rita.joharapurkar@gmail.com
युरोपायन: भाग १ - आदमी मुसाफिर है
युरोप प्रवासाच्या निमीत्ताने बऱ्याच जणांशी संपर्क आला. त्यामुळे संवाद साधला गेला आणि अनेकांशी मैत्रीची नाळ जोडल्या गेली. माणूस हा प्रेमाचा, सहवासाचा भुकेला असतो. ह्या संपूर्ण प्रवासादरम्यान सर्वांनी ऐकमेकांना दिलेल प्रेम, साहचर्य हवहवसं वाटणारं होतच, शिवाय अनेक अंगांनी शिकवणांर देखील होतं हे मनापासून सांगावस वाटतं. नंदाताईकडून शांतपणे व ठामपणे आपला मुद्दा कसा पटवून द्यावा, तर मीलनकडून कुणालाही न दुखावता कसे हँडल करावे हे शिकले. तर न कंटाळता वायफायसाठी मदत करणाऱ्या विद्याली व पायलमुळे मी घरच्यांशी बोलू शकले व मुलगी नसल्याची उणीव भासली नाही. अशाच थायलंड टूरमधे भेटलेल्या मंजीरी, जाज्वल्या, अपर्णा यांची आठवण झाली. मंजीरी तर रोज सकाळी नित्य तीचा काव्याचा झरा घेऊन भेटते. तसेच नावाप्रमाणेच शिलवंत लेखिका, प्रत्येकाची टर उडवून निखळ हास्याची कारंजी उडवणाऱ्या दिपाली व अश्विनी ह्या बहिणी, मैत्रीण, बहीण, नणंद, वहिनी अशा अनेक नात्यांचा संगम होऊन आलेल्या देसाईताई, तीन पिढ्यांचा एकत्र कुटुंबाचा आदर्श असणारी तांडेल फँमीली तर वयाच्या पंच्चाहत्तरीतही पीकल्या पानाचा देठ ही कसा हिरवागार ठेवता येतो हे प्रतीभा आजीकडे बघून कळले.
प्रथम मला वाटलं होत की युरोप टूर म्हणजे सगळ्या हाय फाय संस्कृतीवाल्या असतील. आपले कसे होणार? पण सुरवातीला सगळ्या आनंदी आणि कुठलीच समस्या नसणाऱ्या वाटत असल्या तरी प्रत्येकीच्या आयुष्याला एक दुखा:ची किनार होती. हे त्या जसजशा स्वतःला उलगडत गेल्या तेव्हा समजलं.
कुणाचे जोडीदार अचानक अर्ध्यावरच डाव सोडून गेले होते, तर कुणी सिंगल, तर काहीजणी अगदी शून्यातून उभ्या राहिल्या होत्या. अशा सर्व सामान्यच तरी आपापल्या क्षेत्रात स्वकर्तुत्वाने असामान्यच होत्या. जीवनाचा बोध होण्यास या छोट्या छोट्या गोष्टी कारणीभूत ठरतात. तरीही त्या हरवलेल्या स्वरांसाठी मनात एक हळवा कोपरा ठेवून काही दिवसांसाठी ते सगळं विसरून नवे गीत गाण्यासाठी आल्या होत्या. खरचं एकदम कुणाबद्दल लगेच मत ठरवू नये याचा धडा मी शिकले. अशा कितीतरी आठवणींचा एक कप्पा मी मनात जपून ठेवलाय. त्यामुळे हव्या तेव्हा मारता येतात दूर गेलेल्यांशी गप्पा.
शेवटी काय. आदमी मुसाफिंर है, आता है जाता है, आते जाते रस्ते में यादे छोड जाता है।
दिल भूल जाता है जब किसीको, वो भूलकर भी याद आता है. तूर्त अलविदा!
युरोपायन: भाग २- शेतकरी आम्ही आणि ते
युरोप बघताना रस्त्यात चित्रात रेखाटल्याप्रमाणे अनेक आखीव रेखीव शेती बघण्यात आल्या. शेतीची आवड असल्याने मिळेल तेवढी तीथल्या शेतीची व शेतकऱ्यांची माहिती घेतली तेव्हा अनेक गोष्टी कळल्या. प्रथम तेथील सरकार जमीन किती व कशी आहे याची पाहणी करते. मग त्यानुसार त्या जमीनीला अनुकूल असे बियाणे देते. त्याच बरोबर पेरणीपासून तर पीक येईपर्यंत शेतकऱ्यांना शेतातच राहणे बंधनकारक आहे. त्यामुळे प्रत्येक शेतात टुमदार घरे आहेत. याचा फायदा असा होतो की चोवीस तास फक्त शेतीकडेच लक्ष दिल्यामुळे व यांत्रिकीकरणामुळे शेतीचा व पीकाचा दर्जा उत्तम राहतो. चोर चिलटे, जंगली श्वापदापासून पीकाचे सरंक्षण होते. पीक तयार झाले की सरकारची माणसे त्याची पाहणी करतात व त्याच्या दर्जानुसार त्यांना भाव देतात. इतका सरळ साधा पारदर्शक मामला! थोडक्यात एखाद्या उद्योगपतीएवढाच मान शेतकऱ्यांना असतो!
पशूपालनातही त्यांची शिस्त, स्वच्छता वाखाणण्याजोगी आहे. प्रत्येक शेतकऱ्याला एक नंबर दिला जातो, तो त्याने जनावरांच्या गळ्यात अथवा कानाच्या पाळीजवळ लावायचा असतो. त्यांना ठरवून दिलेल्या परिसरातच जनावरे चरतात. याव्यतिरिक्त जर जनावरे रस्त्यावर आली वा मोकाट सुटलेली दिसली तर सरकार त्या जनावरांचा नंबर बघून त्या शेतकऱ्यांना जबरदस्त दंड ठोठावते. त्यामुळे कुठेही रस्त्यावर मोकाट जनावरे वा त्यांचे मलमूत्र पडलेले दिसत नाही.
या उलट आम्ही! आरामात उठणार, चूळ भरणार, चहा होईपर्यंत शेजारी गावगप्पा, मग नाष्टापाणी, बीडीतंबाखू करून आरामात दहावाजेपर्यंत शेतात जाणार (अपवाद वगळून) मग
पाच वाजले की घरी परतणार. त्यात पारंपारिक पद्धतीमुळे व अज्ञानामुळे यांत्रिकीकरणाचा अभाव आणि आणले तरी अनेक छोट्या छोट्या तुकड्यात विखुरलेली शेती, सहकाऱ्याचा अभाव, धुऱ्यांचे, भाऊबंदकीचे वाद! यामुळे न परवडणारा खर्च, वेळ वाया जाणे! शेतात वास्तव्य नसल्याने शेतीसाठी वेळ कमी, तसेच चोर चिलटे व जनावरांमुळ मालाचे होणारे नुकसान. हे लिहित असतांनाच गावाकडून माणसाचा फोन आला की शेतातील वायर, पाईप चोरीला गेला. मागील वर्षी विहिरीतील मोटर चोरी गेली. तसेच आधुनिक तंत्रज्ञान व प्रशिक्षण यांच्या अभावामुळे मालाचा निकृष्ट दर्जा! तरीही सर्व मदत सरकारनेच करावी ही अपेक्षा!!
पाळीव प्राण्यांच्या बाबतीतही निष्काळजीपणा तर विचारता सोय नाही. 'सब भूमी गोपालकी' या उक्तीप्रमाणे चोफेर मोकाट सोडलेली अस्वच्छ जनावरे. अर्थात काही थोडेसे अपवाद असतात. काही प्रमाणात पश्चिम महाराष्ट्र व केरळकडे सुधारित शेती व शेतातच राहणारे शेतकरी दिसतात. पण स्वतःला दुष्काळी म्हणवणाऱ्या विदर्भात अजून ही मानसिकता रुजली नाही. पण मला खात्री नाही तर विश्वास आहे की आपला शेतकरी गावातील त्या अस्वच्छ, दहा बाय दहाच्या कोंदट, अंधाऱ्या खोलीत न राहता शेतीतच राहिला तर नक्कीच त्याच्या उत्पनात व आरोग्यातही फरक पडेल. अस्मानी संकटे तर सगळीकडेच आहेच पण इस्रायलने त्यावर मात केलीच की! गरज आहे फक्त निर्धाराची! शेवटी आपल्याच घरातील एखादी व्यक्ती चुकत असेल तर तो कुठे चुकत आहे हे दाखवून त्याला योग्य मार्ग दाखवणे व 'बुडती हे जन न देखे डोळा'
हाच लिहिण्याचा हेतू! कुणी गैरसमज करू नये! ओम् शांती.
