेले आणि त्याचे विनोदी चित्रपट सुद्धा सुपरहिट होत गेले.  त्याचे ओलोव्हीया आणि व्हेरोनिका सोबत प्रेमसंबंध अव्याहतपणे चालत राहिले. आणि प्रत्येक चित्रपटाच्या सुरुवातीला तो "माझे प्रिय प्रेम रागिणी, तुला हा चित्रपट समर्पित" असे वाक्य टाकायचा!

yyyy

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel