दोन व्याख्यानें

"मित्रांनो, जळगांवच्या विद्यार्थिसंघानें जें हें पवित्र कार्य केलें त्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. आजपर्यंत खेड्यांची उपेक्षा होत होती. आतां तुमच्याकडे डोळे लागले आहेत. तुम्ही राष्ट्राचीं मुळें. तुम्ही बळकट झाल्याशिवाय सारें फुकट आहे. तुम्ही धान्य देतां. तुम्हांला ज्ञान द्यावयास कृतज्ञतेनें हे नागर तरुण आले आहेत. शहरें व खेडीं जवळ आलीं तर राष्ट्रपुरुष जिवंत होईल. साक्षरताप्रसार करणार्‍यास कोणी टिंगल करीत विचारतात, 'शिकून का आतां मामलेदार मुन्सफ होणार ?' आपण केवळ नोकरीसाठीं शिकावयाचें नाहीं. आपण माणसें आहोंत म्हणून शिकावयाचें. आपला संसार सुखाचा व्हावा, म्हणून शिकावयाचें. पदोपदीं शिकण्यावाचून आपलें अडतें. पत्र लिहितां येत नाहीं, आलेलें पत्र वाचतां येत नाहीं. मनीऑर्डर करतां येत नाहीं, अर्ज लिहितां येत नाहीं, हिशेब ठेवतां येत नाहीं. सारी फजीति होते. अज्ञानामुळें आपण नाडले जातों. पत्र लिहिणाराला दे पैसा. अर्ज करणाराला दे आणा. असें चालतें. त्याचप्रमाणें आपणांस जगांतील इतर लोक काय करीत आहेत, आपल्या देशांत काय चाललें आहे हें कळलें पाहिजे. नाहीं तर म्हणाला गांधींनीं व्यापार बुडविला, कांग्रेस महारमांगांना मंदिरांत घुसवते. मंदिरप्रवेशबिल म्हणजे काय ? 'मंदिराच्या पंचांनीं किंवा ट्रस्टींनीं जर हरिजनांस मंदिर खुलें करण्याचें ठरविलें तर सरकारची आडकाठी नाहीं.' असें तें बिल आहे. यांत कोणती सक्ति आहे, कोणावर जुलूम आहे ? परंतु एखादा सनातनी वाचाळपंडित येतो व कांहींतरी बडबडतो. तुम्हांला खरें वाटतें. प्रत्यक्ष वाचून पहा. त्यासाठीं शिका म्हणजे खरें खोटें कळूं लागेल. समर्थ सांगत, 'दिसामाजी कांहींतरी तें लिहावें, प्रसंगी अखंडीत वाचीत जावें.' रोज लिहा व वाचा. नवाकाळ, लोकशक्ति, काँग्रेस वाचा. आजचा वेद म्हणजे आजचें ज्ञान. कांग्रेसची हकीकत कळणें म्हणजेच रामायण, महाभारत वाचणें. गांधी काय म्हणतात, जवाहीरलाल कोठें आहेत, सारें माहित पाहिजे. शिकण्यानें धैर्य येतें. एखादा वाचलेला विचार जीवनांत क्रांति घडवितो. एकदां मी एक गोष्ट वाचली होती. तुरुंगांत एक राजकीय कैदी होता. त्याला फाशी देणार होते. जेलरची मुलगी फांसावर जाणारा कोणत्या मन:स्थितींत असतो तें पहावयास गेली. तो कैदी शांत होता. त्याच्या तोंडावर दिव्य तेज होतें. ती मुलगी म्हणाली, 'पहा तो तुमच्या खिडकीसमोर तुम्हांला फांशी देण्यासाठीं वधस्तंभ उभारण्यांत येत आहे. उद्यां सकाळीं तेथें फांसावर चढवतील. तुम्हांला त्याचें काहीं वाटत नाहीं ? तुमच्या डोळयांत अश्रु नाहीं, मुखावर खिन्नता नाहीं, प्रेतकळा नाहीं. तुमचे तोंड कमळाप्रमाणें फुललें आहे. हा काय चमत्कार आहे ?' तो कैदी म्हणाला, 'जगाची सेवा करतांना आलेलें मरण म्हणजे मेजवानी आहे; मरण म्हणजे अमृताचा जीवनदायी पेला आहे' ती मुलगी म्हणाली 'असें तुम्हांला कोणी शिकविलें ?' हातांतील पुस्तक पुढें करून तो म्हणाला 'या लहान पुस्तकानें.' ती म्हणाली, 'मला केव्हां बरें अशीं पुस्तकं वाचतां येतील ? बाबा तर शिकूं नको म्हणतात. मी केव्हां शिकेन, अशीं पुस्तकें केव्हां वाचीन ?'

मित्रांनो, साक्षरतेनें संसार सुखाचा कसा करावा तें कळेल. साक्षरतेनें तुम्ही फसविले जाणार नाहीं, साक्षरतेनें भय जाईल; साक्षरतेनें अक्षर व शाश्वत सुखहि मिळवाल. संतांनीं संस्कृतांतील सारें ज्ञानभांडार तुमच्या मराठी बोलींत आणलें. मराठी भाषेंत मंगल विचारांचा सुकाळ करण्यासाठीं श्री. ज्ञानेश्वरांनीं ज्ञानेश्वरी लिहिली. संतांनीं मराठींत लिहिलें. तें लिहिलेलें वाचावयास कोणी शिकवायचें ? आज जे शिकवितील ते संतांचें काम पुढें चालविणारे आहेत असें मला वाटतें.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel