दोन शब्द " काहीतरी लिहावें " ही तीव्र इच्छा आणि स्वतंत्र रचनेबद्दल आत्म विश्वासाचा अभाव या कात्रीत सांपडलों असतां एक इंग्रजी कादंबरी-तिचें नावही आतां आठवत नाही-विद्यार्थी दशेत असतां दहाबारा वर्षांपूर्वी माझ्या वाचनात आली. लेखनाचा ओनामा करण्यास ह्या कादंबरीच्या रूपांतरांचा पांगुळगाडा माझ्या उपयोगी पडेल या आशेने मी ती रूपांतरित केली. बरीच वर्षे ती तशीच पडून होती. विहार पत्र जन्माला आल्यावर नव्या कादंबरीची आवश्यकता त्याच्या चालकांना भासू लागली. माझ्या या कादंबरीचे गुपित माझे मित्र श्री. मं.प. नाबर यांनाच फक्त माहित होते पण त्यांनी ते विविधवत्ताचे सह-संपादक व माझे स्नेही श्री. चं. वि. बावडेकर यांच्याकडे फोडले आणि त्यामुळे ही कादंबरी 'विहारमध्ये प्रसिद्ध होऊ लागली व आता पुस्तकरूपाने प्रसिद्ध होत आहे. केवळ रिकामपणची करमणूक म्हणूनच ही कादंबरी मी रूपांतरित केल्यामुळे करमणुकीपलीकडे तिच्यापासून वाचकांना काही उदात्त नीतितत्वांचा लाभ घडावा असे मला प्रामाणिकपणे वाटत नाहीं आणि कर्मधर्मसंयोगाने तसा काही लाभ घडलाच, तर त्याचा आस्वाद त्यांना घेऊ देण्यांत माझें " कोठावळ्याचं पोट " मी दुखू देणार नाही. इतर काही नसला, तरी चांगल्याचा परिणाम चांगला व वाईटाचा परिणाम वाईट होतो अशा प्रकारचा कमीत कमीकमबोध गुप्त पोलि सांच्या चातुर्यावर उभारलेल्या कादंबन्यांतून बहुधा मिळतो. हा बोध कदाचित या कादंबरीतही असेल. असल्यास वाचकांनी तो गोड करून घ्यावा अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे. __राहता राहिले काम आभारप्रदर्शनाचें. श्री. चं. वि. बावडेकर व रा. मं.प. नाबर या उभयतांचे या कादंबरीच्या प्रकाशन साहाय्या बद्दल अप्रत्यक्ष भाभार मी वर मानलेच आहेत. त्या उभयतांचे व विहारचे पहिले संपादक रा. वसंतराव नेरूरकर यांचे आता प्रत्यक्ष आभार मानून हे “ दोन शब्द " पुरे करतो.
-लेखक