कांग्रेसचें स्वयंसेवकदल खेड्यापाड्यांतून उभारलें पाहिजे. खेड्यांतील लोकांचीं सुखदु:खें दूर करण्यासाठीं आधीं उठलें पाहिजे. म्हणजे शेतकरी तुमच्या झेंड्याखालीं येतील. आनंदानें गाणीं म्हणूं लागतील.

जे प्रचारक नेमावयाचे ते सेवक हवेत. ते गांवें स्वच्छ करतील. रात्रीं ड्रिल शिकवतील. लोकांना कांग्रेसचा व जगाचा इतिहास शिकवतील. असे प्रचारक हवेत. परन्तु या प्रचारकांना पगार कोण देणार ?

आपणच यासाठीं सर्वस्व दान करावयास उठलें पाहिजे. कांग्रेसला वाढवूं इच्छिणारांनीं दर महिना आपल्या उत्पन्नाचा दशांश कांग्रेस कामाला दिला पाहिजे. ज्याचें महिन्याला पांचशें रुपये उत्पन्न असेल त्यानें ५० रुपये दिले पाहिजेत. ज्याचें महिन्याला पांच रुपये उत्पन्न असेल त्यानें आठ आणे दिले पाहिजेत. स्वराज्य म्हणजे थट्टा नाहीं. स्वराज्य म्हणजे अपरंपार त्याग. कांग्रेसच्या लोकांनीं आधीं असें उदाहरण घालून दिलें पाहिजे. अशा पैशांतून ही संघटना उभी करावयाला हवी.

कांग्रेसचें प्रचंड स्वयंसेवकदल उभारून त्याच्या मिरवणुका काढल्या पाहिजेत. त्या मिरवणुकींचा जनतेवर इष्ट तो परिणाम होतो. कांग्रेस खरा राजा आहे, कांग्रेस आतां सरकार शोभतें असें लोकांना वाटूं लागतें. खेड्यांतील कांग्रेस पाहून जनतेवर हीच छाप पडते. हरिपुराचे ७।८ हजार स्वयंसेवक पाहून शेतकरी म्हणत 'हाऊ राजा शे.' फैजपूरला सारी व्यवस्था स्वयंसेवक ठेवीत होते व पोलीस बाहेर रस्त्यावर असत. याचा फारच नैतिक परिणाम जनतेवर झाला. लोक आपल्या गांवीं गेल्यावर पोलीसांस म्हणत, 'तेथें तुम्ही तर रस्त्यांत धूळ खात होतेत; कारभार तर कांग्रेसचे स्वयंसेवक व स्वयंसेविका पहात होत्या.' या सर्व गोष्टींनीं वातावरण तयार होतें. आणि वातावरण तयार करावयास कितीहि किंमत पडली तरी ती कमीच असते.

संयुक्त प्रांताच्या प्रमाणांत महाराष्ट्रांत एक लाख तर खानदेशांत दहा हजार स्वयंसेवक हवेत. परंतु या वर्षी निम्मेंच काम करूं या. पाच हजारांचा तरी संकल्प करूं या. १९३९ च्या जानेवारी २६ च्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीं जळगांव शहरीं खानदेशांतील पांच हजार स्वयंसेवकांची परेड झाली पाहिजे. किंवा त्या त्या तालुक्याचे ठिकाणीं पांचशें स्वयंसेवकांची कवाईत झाली पाहिजे. एव्हांपासून या कामाला लागा.

महाराष्ट्रानें इतर प्रांतांच्या पाठीमागें राहतां कामा नये. सर्वांच्या पुढें नाहीं तर निदान सर्वांच्या बरोबरीनें तरी राहिलें पाहिजे. यासाठीं वाटेल तो त्याग करा. कोणत्याहि बाबतींत काँग्रेसची मान खालीं राहतां कामा नये. खानदेशाला कोणी विचारिलें 'तुमच्याकडे स्वयंसेवक आहेत कीं नाहींत ?' 'पांच हजार आहेत.' असें पटकन् उत्तर देतां आलें पाहिजे. परंतु असें कितीकांना वाटतें ? कितीकांना अशी हौस आहे ? किती या कामासाठीं सर्वस्व देतील ?
४ जुलै, १९३८.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel