sonar.nimish@gmail.com
8805042502
(लेखक ISO क्वालिटी ऑडीट आणि कम्प्लायंस क्षेत्रांत कार्यरत असून ते सध्या आरंभ मासिकाचे संपादक आहेत)
पुस्तक परीक्षण: प्रवाह माझा सोबती
पुस्तक विषय: बसद्वारे नर्मदा परिक्रमा
लेखक: वेंकटेश बोर्गीकर
परीक्षक: निमिष सोनार, पुणे
सप्तशृंगी पब्लिकेशनचे वेंकटेश बोर्गीकर यांनी लिहिलेले "प्रवाह माझा सोबती" हे पुस्तक मी नुकतेच वाचले. त्यांनी जानेवारी 2014 मध्ये बसने केलेल्या नर्मदा परिक्रमेवर आधारित हे पुस्तक आहे. पुस्तकाच्या सुरुवातीला "हिमसेतू टूर्स" च्या श्रीराम दीक्षित यांच्याशी लेखकाची झालेली भेट, जास्तीत जास्त लोकांनी नर्मदा परिक्रमा करावी ही डोंबिवलीच्या श्रीराम दिक्षितांची तळमळ तसेच नर्मदा नदीचा उगम, तिचे लग्न याबद्दल विविध पौराणिक कथा, तसेच परिक्रमेचे नियम आणि नदीची भौगोलिक माहिती हे सगळे वाचायला मिळतो. हा भाग वाचायला खूप रंजक, माहितीपूर्ण आणि उत्कंठावर्धक झालेला आहे.
लेखकाची लिहिण्याची शैली अशी आहे की वाचकाला सुरुवातीपासूनच मूळ मुद्द्यावर आणून लगेच वाचनात गुंतवून टाकते. तसेच प्रत्येक स्थळाची ऐतिहासिक आणि पौराणिक पार्श्वभूमी अगदी ठळकपणे आणि रंजकपणे लेखक आपल्याला सांगतात. त्यामुळे एक विशिष्ट वातावरण निर्मिती होते. प्रवासवर्णन किंवा स्थलवर्णन वाचतांना त्यामागची कथा न जाणून घेतल्यास ते अपूर्ण राहाते. भूगोल आणि इतिहास या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे माझे मत आहे.
संपूर्ण पुस्तक वाचतांना जाणवत राहतं की लेखकाने एकूणच पुस्तक लिहिण्यापूर्वी खूप सखोल अभ्यास केलेला आहे. लेखक माहिती देतात की नर्मदा नदी ही मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात अशा तीन राज्यांतून वाहते आणि ती सर्वात प्राचीन आणि पौराणिक महत्त्व असलेली नदी असून ती सर्वात पवित्र नदी आहे.
आता पुस्तकात थोडक्यात कोणकोणत्या ठिकाणांबद्दल वर्णन आहे ते पाहू!
ट्रेनने मुंबई सेंट्रल येथून उज्जैनला जाऊन नंतर बसने प्रवास सुरू होतो. दक्षिण तटावरून परिक्रमा सुरू झाल्यावर प्रथम आपल्याला उज्जैन येथील धार्मिक स्थळे यांची माहिती वाचायला मिळते. मध्य प्रदेशातील अमरकंटक (उगम), ओंकारेश्वर आणि नेमावर असा क्रम. नंतर शहादा, प्रकाशा, शूळपाणेश्वर, राजपीपला येथील हरिसिद्धीमाता मंदिर, अंकलेश्वर, भरुच असा प्रवास होतो.
मग उत्तर तटावर नारेश्वर, कुबेर भंडारी मंदिर (जेथे गाभाऱ्यात फक्त स्त्रियांनाच प्रवेश आहे), टिळकवाडा आणि गरुडेश्वर. मग मध्य प्रदेश खरगोन येथील महेश्वर तसेच अहिल्याबाई होळकर यांचा इतिहास याची माहिती मिळते. मग तेथील जलकोटी आणि दारिद्य दहन शिवमंदिर यांचे वर्णन आहे.
नंतर पुण्याजवळील नारायणपूरचे एकमुखी दत्त मंदिर तसेच मंडलेश्वर, मांडवगड दर्शन, तेथील रेवाकुंड, रुपमती महाल, मंजु आणि कपूर तलाव, तबेली महाल यांचे वर्णन व इतिहास आहे. लेखक राणी रुपमतीच्या दोन वेगवगळया कथा आपल्याला सांगतात.
मग पुन्हा उजैनची भृतुहरी गुफा, तिथून नेमावरच्या दिशेने जातांना सिहोर गांव आणि नेमावरचे सिध्दनाथ महादेव मंदिर, ग्वाल टेकडी यांची माहिती मिळते.
त्यानंतर कुंतीचं माहेर भोजपूर, तिथले भोजेश्र्वर मंदिर, शिवलिंग आणि मग प्रवाशांनी तिथे केलेल्या मनोरंजनपर कार्यक्रमात काय झाले तेही लेखक सांगतो. त्यातील काही भाग वगळला तर चालला असता असे वाटते.
मग भेडाघाटमधील धबधबा, 64 योगिनी मंदिर आणि घुघुवा जीवाश्म उद्यान यांचे वर्णन येते. मग अमर कंटक येथील विविध धबधबे, कल्याण आश्रम, जैन मंदिर, नर्मदा उगम मंदिर, यंत्र मंदिर, पंचमठ (कर्णमठ) तसेच कुकरा मठ यांचे वर्णन आहे. नंतर शेवटच्या टप्प्यात हुशंगाबाद, टीमरणी, ओंकारेश्वर, इंदौर आणि तेथून पुणे मुंबईला परत असा हा प्रवास संपतो. पुस्तकाच्या शेवटी काही माहितीपर परिशिष्ट दिले आहेत.
एकूणच वाचकांना हे पुस्तक वाचून जणू काही प्रत्यक्ष नर्मदा परिक्रमा केल्याचे समाधान मिळते आणि परिक्रमा करण्यासाठी प्रेरणा सुद्धा मिळते.