युरोपायन: भाग ३ - तारीफ करु क्या उसकी?
युरोपमधील लक्झरी बसमधून प्रवास करत असतांना बसचा प्रवास इतका आनंददायी व आरामशीर असू शकतो याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. असे वाटायचे कारण ही तसेच होते कारण दर महिण्याला मी आपल्याकडील लक्झरीने प्रवास करते तेव्हा दुसऱ्या दिवशी हाडे पार खिळखिळी झाली असतात.
पण लंडन ते इटलीपर्यंत ह्या संपूर्ण प्रवासात शंभरच्या स्पीडने बस धावत असतांनाही विमानात बसल्या सारखे वाटत होते. कुठे हेलकावे नाही की उसळणे नाही. अंगी फोटोग्राफिचे कौशल्य नसूनही धावत्या बसमधूनही काढलेले फोटो इतके सुंदर आले ते त्या बसच्या रचनेमुळेच. पारदर्शक स्वच्छ काचेच्या खिडक्या त्यामुळे बाहेरचे संपूर्ण दृश्य दिसते.
आपल्याकडे जेवढे मागे बसू तेवढा त्रास जास्त. पण इथे उलटेच! एकतर कुठेही बसा सारखाच फिल येतो. मागे तर जास्त मजा येते. कारण मागील सीट थोडी उंच असते. त्यामुळे समोरचे व डाव्या, उजव्या अशा दोन्ही बाजूचे निसर्ग सौंदर्य मनसोक्त न्याहाळता येते. निर्जीव वस्तूपण तुमच्याशी बोलत असतात. आपल्यालाच त्यांना वाचता आलं पाहिजे!
म्हणूनच जेव्हा शेवटचे तीने इटलीच्या विमानतळा जवळ सोडले तेव्हा मी गेटच्या आत जाईपर्यंत 'कन्या सासूरासी जाये, मागे परतोनी पाहे' ह्या भावनेने तीच्याकडे पाहता पाहता मनात म्हणत होते: ' तारीफ करु क्या उसकी, जीसने तुम्हे बनाया ' अलविदा.
युरोपायन: भाग ४ - देशाभिमानी क्लारा
लंडनच्या प्रसिद्ध स्थळांची माहिती'अवघे पाऊण शे'वयोमान असणाऱ्या व सदाबहार दिसणारी क्लारा (तेथील गाईड) समरसून देत होती. अवघे पाऊणशे वयमान म्हणन्याचे कारण म्हणजे वयाची साधी पन्नाशी ओलांडली की आमचे नेत्र पैलतीर बघायला लागतात (अपवाद वगळता), आता आपल काय राहिले, लोक काय म्हणतील इत्यादी अनेक गोष्टींचा बाऊ करुन आपणच आपल्याला झाकोळून टाकतो. आज जगातील बलाढ्य देशांच्या तुलनेत भारतात सर्वात जास्त तरुण आहेत. पण आपल्यात सामर्थ्य, उत्साह, नाविन्य, धाडस, कल्पकता हे गुण फारसे दिसत नाही. अजूनही आपण रुढीवादी, आत्ममग्न असेच आहोत.
संसाराच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या, मुल बाळं मार्गी लागलीत असे म्हणून आपण निवृत्ती घेतो. पण इथे फक्त क्लाराच नाही तर तिच्या सारख्या साठी उलटलेल्या, चैतन्याने रसरसलेल्या अनेक ललना गाईड म्हणून वावरताना दिसल्या. खरंच आहे, मनात तीव्र इच्छा शक्ती असेल आणि त्याला अथक, मनापासून प्रयत्नांची जोड मीळाली तर एखादे अवघड वाटणारे कामही आनंदाने करता येते. याचे सुंदर उदाहरण म्हणजे क्लारा!
चॉकलेट फँक्टरी असो, सायन्स म्युझियम, ब्रिटिश लायब्ररी असो किंवा राजप्रासाद वा राष्ट्रीय स्मारक असो सगळ्यांची माहिती जणू पहिल्यांदाच सांगत आहे असे वाटावे इतक्या उत्साहाने सांगत होती आणि हे सांगतांना त्या सगळ्यांन बद्दल असलेला तिचा जाज्वल्य देशाभिमान सतत जागृत होता.
त्यासरशी मला आठवली ती आपली उथळ व बेगडी देशभक्ती. स्वातंत्र्य दिनी आणि प्रजासत्ताक दिनी कार्यक्रम झाल्यावर पायदळी पडणारे असंख्य तिरंगी झेंडे. राष्ट्रगीताच्या वेळी उभे राहायचे की नाही याचा वाद, अनेक ऐतिहासिक वास्तूंचा केलेला आणि करत असलेला विध्वंस! कानाने जरी ती सांगत असलेली माहिती ऐकत व डोळ्याने तिचे निरीक्षण करत असले तरी डोक्यात अनेक विचारांचा कल्लोळ माजला होता. ती ज्या अभिमानाने लंडनचे वैभव दाखवीत होती. (त्यात कोहिनूर व बाकी भारतातून आणलेल्या गोष्टींचा उल्लेख नव्हता) ते पाहून का कुणास ठाऊक सारखे मनात येत होतं, " ज्या वैभवाचा समृद्धीचा तुम्हाला अभिमान आहे गर्व आहे, ते खरं तर आमच होतं. आमच्या जीवावर तुम्ही येवढी समृद्धी उपभभोगताय!" माझाही स्वाभिमान उफाळून आलाच व मी बोलून गेलेच!!"
Where is the kohinoor Diamond? Where are the king shivaji's Throne and his sword? And where are all things of my India?
आणि ते ऐकून एकच क्षण का होईना ती हडबडली. लगेच सावरुन आठवल्यासारखे करून कोहिनूर कुठे आहे ते सांगितले व शिताफीने तेथून निसटली. बाकी काही असो. आपल्या वयाचा बाऊ न करता एखाद्या खळाळत्या झऱ्यासारखी भासली मला क्लारा. तिच्याकडे बघून वाटले आयुष्य समरसून जगता आले पाहिजे. ती कला आत्मसात झाली की अनेक दु:खद प्रसंगाच्या आठवणी अंगावर येत नाही. पानगळीतही मनात सुखद क्षणांना लगडलेला वसंत उधाणत असतो. रीतरंजन.
युरोपायन: भाग ५- केल्याने होत आहे रे
काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया, टि. व्ही. चँनेलवर शेतकरी संपाच्या नांवाखाली दूध, भाजीपाला यांची जी नासाडी चाललीय ते बघून मन विषन्न झाले आणि एकदम आठवलं आमच्या टूर मॅनेजरने स्विझरलँडची संस्कृती, तेथील लोकांची मानसिकता सांगत असतांना जेव्हा तेथे दुधाचे उत्पादन जास्त झाले तेव्हा तेथील सुबुद्ध नागरिकांनी त्यावर समजूतदारपणे स्वतःच्या हुषारीने कसा मार्ग काढला ते पण सांगितले.
अर्थशास्त्राच्या नियमाप्रमाणे मागणी जास्त उत्पादन कमी व उत्पादन जास्त मागणी कमी. अशी परिस्थिती दुधाच्या बाबतीत जेव्हा निर्माण झाली तेव्हा, दूध हे तर नाशवंत पदार्थ त्याचा साठाही करता येत नाही, उत्पादन जास्त झाल्यामुळे भाव पण नाही, जनावरांचा खर्च पण नीघणे मुश्कील, म्हणून त्यांनी रस्त्यावर दूध ओतून समाजाला, देशाला वेठीस धरले नाही. पऱ्यावरण व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणले नाही. तर स्वत:ची बुद्धी वापरून त्यापासून वेगवेगळ्या स्वादाचे चीज, चाँकलेट घरोघरी बनविणे सुरु केले. क्वांटिटी, क्वालिटी आणि आकर्षक पँकींगमुळे आज त्यांचे हे पदार्थ हजारो रुपये खर्चून सगळं जग खरेदी करतय!
प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींची उत्तम सजावट उत्तम सादरीकरण करून त्याची जाहिरात कशी करावी ह्याच अजून एक उदाहरण म्हणजे त्यांची जगप्रसिद्ध 'काऊ बेल'. आपण रोज देवासमोर वाजवतो तशी छोटी घंटी आकर्षक सजावट करून हजार बाराशे रुपयाला विकतात आणि पर्यटक ती भेट देण्यासाठी म्हणून पाच दहा पीस घेतात.
पुढे जाऊन हे पण कळले की त्यांच्या गाईच्या दुधापेक्षा आपल्या गाईचे दुध व वेळू हे अधिक उत्तम दर्जाचे असतात. त्यासाठी आपला वेळू व त्यांच्या गाईपासून एक वेगळीच संकरीत जात निर्माण करण्यासाठी ते आपल्या केंद्र सरकारशी चर्चा करणार आहेत.
आणि आम्ही काय करतोय? जीला 'गोमाता' म्हणतो, जिच्या जगण्यामारण्याच्या वादातून माणसांच्याच जीवावर उठतो आज तीचेच दुभते हजारो लाखो मुले कुपोषित, उपाशीपोटी असताना रस्त्यावर ओतून सर्व जगासमोर ओंगळवाणे प्रदर्शन करतोय. ह्याचे परिणाम भंयकर आहेत. आपला भविष्यकाळ, आरोग्य, समृद्धी, स्वातंत्र्य सारं काही धोक्यात येत आहे.
आपण जर खोलात जाऊन विचार केला तर हे लक्षात येईल की ह्या राडा संस्कृतीमुळे व समाजव्यवस्थेमुळे जो धोका निर्माण होत आहे ती संस्कृती व व्यवस्था किती कचकड्याची व कमकुवत आहे.
कुठलेही संप, आंदोलने करतांना त्या प्रश्नांचा गांभीऱ्याने विचार केला व त्यावर सकारात्मक उत्तरे शोधली तर त्या आंदोलनाला काही उचित व चांगला अर्थ लाभेल. अन्यथा संपाच्या नावाखाली साजऱ्या होणाऱ्या राडा संस्कृतीमुळे, बेशिस्त झुंडशाहीमुळे पऱ्यावरणाची समाजाची व सर्वार्थाने देशाची जी हानी होतेय, तो मार्ग फरत आपल्याला पारतंत्र्याकडे घेऊन जात आहे हे निश्चित समजा आणि बलवंतांच्या बलदंड मेळाव्यात कोणत्याही दुर्बल, असहाय माणसांची, देशांची खरेदी विक्री करणाऱ्या धनवंतांच्या, राजकारणाच्या मंडईत आपल्या सारखे सामान्यच भरडले जातात हे इतिहासपण सांगतो.
सब चाहते है मंजील पाना, लेकीन चले बिगर। जन्नत भी सबको चाहिए, लेकीन मरे बिगर।
ही धारणा आम्हाला बदलावीच लागेल. ओम् शांती.
युरोपायन: भाग ६- कॅबरे शो ऑफ पॅरिस.
पॅरिस मधे आपल्याला काय काय बघायचे आहे त्याची माहिती आमचा टूर मॅनेजर आम्हाला देत होता. शेवटी म्हणाला इथला 'PARA DlS LATIN' म्हणून एक कॅबरे शो प्रसिद्ध आहे. कॅबरे नाव ऐकल्याबरोबर हे काय भलतच काहीतरी म्हणून अनपेक्षितपणे आम्ही संकोचून एकमेकींकडे पाहू लागलो.
आमच्या मनातील भाव ओळखून तो पुढे म्हणाला हा तुमचा ऐच्छिक प्रश्न आहे. पण मी ऐवढेच म्हणेन कुठलाही पूर्वग्रह मनात ठेवून नेहमीच त्याच नजरेने एखाद्या गोष्टीकडे बघू नये. तर एक कला म्हणून बघा असे म्हणून त्याने निर्णय आमच्या वर सोपवला आणि म्हणाला ज्यांना कुणाला जायचे असेल त्यांनी आठ वाजता खाली कँराडोर मधे जमावे. रात्रीचं रात्री बघू म्हणून आम्ही पण दुसऱ्या विषयाकडे वळलो.
जसे रात्रीचे आठ वाजले तसे बघूया तर खरं काय असतं असा विचार करुन आम्ही खाली आलो. बघतो तर काय सतरा वर्षापासून ते पंच्याहत्तर वयाच्या आजीपर्यंत सगळ्याच्या सगळ्या त्रेचाळीस जणी तयार होऊन आल्या होत्या. ते पाहून आमचचं आम्हाला खूप हसू आले. त्याच मुडमधे कधी हॉटेल आले कळलेच नाही. काहीशा संकोचानेच आम्ही आत गेलो. एखाद्या बॉलीवूडमधे असतो तसा देखणा हॉल. सुंदर झुंबरांची सजावट, टेबलांची आकर्षक मांडणी, त्यावर कोल्ड्रिंक्स पासून वाईन पर्यंत ज्याला जे हवे ते सर्व्ह केल्या जात होत जोडीला म्युझिक असा सर्व थाट होता.
थोड्याच वेळात लाईट ऑफ झाले व शो ला सुरुवात झाली. एकाहून एक सुंदर अप्सरा आपली कला सादर करीत होत्या आणि आपल्या इकडच्या कॅबरेतला आणि तिथल्या कॅबरेतला फरक आम्हाला जाणवत होता. संपूर्ण विवस्त्र असूनही कुठेही त्या वल्गर (Vulger) वाटत नव्हत्या ना त्यांचे नृत्य अश्लील वाटले ना त्यांचे हावभाव! त्यांना पाहून कुणीही शीट्या वाजवीत नव्हते ना अश्लील शेरेबाजी करीत होतं. 'न्यूड'नंतर दुसऱ्यांदा मी इतक्या मोकळेपणाने कुठेच खाली मान न घालता व एक दुसऱ्यापासून नजर न चोरता स्वच्छ पणे हा शो पाहत होते.
" आपणच घालतो आपल्या भोवती, अनेक बंधनाचे कुंपण, कधी करावी सैल बेडी, अनुभवावे स्वप्नांचे स्पंदन!"
असे मनाला बजावत रात्रीचे रंगीन पॅरिस पाहण्यासाठी हाँलमधून बाहेर पडलो. मुळातच सुंदर असलेले पॅरिस रात्री सप्तरंगात नाहून निघाले होते. आयफेल टॉवर तर लाईटिंगमुळे अधिकच सुंदर दिसत होता. शंभर वर्ष जुनी रस्त्यातील स्ट्रीट लाईटस ज्या पद्धतीने अजूनही जतन केले आहेत ते ही रस्त्याच्या सौंदऱ्यात भर घालीत होते. त्यावरून अनेक जोडपी हातात हात घालून मुक्तपणे विहरत होती. प्रत्येक जण आपापल्या विश्वात मग्न होते.
हे सगळं बघतांना मला आपल्या व त्यांच्या मानसीकतेतला एक मोठा फरक जाणवला. तो म्हणजे तिथे सगळ्या गोष्टीत मोकळेपणा असूनही आपल्याकडे दिसतात तसे पावलागणिक आंबटशोकी टवाळखोर नव्हते. एकट्या तरुण मुलीही मुक्तपणे फिरत होत्या. पुरुषांच जाऊ दे, मुळातच तो एक चंचल भ्रमर असतो. पण मी एक 'स्त्री' असूनही अधून मधून त्यांच्याकडे एक चोरटा कटाक्ष टाकून त्यांचे निरीक्षण करत होते. याचं कारण जन्मापासूनच आपल्या समाजात, आपल्या मनात काही धारणा खोलवर रुजल्या असतात. म्हणूनच तर अगदी वर्ष दोन वर्षाच्या अबोध, लहान निरागस मुलं जेव्हा संपूर्ण दिंगबर अवस्थेत असतात आणि अशावेळेस जर घरी कुणी आले तर आपण चटकन त्याला/तीला म्हणतो चल लवकर कपडे घाल, नाहीतर शेम शेम म्हणतील, असं म्हणून लहानपणीच एखाद्या अवयवाबद्धल त्याच्या मनात बागुलबुवा उभा करतो आणि काही कारणाने त्या धारणांना धक्का बसला की समाजात, घरादारात, आपल्यात अवस्थता पसरते. खरंच कितीतरी गोष्टींचे अनावश्यक ओझे तनामनावर घेऊन आपण जन्मभर वावरत असतो हे अनेक प्रसंगात दिसतं.
ज्या वेळेस दुसऱ्या विमानासाठी दोन तीन तासासाठी दुबई एअरपोर्ट्वर आमचा मुक्काम होता. त्यावेळेस मी पाहिले की दोघीतीघी आया आपल्या लहान मुलांना कुठल्याही संकोचाविना स्तनपान करीत होत्या. ना त्यांच्याकडे कुणी बघत होते ना त्या मायलेकरा़ना याचा गंध होता. ते दृश्य पाहून मला ह्या नैसर्गिक गोष्टीसाठी ही आपल्याकडे अनेक आयांची होणारी कुंचबणा आठवली. एकत्र कुटुंब असो वा सार्वजनिक ठिकाणं वा समारंभ कार्यक्रमाच्या ठिकाणी बाळ भुकेने कितीही रडत असो, योग्य आडोसा मिळाल्याशिवाय ती मोकळेपणाने स्तनपान देखील करु शकत नाही. कायम कुणी येईल का, कुणी पाहिल का नाना धास्तीनेच उरकावे लागतं!!
अर्थात त्यांच्या आणि आपल्या संस्कृतीत, परिस्थितीत जमीन आसमानचा फरक आहे. तिकडच्या वातावरणामुळे त्यांच्या शरीराला महिनोन्महिने सूर्यप्रकाश व मोकळा वारा मिळत नाही. त्यामुळे त्यांची त्वचा फार सेंन्सेटीव्ह झालेली असते. अशावेळेस जेव्हा सूर्य उगवतो ते दिवस त्यांच्यासाठी एखाद्या उत्सवासारखे असतात. म्हणून त्याचा उपभोग घेण्यासाठी ते सारेजण ह्या काळात बाहेर पडतात. त्यामुळे कपडेही कमीतकमी असतात की ज्यामुळे शरीराला जास्तीत जास्त सुर्यप्रकाश व ताजी हवा मीळेल. त्यामुळे त्याचं ते कल्चर आहे म्हणून ते वावगं वाटत नाही. त्यात एक सहजपणा वाटतो.
या उलट आपल्याकडे वेगवेगळ्या राज्यातले वेगवेगळे वातावरण, अठरा पगड जाती, त्यानुसार प्रत्येकाची संस्कृती, भाषा, वेष साऱ्यातच वेगळेपण! धारणाही अलग अलग. म्हणूनच आपण जेव्हा अनाठायी त्याचं अनुकरण करायला जातो तेव्हा ते नैसर्गिक न वाटता स्वतःच्या देहाच प्रदर्शन केल्यासारखे वाटते. त्यातच तळागाळातील प्रत्येक समाजाची लोकांची मानसिकता वेगवेगळी. तीला आपण सध्यातरी बदलवू शकत नाही. त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्य, कसे, कोणते, कुठे आणि कशासाठी याचा विचार होणे गरजेचे आहे. तरच आपण खऱ्या अर्थाने एक व्यक्ती म्हणून मोकळेपणाने जगू शकू!
म्हणोत कोणी या जगण्याला नश्वर वा खोटे, सूर भावला ज्याला, त्याला परमेश्वर भेटे.
असोत कितीही खेद खंती वा शल्याचे पूर, त्या सर्वांचे सार्थक, एकच निखळ मुक्त सूर
आसवात तु सूर भिजवूनी, स्वरात ओल्या गा, गाणे गा रे! रीतरंजन.