श्रीपति तुझीया योगें श्रीहरिला नाम ।
ब्रह्मादिकही ध्याती पुरविसी तत्काम ॥
निष्कामें जे भजती पावति निजधामा ।
योगी ध्याने पावति पद आत्माराम ॥ १ ॥
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।
वससी करवीरीं तूं विश्वाच्या लक्ष्मीं ॥ जय. ॥ धृ. ॥
जपतसिद्धी तुजविण कांही साधेंना ।
प्रसन्न होतां भक्तां भवभय बाधेना ॥
तुजवांचुनियां अंबे शांती लाभेना ।
वेदांतींचें सारहि शिष्या बोधेना ॥ जय. ॥ २ ॥
गर्जति निगमागम परि वाणीला गौप्य ।
जें जें वर्णिति तें तें माये तव रूप ॥
कोण करीं मग तुझ्या सगुणत्वा माप ।
स्वनितां सहस्त्रवदनीं श्रमला कीं साप ॥ जय. ॥ ३ ॥
दंभे दर्पे मानेक्रोधें जे रहित ।
भजति तव चरणां त्वां साधे आत्महित ॥
उद्धरती ते प्राणी परिवारासहित ।
देवी त्याला करिसी श्रीपतिसन्निहित ॥ जय. ॥ ४ ॥
बाधा भवभीतीची तव दासां नाही ।
माये न करिसि मोहाचंचळ तें कांही ॥
ह्रदयी अखंड माझ्या तूं सदये राहीं ।
गोविंदात्मज विप्रा स्वपदासी पाहीं ॥ जय. ॥ ५ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel