“होय बाप्पा. चला. पलीकडे तुम्हांला नेतो.” घनाने त्या बाप्पाला पलीकडे पोचवले. ते सामान त्याच्या डोक्यावर दिले. म्हातारा गेला. घनाला बरे वाटले. त्याच्या मनातील खिन्नता गेली. क्षणभर का होईना, जीवनाचा उपयोग झाला. अंधारात प्रकाशाचा एक किरणही आशा देतो. आपल्या जीवनाचा काय उपयोग, असे विचार घनाच्या मनात येत होते, आणि इतक्यात कोणाच्या तरी उपयोगी पडण्याची संधी आली. घनाला एका कवीचा एक चरण आठवला : एखाद्याचीही जावनकळी फुलवायला जर तुझ्या आयुष्याचा उपयोग झाला तर तुझे जीवन कृतार्थ समज.
घना आनंदाने आपल्या खोलीवर आला.
काही दिवस गेले. या संस्थेच्या पैशावर आपण जगू नये, असे घनाच्याही मनाने घेतले. आपण येथे राहतो, पगार घेतो, आपला जगाला काय उपयोग? तेथे आम्ही तत्त्वज्ञानाच्या चर्चा करतो. कोणाच्या जीवावर आमच्या ह्या वैचारिक चैनी चालल्या आहेत? ज्यांच्या जीवावर आम्ही जगतो, पुस्तके वाचतो, संस्कृती-तत्त्वज्ञानांची स्तोमे माजवतो, त्यांच्या जीवनात प्रकाश न्यायला आम्ही कधी धडपडतो का? येथील गिरणीतील कामगारांच्या घामावर ही संस्था चालली आहे. सुंदरदासशेठांनी संस्थेसाठी पैसे दिले. त्यांनी कोठून आणले? कामगारांच्या श्रमातून जन्मलेली संपत्तीच ना त्यांच्याजवळ असते? मग त्या कामगारांसाठी हे काय करीत आहेत? ज्यांच्या श्रमातून उत्पन्न झालेल्या संपत्तीतून हे धर्मादाय करतात, संस्थांना देणग्या देतात, त्यांच्यासाठी स्वच्छ सुंदर चाळी बांधून देतील तर शपथ! त्यांचा पगार दोन पैशांनी वाढवतील तर शपथ! त्यांना आजारात पगारी रजा देतील तर शपथ! वाटेल तेव्हा काढतील, वाटेल तेव्हा पुन्हा कामावर घेतील. गिरणीला वाटेल तेव्हा टाळे ठोकतील, वाटेल तेव्हा उघडतील. या मालकांच्या लहरीवर लाखो जीवने लोंबकळत असायची. यांची ही लहर म्हणजे जहर! छे; हा सारा अन्याय आहे. मी येथे नाही राहता कामा. परंतु कोठे जाऊ? मी येथेच का नये राहू? येथील कामगारांची संघटना मी का करु नये? येथील विद्यार्थ्यांतच नवचैतन्य मी का आणू नये? असे विचार घनाच्या मनात सारखे येत होते. तो बेचैन होता. निश्चित ठरेना.