प्रश्न :- अशा मार्गांनीं हरिजनांचा उध्दार होईल का ?
उत्तर :- हरिजनांच्या उध्दाराची काळजी नका करूं. हरिजनांना पशूप्रमाणें ठेवून तुम्हांला देवाघरीं मोक्ष मिळणार आहे का ? परवां श्री गाडगे महाराजांनीं अमळनेरला सांगितलें, 'माणसाला शिंवू नका करतांच देव तेथून पळतो' हरिजनाच्या ऐहिक उध्दाराविषयीं म्हणत असाल तर ते नीट सर्वांत मिसळूं लागले, हिंडूं फिरूं लागले, म्हणजे त्यांना निरनिराळे धंदे करतां येतील. तुम्हीहि त्यांना चांगलीं कामें सांगाल. त्यांची आर्थिक स्थिति सुधारेल.

प्रश्न :- ते मृत मांस खातात.
उत्तर :- ज्याला कांहीं खायला मिळत नाहीं तो दगडहि खाईल. दुष्काळांत विश्वामित्र ऋषीनें कुत्र्याचें तंगडें चघळलें. हरिजनांना सन्मान्य धंदा नाहीं. धान्य घ्यावयास, ताजें मांस घ्यावयास पैसा नाहीं. ते निराधार होऊन मृतमांस खातात. अरे हें दारिद्रय आहे; हें अनंत दु:ख आहे. बकर्‍याची चरचर मान कापून वाघाप्रमाणें खाण्यापेक्षां मेलेलें खाणें यांत कमी राक्षसपणा आहे. परन्तु तें जाऊं दे. गरिबीमुळें हें करावें लागते. मांस तर तुम्ही सारेच बहुतेक खातां. आणि मुसलमान, ख्रिश्चन, मराठे वगैरे सारेच तुम्ही मांसखाऊ एकत्र बसतां उठतां. हरिजन मृतमांस खातो. तें दारिद्रयामुळें. परन्तु वर्‍हाडांत व खानदेशांत शेंकडों हरिजन वारकरी मांस कोणतेंच न खाणारे आहेत. त्यांना तरी तुम्ही कोठें घेतां जवळ ? वकीली डावपेंच काय लढवतां ? ही गंमत नाहीं. हा हृदयाचा, माणुसकीचा, खर्‍या सध्दर्माचा प्रश्न आहे. मी जातों आतां. बंधुभाव दाखवा, व भारताचें तोंड उजळ करा. हीच पुन्हां पुन्हां प्रार्थना.
२९ ऑगस्ट, १९३८.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel