काही महिन्यानंतर -
शहरापासून दूर समुद्रकिनारी राजेशने एक बंगला विकत घेतला जेथे वीकेंडला किंवा कामापासून सुटी घेतल्यानंतर येता येईल आणि फॅमिली सह राहता येईल. तसेच निसर्गाच्या सानिध्यात, पक्ष्यांची किलबिल चालू असताना आणि समोर समुद्राचे पाणी असतांना लिखाण करायचे राजेशचे खूप वर्षांपासूनच मनात होते ते आता प्रत्यक्षात अवतरत होते. अधून मधून समुद्रकिनारी येऊन त्याने अनेक कथा लिहिल्या होत्या. अशा नैसर्गिक वातावरणात त्याची प्रतिभाशक्ती आणि कल्पनाशक्ती उफाळून यायची आणि कीबोर्ड द्वारे कॉम्प्युटर मधल्या कागदावर धडाधड उतरायची. त्याचा अगोदरचा फ्लॅट शहरात होताच.
आठ दिवस सुट्टी घेऊन तो येथे आला होता. हा बंगला नुकताच विकत घेतलेला होता. अर्धे पैसे आधीच दिले होते आणि अर्ध्या पैशांचे कर्ज काढले होते. एक दोनदा सुनंदा आणि अक्षर तेथे येऊन गेले होते पण तो बंगला पूर्णपणे राहण्यायोग्य बनला नव्हता. त्यासाठीच राजेश आठ दिवस येथे आलेला होता. एकटा. सुनंदा आणि अक्षर जवळ फ्लॅट मध्ये त्याची आई आलेली होती, काही दिवसांसाठी!
या आठ दिवसात बंगल्यातील फर्निचर तसेच समोरची छोटीशी बाग आणि इतर काही गोष्टी त्याला मार्गी लावायच्या होत्या आणि त्याचबरोबर थोडेसे लिखाणही करायचे होते.
आजूबाजूला दूर दूर अंतरावर छोटे छोटे बंगले होते पण त्यापैकी एखाद दुसऱ्याच बंगल्यात फक्त एक दोन माणसे दिसायची. इतर बंगले बंद राहायचे किंवा कुणीतरी एकटा दुकटा गडी दिवसभर देखभाल करायला तेथे थांबायचा. छोटे बंगले आणि काही मानवी वस्ती आणि तुरळक शेती, दुकाने, छोटी मोठी सरकारी कार्यालये आणि शाळा असे मिळून ते एक छोटेसे गांव होते.
आज सकाळपासूनच तेथे सुतारकाम करणारे, प्लंबर तसेच साफ सफाई करणारे कामगार आलेले होते. राजेशच्या मुंबईतील फ्लॅटमध्ये गेल्या एक महिन्यापासून घरकाम आणि स्वयंपाक करायला कायम गावाकडून आणलेला एक विश्वासू माणूस "गौरव देव" हा राजेश सोबत बंगल्यात आलेला होता आणि एकूणच इथल्या सगळ्या कामांवर देखरेख ठेवणार होता.
फर्निचरचे काम सुरू झाले.
"गौरव दा, मी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांवर देखरेख करा. कामे करवून घ्या. मी तश्या त्यांना तुमच्यासमोर सूचना दिल्या आहेतच, पण तरीही आता तुम्ही जातीने त्यांचेकडून कामे करवून घ्या. मी आता घराजवळच्या बागेत गवतावर बसून लॅपटॉपवर थोडे लिहायला बसतो आहे. काही लागलं तर सांगा मला!"
"हा राज साहेब. नक्की. तुम्ही काय बी काळजी नगा करू. म्या पाहतो सगळं. तुम्ही तुमचं लिव्हा!"
"बरं, गौरव दा आणखी एक करा. दहा मिनिटांत माझ्यासाठी गरमागरम डार्क कॉफी घेऊन या!"
कॉफी पिल्यानंतर राजेश लिहायला बसला. बराच वेळ तो लिहित होता. कामं पटापट आणि व्यवस्थित होत होती. घरातील खिडकीत ठोकठाक चा आवाज येत होता.
खिडकीत उभा राहून इलेक्ट्रिक करवतीने काम करणारा एक कामगार बराच वेळ बागेत बसलेल्या राजेश कडे एकटक बघत होता.
"ए, गड्या, काय बघतूया समोर? काम कर की आपलं!"
"आरं, मी ईचार करतूया की आपलं साह्यब एवढं काय लिवत्यात त्या ल्यापताप वर? नुसती खट खट खट बटण दाबत असत्यात. बोटं लई झर झर चालत्यात त्यांची न्हाई!"
"चालत्यात! आता तू बी आपली बोटं चालव. लेखक आहेत ते साह्येब. लै लोक वाचतात त्यासनी लीवलेलं!"
नंतर तो करवतवाला राजेश साह्यबाकडं एकटक पहात लाकडे कापत राहिला...
"काय गप्पा मारता रे! पटापट उरका तुमची कामं, टाईम पास नगा करू!" असे म्हणत गौरव देव तेथे आला आणि दोघांना तंबी देऊन गेला.
संध्याकाळी बरेच कामगार निघून गेले. रात्री आठ पर्यंत दोन जण होते ते सुध्दा नंतर निघून गेले.
"गौरव दा, माझ्यासाठी गरम फुलके आणि फोडणीचे वरण करा. आणि हो, थोडा भात पण टाका गरमागरम!"
"होय राज साहेब!"
मग राजेशने घरातल्या टेबलावर ठेवलेली त्याची लाल रंगाच्या कव्हरची फाईल उचलली. त्यात त्याची जुनी कादंबरी होती. ती कादंबरी पुढच्या वर्षीच्या दिवाळी अंकात छापण्याची तयारी दहा आघाडीच्या दिवाळी अंकांनी तयारी दर्शवली होती. दहा दिवाळी अंकांत एकच कादंबरी छापली जाण्याची ही पहिलीच वेळ असणार होती. त्या कादंबरीला स्वतः अमितजी प्रस्तावना लिहिणार होते.
फिल्मी क्षेत्रावर आधारित कादंबरी राजेशने आधीच लिहायला सुरू केली होती. हा चित्रपट राजेश मराठीत बनवणार होता आणि स्वतः प्रोड्युस करणार होता आणि समिरण डायरेक्ट करणार होता! तसेच समिरण आणि राजेशने मिळून अनेक मराठी चित्रपट निर्मिती करायचे ठरवले होते. मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय गोल्डन डॉल पुरस्कार मिळवून द्यायचा हेच एकमेव लक्ष्य दोघांनी ठेवले होते. फक्त एकदाच नाही तर पुन्हा पुन्हा! मराठी साहित्यिक आणि चित्रपट टिव्ही क्षेत्रात लिखाण करण्याची इच्छा असलेल्या नवोदित लेखकांना सर्वतोपरी मदत करायचे हे त्याने ठरवून टाकले होते. तसेच दरवर्षी दिवाळी अंकासाठी तो खास एक कादंबरी लिहून देणार होता, एक कृतज्ञता म्हणून!
बॉलीवूड मध्ये तर तो स्थिरावला होताच पण हॉलीवूडच्या टीम सोबत काम करून त्याचा अनुभव घेऊन ते सगळे तंत्र मराठीत वापरायचे हा त्याचा उद्देश होता. मात्र काही महिने उलटल्यानंतरही अजून प्रिसीला कडून हॉलीवूड चित्रपटात राजेशच्या लेखनासाठी होकार आलेला नव्हता. मागील महिन्यापासून प्रिसीला आणि इतर हॉलीवूड टीम "ग्रँड पर्पल" या सेव्हन स्टार हॉटेलमध्ये उतरली होती.
"एकदा मला प्रीसिला म्हणजे सुप्रियाला एकांतात भेटायला बोलवलं पाहिजे म्हणजे तिच्या मनात नेमके काय आहे ते कळेल!" असा विचार राजेश करत होता. पण पुन्हा वैवाहिक जीवनात यामुळे वादळ तर निर्माण होणार नाही ना? तो द्विधा मनस्थितीत सापडला. हॉलीवूडसाठी मिळालेली आयती लेखनाची संधी त्याला कोणत्याही परिस्थितीत सोडायची नव्हती.
राजेशने अभिजितसाठी लिहिलेल्या स्क्रिप्टवर चित्रपट शूट करून झाला होता फक्त रिलीज व्हायचा बाकी होता.
मागील काही महिन्यांत राजेशने ऐकले होते की सूरजच्या मृत्यूनंतर त्याची फूड चेन आणि त्याच्या फ्लॅटची जप्ती करण्यात आली कारण त्याचे आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया आणि टोळीशी संबंध असल्याचे पुरावे पोलिसांना आढळले आणि रागिणीच्या आत्महत्येची फाईल पुन्हा उघडली गेली. पोलिस तपास जोरात सुरू होता. सध्या पत्रकारिता थोडी कमी केली असली तरी त्याची टीम त्याला सगळ्या खबरी देत होतीच.
त्याच्या टीमकडून त्याला आणखी एक गोष्ट कळली होती ती म्हणजे वीणा वाटवे आणि पिके यांच्यात अलीकडे भांडणे वाढली होती. त्यांचा ब्रेकअप होऊ नये यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न सारंग करत होता. त्यांच्या भांडणाचे कारण आणि मूळ हे केके विरूध्द राजेशने आणि एकूण टीमने चालवलेल्या एकूण अभियानात होते.
तसेच सोनी बनकरच्या मुंबईतून अचानक गायब होण्यामागचे गूढ अजून उलगडले नव्हते. राजेश आणि त्याची पत्रकार टीम शोधून थकली पण सोनीचा ठावठीकाणा लागला नाही.
तिने पाण्यात उडी मारल्याचे कुणालाही माहिती नव्हते कारण तिचे प्रेत अजूनही कुणालाच सापडले नव्हते म्हणून गायब झालेले किंवा हरवलेले व्यक्ती यांच्या लिस्टमध्ये तिचे नाव पोलिस स्टेशन मध्ये लिहिलेले होते.
घरी अक्षर हळूहळू मोठा होत चालला होता. कधी कधी तो हवी ती वस्तू मिळवण्यासाठी खोटे खोटे रडण्याची अशी काही अॅक्टिंग करायचा की राजेशला वाटायचे की याचे नांव अक्षर न ठेवता अभिनय ठेवायला हवे होते.
"साहेब, हे घ्या, गरम फुलके आणि वरण. मग भात सुध्दा आणतो!"
गौरव देवच्या या वाक्याने विचार करता करता राजेश भानावर आला. त्याने गरमागरम जेवण करून घेतले. मग सुनंदा आणि आई तसेच अक्षर याचेशी तो फोनवर बोलला.
रात्री -
"साहेब, मी निघतो आता. परवा दुपारी येतो. माझ्या काकांकडे जाऊन येतो. त्यांनी बोलवलं आहे कधीचं! त्यांना थोडं महत्वाचं काम आहे."
"ठीक आहे, गौरव दा. हरकत नाही. या तुम्ही! आता उद्या मला सगळं बघावं लागणार पण हरकत नाही, एकाच दिवसाची तर गोष्ट आहे. मी करून घेऊन अॅडजस्ट!"
गौरव देव निघून गेला.
रात्री राजेशने बरेच लिखाण केले. रोज तो दिवसभरात लिहिलेले सगळे लिखाण ऑनलाइन गुगल ड्राईव्हवर सेव्ह करून ठेवायचा. आज मात्र त्याला कंटाळा आला आणि झोप पण खूप येत होती. लॅपटॉप बंद करून तो जवळच्या बेडवर गेला आणि झोपेच्या अधीन झाला.