राष्ट्रीय आठवडा
१९१९ सालीं अमृतसर येथें जालियनवाला बागेंत गोळीबार झाला. इतकें भयंकर अघोर तें कृत्य झालेलें आहे कीं, त्याचें वर्णन करतां येणें शक्य नाहीं. २० वर्षे झालीं. पण त्या प्रसंगाचें चित्र डोळयांपुढें उभें राहिलें म्हणजे अद्याप देखील शहारे येतात. जनरल डायर यांनीं गोळीबार केला. १५००० लोकांची सभा भरलेली होती. जालियनवाला बागेंतील पटांगण बाटलीच्या आकाराप्रमाणें आहे. म्हणजे सर्व बाजूंनी बंद व बाहेर जाण्यास त्या पटांगणाला फक्त एकच लहान दार आहे. जनरल डायर आपल्या साक्षींत म्हणाला, 'सभेंतील लोकांना मी जागा सोडून जावयास हुकूम सोडला होता व नन्तर २-३ मिनिटांनीं गोळीबाराचा हुकूम सोडला.' अधिकारमदानें धुंद झालेल्या त्या जनरल डायरच्या येवढेंहि लक्षांत आलें नाहीं कीं १५००० लोक २।३ मिनिटांत अगदीं छोट्याशा दारांतून एकदम कसे बाहेर पडतील ? त्यानें १६०० गोळ्या झाडल्या, 'इतकेंच काय पण आणखी गोळ्या शिल्लक असत्या तर त्याहि सोडल्या असत्या' असें तो साक्षींत म्हणाला. जनरल डायरच्या कारकीर्दीत तेथील लोकांची फारच कुचंबणा झालेली आहे. एका इंग्रज बाईचा कोणी अपमान केला म्हणून त्यानें गांवांतील सार्‍या हिंदी लोकांना रस्त्यावरून सरपटत जाण्याचा हुकूम सोडला. मनुष्यत्त्वाला न शोभणारा असा प्रकार त्या वेळीं झालेला आहे. ५०० च्या वर लोक गोळीबाराला बळी पडले. जखमी झालेल्या लोकांचे हाल तर विचारूंच नका. रात्रभर ते तसेच पडले होते. ना अन्न, ना पाणी, ना शुश्रूषा ! त्यांच्या जवळ जाणार कोण ? नको ! नको ! जास्त वर्णन करूं नये असें वाटतें. चीड येते. पण चीड येते ती जनरल डायर ह्या व्यक्तीची येत नाहीं, इंग्रज लोकांची येत नाहीं, तर ब्रिटिश साम्राज्यशाहीची येते.

साम्राज्यशाहीची तहान एका जालियनवाला बागेच्या कत्तलीनें शमणार नाहीं. शेंकडों जालियनवाला बाग प्रकरणे घडवून आणल्याशिवाय साम्राज्यशाहीचा पाय हिंदुस्थानांतून उखडणें शक्य नाहीं. वसाहतींच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय पिळवणुकीवरच साम्राज्यशाहीचा राक्षस पोसला जातो हें लक्षांत ठेवा. ब्रि. साम्राज्य हें जगांतील एक अग्रगण्य साम्राज्य गणलें जातें. अशा साम्राज्यशाहीशीं आपणां हिंदुस्थानच्या लोकांना टक्कर द्यावयाची आहे. स्वातंत्र्य म्हणजे कांहीं पोरखेळ नव्हे.

१९१९ पासूनच सामुदायिक लढ्याचा कालखंड सुरू झाला. राष्ट्रीय लढ्याची एक अवस्था आटोपली, दुसरी सुरू झाली. दडपशाहीविरुध्द लढून आपले लोकशाही हक्क मिळविण्यासाठीं हिंदी जनता सज्ज झाली. साम्राज्यशाहींतहि चांगुलपणा असतो, असें म्हणणार्‍या लोकांची आशा पार नाहींशी झाली. जालियनवाला बागेंतील शूर वीरांच्या रक्तांतून नवीन कांग्रेसचा जन्म झाला. हिंदी जनतेची प्रातिनिधिक संस्था ती बनूं लागली. जनतेच्या साम्राज्यविरोधी लढ्याचें तिनें धडाडीनें नेतृत्व घेतलें.

कांग्रेस ही एक आज एकच अशी हिंदुस्थानांत संस्था आहे कीं, जी ब्रि. साम्राज्यशाहीशीं टक्कर देण्यास उभी राहिलेली आहे. तिनें स्वातंत्र्याचें रणशिंग फुंकलें आहे. आपल्या स्वातंत्र्याच्या लढ्याला दिवसेंदिवस जोर चढावा, तो सुसंघटित व्हावा म्हणून साम्राज्यशाहीला बळी पडलेल्या जालियनवाला बागेंतील स्मृतीच्या निमित्तानें हा आठवडा सुरू करण्यांत आलेला आहे. तेव्हां कां. ची संघटना वाढविणें, तिचें बळ वाढविणें हेंच खरें त्या हुतात्म्यांचें पुण्यस्मरण आहे. कांग्रेसचें बळ वाढवावयाचें असेल तर अगोदर कां. चे सभासद झालें पाहिजे. मागच्या वर्षी ४० लाख सभासद झाले, यंदा ६० लाख सभासद झाले पाहिजेत. कामगारांनीं सुध्दां कां.च्या झेंड्याखालीं आलें पाहिजे. गरीब, श्रीमंत, १८ वर्षांचे वरील विद्यार्थी ह्यांचें कां. चे सभासद होणें हें पहिलें कर्तव्य आहे. तमाम सारे लोक कां. च्या झेंड्याखालीं उभे राहिले पाहिजेत. सारातहकुबी दिली नाहीं म्हणून आम्हीं कां. चे सभासद होणार नाहीं असें शेतकर्‍यांनीं म्हणतां कामा नये. कां. आज अधिकारपदावर दिसत असली तरी तिची सत्ता संकुचित आहे हें विसरतां कामा नये.

कां. कडून आपल्या मागण्या पूर्ण होत नसल्या तरी तिचे सभासद व्हा. तिची शक्ति वाढवा, बळ वाढवा. म्हणजे मग तुमच्या मागण्या आपोआपच पूर्ण केल्या जातील. ब्रि. साम्राज्यशाहीच्या विरुध्द आपण सारे एक झालें पाहिजे. कामगारांना लाल बावट्याचें राज्य पाहिजे असलें तरी त्याकरितां प्रथम तिरंगी झेंड्याखालीं आलें पाहिजे. कामगार व शेतकरी हीं दोन कां. चीं फुफ्फुसें आहेत. कां. मध्यें त्यांच्याशिवाय त्राण राहणार नाहीं. ती निर्जीव होईल. परंतु कां. जर निर्जीव झाली तर ह्या दोन्हीहि वर्गांची परिस्थिति सुधारण्याची आशाच धरावयास नको. त्याप्रमाणेंच व्यापारी, वकील, शिक्षक वगैरे सर्वांनीं कां. चे सभासद व्हावें. कां. ला मदत केल्याशिवाय कोणत्याहि वर्गाचा प्रश्न सुटणें शक्य नाहीं. लढाईची वेळ जवळ येत आहे. तयारी करा. उठा. खादी खरेदी करा. हिंदु-मुसलमान बंधूंनो एकत्र या. हिंदु-मुस्लीम ऐक्याची अशा गंभीर प्रसंगीं घोषणा करा. प्रभातफेर्‍या काढा. स्वयंसेवक दलें उभारा. गांवचें सारें वातावरण कांग्रेसमय करा. थोडे दिवसांपूर्वीं शिंदखेडें तालुक्यांतील कमखेडें या खेडेगांवांत खादीधारी लोकांचें संमेलन भरलें होतें. त्याचा परिणाम खेड्यांतील लहान मुलांवर इतका झाला कीं, एक ७ वर्षांचा मुलगा सभेंत उठून महणाला, 'आजपासून मी संपूर्ण खादी वापरीन अशी प्रतिज्ञा करतों.' दुसरा एक मुलगा उठला व घरीं जाऊन वडिलांजवळ मागणी केली कीं, मला खादीचा सदरा, टोपी व पॅण्ट करून द्या. वडिलांनीं त्या मुलाचें ऐकलें नाहीं. त्यानें उपवास सुरू केला. त्याचा विजय झाला. वडिलांनीं खादीचा पोषाख दिला. खानदेशांतील खेडीं कमखेड्याचा कित्ता गिरवतील अशी आशा आहे.
वर्ष २, अंक १.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel